‘लव्ह जिहाद’ मोठ्या पडद्यावर मांडल्याने कम्युनिस्टांना पोटशूळ
‘द केरला स्टोरी’ हा संघ परिवाराचा अजेंडा – पिनरायी विजयन
01-May-2023
Total Views | 73
नवी दिल्ली : देशभरात येत्या मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या आणि लव्ह जिहादसह दहशतवादाचे सत्य मांडणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसला पोटशूळ उठण्यास प्रारंभ झाला आहे. हा चित्रपट म्हणजे संघ परिवाराचा अजेंडा आहे, असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केला आहे.
लव्ह जिहाद, इस्लामी दहशतवाद आणि आयसिसच्या सेक्स स्लेव्ह पद्धतीचे सत्य देशासमोर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाद्वारे मांडला जाणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून तो पाहून देशभरात खळबळ उडाली आहे. केरळमधील लव्ह जिहादची प्रकरणे याद्वारे प्रथमच मोठ्या पडद्यावर मांडला गेला आहे. मात्र, या चित्रपटात कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसने नेहेमीप्रमाणे विरोध करण्यास प्रारंभ केला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन म्हणाले की, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दिसून आले आहे की ३२ हजार महिलांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले, नंतर त्यांना दहशतवादी संघटना आयसिसमध्ये सामील होण्यासाठी पाठवले गेले. केरळमध्ये राजकीय फायद्यासाठी संघ परिवार मुस्लिमांना वेगळे दाखवत आहे. तपास यंत्रणांनी यापूर्वीच 'लव्ह जिहाद'चा आरोप फेटाळून लावला आहे. न्यायालयानेही तो फेटाळला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने संसदेतही त्यास नकार दिला आहे. त्यामुळे केरळवर 'लव्ह जिहाद'चे आरोप जाणीवपूर्वक केले जात आहेत. जातीयवादाचे विष पसरवून केरळमधील धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली जातीय द्वेष आ संघ परिवाराचा अजेंडा पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप मुख्यमंत्री विजयन यांनी केला आहे.
कम्युनिस्ट पक्षाप्रमाणेच काँग्रेस पक्षानेही या चित्रपटास विरोध केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनीदेखील चित्रपटाविरोधात भमिका घेतली आहे. चित्रपटाचे पोस्टर ट्विट करून थऱूर यांनी “ही आमच्या केरळची नव्हे तर तुमच्या केरळची कहाणी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे केरळ प्रदेश काँग्रेसने राज्य सरकारला विनंती करून ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्यात प्रदर्शित होऊ न देण्याची मागणी केली आहे.
लव्ह जिहादचे पुरावे द्या, १ कोटी मिळवा
मुस्लिम युथ लीग – केरळ राज्य कमिटी या मुस्लिमांच्या संघटनेनेदेखील ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटास विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, केरळमधील ३२ हजार महिलांना मुस्लिम करण्यात आले आणि त्यांना सिरियामध्ये आयसिसमध्ये सामील करण्यासाठी पाठविण्यात आल्याचे सिद्ध करून दाखवावे. त्यासाठी ४ मे रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुरावे जमा करण्यासाठी केंद्रे उघडण्यात येणार आहे. चित्रपटातील दावा सिद्ध केल्यास १ कोटी रुपये दिले जातील, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनदेखील मुस्लिम संघटनेच्या आवाहनाचे पोस्टर ट्विट केले आहे.