नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन भाजपने सोमवारी प्रकाशित केलेल्या निवडणूक जाहिरनाम्यात दिले आहे. कर्नाटकमध्ये येत्या १० मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहिरनामा 'प्रजा ध्वनी' प्रकाशित केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येदीयुराप्पा उपस्थित होते.
जाहिरनाम्यामध्ये राज्यात पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात नागरिकत्व कायदा आणि एनआरसी लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच युगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळीला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अर्धा किलो नंदिनी दूध आणि ३ स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा म्हणाले, 'कर्नाटकसाठी जाहीरनामा एसी रूममध्ये बसून बनवला गेला नाही, तर त्यासाठी मेहनत करण्यात आली आहे. या जाहीरनाम्यासाठी कठोर परिश्रम घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन भेट दिली. तेथे त्यांनी लाखो कुटुंबांशी संपर्क साधला आणि सूचना मिळवून याची निर्मिती करण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टिका केली. ते म्हणाले, सिद्धरामय्या यांचे सरकार रिव्हर्स गियरचे सरकार होते. त्यांनी केवळ राज्याची नैसर्गिक साधनसंपत्ती लुटली आहे आणि गुन्हेगारी आणि समाजकंटकांना मोकळे फिरू दिले. त्याचप्रमाणे आपली मतपेढी मजबूत करण्यासाठी समाजातील एका वर्गाचे लांगुलचालन केल्याचेही नड्डा यावेळी म्हणाले.
जाहिरनाम्यातील आश्वासने
कर्नाटकात सरकार स्थापन झाल्यास समान नागरी कायदा लागू केला जाईल.
राज्यातील प्रत्येक प्रभागात अटल आहार केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.
बीपीएल कुटुंबांना तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत
बीपीएल कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध
5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही
भाजप सरकार शेतकऱ्यांना बियाणांसाठी दहा हजार देणार
गरीब कुटुंबांना 5 किलो तांदूळ आणि 5 किलो भरड धान्य