बौद्धिक लढवय्या

    08-Apr-2023   
Total Views | 79
Ashokrao Chowgule

 अशोकराव चौगुले यांनी डाव्या मंडळींच्या विचारांची/लेखनांची केवळ चिरफाडच केलेली नाही, तर ती करीत असताना त्यांनी कधीही युक्तिवादाच्या नियमांना फाटा दिलेला नाही. ज्याची मांडणी करायची ती तार्किक करायची, आपल्या प्रतिपादनासाठी पुरावे द्यायचे. प्रतिपक्षाच्या प्रतिपादनातील विसंगती उघड करायच्या. त्यांच्याच प्रतिपादनातील अंतर्विरोध स्पष्ट करायचा. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी त्यांच्यापुढे नवीन प्रश्न ठेवायचे आणि त्याची उत्तरे त्यांच्याकडून मागायची ही अशोकरावांनी अवलंबलेली पद्धती होती. खर्‍या अर्थाने ते एक बौद्धिक योद्धा आहेत. आज या निरलस वृत्तीच्या बौद्धिक योद्ध्याचा सत्कार सरसंघचालकांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्ताने...

१९८० ते ९०चे दशक हे देशाचे भवितव्य बदलणारे दशक होते. मीनाक्षीपुरम येथे झालेले दलितांचे सामूहिक धर्मांतर, काश्मीरमधील हिंदूंचे विस्थापन, शाहबानो खटल्याच्या निकालानंतर सुरू झालेली समान नागरी कायद्याची चर्चा व त्यानंतर सुरू झालेले श्रीरामजन्मभूमी आंदोलन या पार्श्वभूमीवर शेषाद्री चारी याने अशोक चौगुले यांच्याशी माझी भेट करून दिली. शेषाद्री चारी त्या वेळी भारतीय जनता पक्षाचे पूर्ण वेळ काम करत होते व दक्षिण मुंबई मतदारसंघ त्याच्याकडे संयोजनासाठी होता. प्रत्येक विषयात खोलवर जाऊन तो विषय समजून घेण्याची अशोक चौगुले यांची कळकळ या पहिल्याच भेटीत जाणवत होती. अशोक चौगुलेंची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक पार्श्वभूमी ही कॉर्पोरेट वर्गातील. तो काळ असा होता की, हिंदुत्ववादी विचार किंवा चळवळ यांच्याशी आपला संबंध दाखविणे हे आपल्या प्रतिष्ठितपणाला कमीपणा आणणारे आहे, असे वातावरण होते. त्यातच अशोक चौगुले यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमात व परदेशात झालेले असल्याने, हिंदू धर्म, संस्कृती यांच्याशी त्यांचा संपर्क आलेला नव्हता.

या सर्व पार्श्वभूमीवर संघ, भाजप, श्रीरामजन्मभूमी चळवळ, विश्व हिंदू परिषद यांचा परिचय करून देणे हे आव्हानात्मक व विचारांची कसोटी पाहणारे काम होते. परंतु, अशोक चौगुले यांची एखादा विषय समजून घेण्याची कळकळ, विषयाच्या मुळाशी जाऊन भिडण्याची पद्धत, बौद्धिक आकलनक्षमता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत, यामुळे हिंदुत्व विचार अत्यंत शास्त्रशुद्ध व आधुनिक समजल्या जाणार्‍या तत्त्वज्ञानांच्याही पलीकडे जाऊन पर्याय देणारा आहे, याची त्यांना खात्री पटली. भाजपने आपल्या राजकीय फायद्याकरिता श्रीरामजन्मभूमीचा विषय घेतलेला आहे, अशी त्या वेळच्या सर्वसाधारण लोकांच्या धारणेप्रमाणे त्यांचीही समजूत होती. परंतु, नंतर ती दूर झाली व भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत हा विषय किती महत्त्वाचा आहे, हे त्यांच्या लक्षात आले.

तो सर्वच काळ असा होता की अल्पसंख्याकांच्या भावना-मग त्या मानवतेच्या, न्यायाच्या कितीही विरोधात असेनात-जपणे म्हणजे सेक्युलॅरिझम, उदारमतवाद असे समजले जात असे व हिंदूंच्या भावना-मग त्या कितीही न्याय्य असोत, तर्कशुद्ध असोत त्यांचे समर्थन करणे म्हणजे जातीयवाद असे समीकरण बनले होते. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील कॉर्पोरेट विश्वात श्रीरामजन्मभूमीच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदेचे, संघपरिवाराचे समर्थन करायला अशोक चौगुले ठामपणे उभे राहिले. त्यांनी आपल्या घरी आपल्या कॉर्पोरेट व्यावसायिक मित्रांना बोलावून त्यांच्याबरोबर अशोकजी सिंघल, मोरोपंत पिंगळे आदींच्या बैठका घेतल्या. विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशी, पत्रकारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लिहिलेले व विश्व हिंदू परिषदेचे त्या वेळचे अध्यक्ष विष्णू हरी दालमिया यांच्या नावे ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित झालेले पत्र हे उत्तम युक्तिवाद व ओघवती भाषाशैली याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

‘टाईम्स’सारख्या वृत्तपत्रात या विषयावरची बहुदा पहिल्यांदाच अशा प्रकारची मांडणी झालेली असावी. त्यानंतर विविध वृत्तपत्रांतून आलेल्या लेखांतील मुद्द्यांचा प्रतिवाद करणारे लेख लिहिणे, जे जे हिंदुत्वाच्या समर्थनार्थ वैचारिक चळवळीत भाग घेतील त्यांना सर्व प्रकारचे समर्थन देणे, त्यांची चर्चासत्रे आयोजित करणे अशा अनेक उपक्रमांना त्यांनी चालना दिली. त्यांनी ‘विवेक’मधल्या अनेक लेखांचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून ते विचार विविध लेखकांपर्यंत, पत्रकारांपर्यंत पोहोचविले. श्रीरामजन्मभूमीच्या समर्थनार्थ असलेले पुरावे स्पष्ट करणार्‍या एका उत्कृष्ट माहितीपटाची निर्मिती केली. याच काळात ‘हिंदू विवेक केंद्रा’ची स्थापना करून ते बौद्धिक लढाईचे केंद्र बनविले. त्यांच्याच प्रयत्नातून रमेश पतंगे यांच्या ‘मी, मनू आणि संघ‘ या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर त्यांच्या अमृत महोत्सवी सत्काराच्या वेळी प्रकाशित होत आहे.

पुढच्या काळात त्यांचे कार्य केवळ बौद्धिक चळवळीपर्यंत मर्यादित राहिले नाही, तर त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या संघटनात्मक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. विश्व हिंदू परिषदेच्या होणार्‍या बैठकांचे स्वरूप त्यांच्या जीवनशैलीपेक्षा अगदी वेगळे आहे, परंतु ते त्या कार्यपद्धतीशी समरस होऊन गेले. अशोकजी सिंघल आपल्या आयुष्यात आले हे आपले खूप मोठे भाग्य आहे, अशी त्यांची भावना आहे. स्वत:ला सेक्युलर, लिबरल समजणार्‍यांच्या पंचतारांकित चर्चासत्रांना उपस्थित राहून त्यांना अडचणीत आणून निरुत्तर करणारे मुद्दे ते उपस्थित करत व ते करत असताना आपण विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आहोत, हे अभिमानाने व आवर्जून सांगत. त्यांच्यासारखी एक कॉर्पोरेटव्यक्ती अशा कार्यक्रमात येऊन आपण विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आहोत, अशी अभिमानाने ओळख करून देते, याचा आयोजकांना मोठा धक्का बसलेला स्पष्टपणे दिसत असे. या सर्व गोष्टी त्या निश्चित धारणेने करत असतात. त्यांना राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी असूनही ते त्या वाट्याला कधी गेले नाहीत.

अशा एका निरलस वृत्तीच्या बौद्धिक योद्ध्याचा सत्कार सरसंघचालकांच्या हस्ते आज, दि. ९ एप्रिलला होत आहे, ही आनंदाची बाब आहे. १९८३ मध्ये ‘एकात्मता यज्ञा’च्या कार्यक्रमाद्वारा हिंदूंच्या सामूहिक शक्तीचे व एकात्म भावाचे जगाला प्रथमच दर्शन घडले. २०२४ मध्ये श्रीराममंदिराच्या उद्घाटनाने जगाला त्याच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्याचे यशस्वी दर्शन घडणार आहे. या चार दशकांच्या हिंदुत्वाच्या जागृतीपर्वाचे तज्ज्ञ विविध दृष्टिकोनातून विवेचन करणार्‍या ग्रंथाचे या कार्यक्रमात प्रकाशनही होणार आहे. या ग्रंथात अनेक तज्ज्ञ व मान्यवर लेखकांचे लेख असतील, हीसुद्धा अशोक चौगुलेंना दिलेली वैचारिक मानवंदना असेल.



दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121