शिलाहारकाळाची साक्ष देणारं गोवे गाव

    08-Apr-2023
Total Views | 247
Gove gaon

कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेलं रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्यातील गोवे गाव. साधारणत: एक हजारच्या आसपास या गावची लोकसंख्या असावी. या गावामध्ये १२ बलुतेदारांपैकी कुणबी, भोय, सुतार, गोसावी, बौद्ध आणि वनवासी समाजाचे लोक एकत्र नांदतात. या गावात जाधव, पवार, शिर्के, सानप, गुजर अशा ऐतिहासिक मात्तब्बर घराण्यांची आडनावं पाहायला मिळतात. जाधव कारभारी तर सानप या गावचे खोत म्हणून ओळखले जातात. प्रस्तुत लेखात या गावामध्ये आढळणार्‍या शिलाहारकालीन अवशेषांचा आढावा घेतला आहे.

गोवे गावची ग्रामदेवता सोमजाई आणि गोमजाई. कृषी पुरातत्वशास्त्रानुसार शेतीचा शोध हा प्रथम स्त्रीला लागला, असे म्हणतात. म्हणूनच कोकणात जास्त प्रमाणात शाक्त (शक्ती) परंपरेतील देवता या ‘ग्रामदेवता’ म्हणून पुजल्या जातात. या मंदिरातील गाभार्‍यामध्ये असलेल्या सोमजाई आणि गोमजाई देवींच्या मूर्ती तंत्रलिंगावरती आपल्याला पाहावयास मिळतात. या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे या मंदिरातील मूर्ती आज आपल्याला बदललेल्या दिसतात. या मंदिरातील काही वास्तू आपल्याला शिलाहारकाळाची साक्ष देतात. कर्पुरस्तंभ आणि दुर्मीळ असे नैवेद्याचा दगडी ताट या वस्तू बाजूच्या चौथर्‍यावर आपल्याला पाहायला मिळतो. या ग्रामदेवतांचा मान म्हणून दसर्‍यामध्ये गोंधळ घातला जातो. देवींना खारा नैवेद्य दाखवला जातो. या मंदिराला लागून समोर एक छोटेखानी मंदिर बनवलं असून तेथे जाधव परिवाराकडून ‘चोरोबा’ म्हणजे रक्षक देवतेची मूर्ती बसवलेली आपल्याला पाहायला मिळते.

या गावचा रक्षकदेवता म्हणून बाजूलाच श्री मारूतीरायाचं मंदिर आहे. या मंदिराचाही जीर्णोद्धारअलीकडेच झालेला. या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक वीरगळसदृश्य शिळा जमिनीमध्ये अर्धी पुरलेली दिसते. तीचं जाकसुद देवता म्हणून पूजन केलं जातं. शेंदूर लावल्यामुळे आणि ऊन, वारा व पाऊस या वातावरणाच्या प्रभावामुळे तिची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. त्यामुळे तिच्याबद्दल ठोस काही सांगता येत नाही. या मंदिराच्या समोरच एक पार आहे आणि या पारावर वेशीवरील देवता काळकाई देवी पुजली जाते. या देवीची वार्षिक पूजा मे महिन्याच्या अखेरीस संपूर्ण गावातर्फे केली जाते. गावातल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की, या देवीच्या पुजेच्या दिवशी पाऊस पडतोच पडतो. शेतात लावणी करायच्या आधी या देवीच्या शेजारी तलंग कोंबडीचा नैवेद्य दिला जातो आणि मगच लावणी सुरू केली जाते. या पाराच्या बाजूच्या परिसरात एक शिळा आहे. तिला ‘भूंडीदेवी’ म्हणून पुजलं जातं. कोकणातील ही एक आगळीवेगळी देवता. जर पाऊस यायला उशीर होत असेल, तर या शिळेला एका मनुष्याने निर्वस्त्र अवस्थेत काठीने झोडपले जाते आणि मग पाऊस येतो. आजही पावसाने ओढ दिली, तर हा विधी केला जातो.


Gove gaon

गावात तलावाच्या शेजारी असलेल्या भैरी भवानी देवीच्या मंदिरात चतुर्भूज गणपतीची मूर्ती, दोन शिवलिंग, भैरी भवानी मूर्ती, कर्पुरस्तंभ आणि सुबक असं तंत्रविद्येतील लिंग आहे. या मंदिराच्या समोरच एक मोठं सात ते आठ फूट उंचीचं दीपस्तंभ आहे.या मंदिराच्या मागील पठारावर एक प्रशस्त, सुबक कोरीवकाम केलेली धेनुगळ पडलेली पाहायला मिळते. इतिहास अभ्यासकांच्या मते, शिलाहारकाळात या धेनुगळ शिळा एकाच ठिकाणी सात असतात; आज अवघी एक आढळते. बाकी धेनुगळ या काळाच्या ओघात लुप्त झाल्या असाव्यात. या सर्व गोष्टींचा विचार करता हे गोवे गाव नक्कीच आपल्याला शिलाहारकाळात घेऊन जाते. या गावातील मंदिरांमधील मूर्ती व अवशेष आपल्याला शिलाहारकाळाची साक्ष देतात.

इसवी सन ९वे ते इसवी सन १३ वे शतक हा शिलाहाराकाळ समजला जातो. हे राष्ट्रकूट कालखंडातील उत्तर आणि दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र या भागातील मराठा राजघराणे होते. यांची उत्तर कोकणात मुंबई, ठाणे, रायगड आणि संपूर्ण कोकणात सत्ता होती. या उत्तर कोकणातील शिलाहारांची राजधानी पुरी म्हणजे आत्ताचे रायगड जिल्ह्यातील दंडाराजपुरी येथे होती. कपर्दी हा उत्तर शिलाहार घराण्याचा मूळ पुरुष. शिलाहारांच्या ४५० वर्षांच्या काळात एकूण २३ शिलाहार राजांनी या उत्तर कोकणात आपलं राज्य केलं. शिलाहार राजा मुम्मिणीराज याच्या काळात त्याने बांधलेलं अंबरनाथ येथील शिव मंदिर आजही आपल्याला पाहायला मिळतं.
 
या दुर्मीळ अवशेषांचा विचार करता, गोवे हे शिलाहार काळात अतिशय महत्त्वाचे होते. कारण, या गावाच्या बाजूने वाहणारी कुंडलिका नदी आणि तिच्या काठावरून गेलेला व्यापार मार्ग. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून वाहत येणारी ही नदी, रोहा अष्टमीच्या खाडीमार्गे चौल येथे समुद्राला मिळते. सातवाहनकाळापासून होणारा प्राचीन व्यापार याच नदीच्या मार्गातून होत होता आणि याच व्यापाराच्या रक्षणार्थ लेणी आणि गडकिल्ले उभे राहिले. गोवे गावाच्या जवळचं सुरगड आहे आणि सुरगडाच्या घेर्‍यातून प्राचीन व्यापारी वाट देशावर जात होती. याच वाटेवर हे गोवे गाव आहे आणि शिलाहार राजवंशात इथे वस्तीचा व्यास वाढला. कारण, तेथील अवशेष त्या काळाची आपल्याला साक्ष देतात. हा अवशेषरुपी ऐतिहासिक ठेवा आपण जतन केला पाहिजे. कारण, भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण आपला जाज्वल्ल्य इतिहास सांगणार आहोत.



-मयूर कापसे



अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121