हिंदू संस्कृतीमध्ये समृद्धी, कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानल्या जाणार्या शंखांच्या तब्बल 118 प्रकारांचा संग्रह करून त्याची शास्त्रोक्त आणि आध्यात्मिक माहिती शोधणारा शंखशक्तीचा उपासक आनंद चंद्रशेखर भिडे यांच्याविषयी...
मुंबईत दादर येथे दि. 10 मार्च, 1978 रोजी जन्मलेल्या आनंद भिडे यांचे बालपण आणि शिक्षण ठाण्यात झाले. ठाण्यातील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुणे विद्यापीठातून ‘कॉम्प्युटर सायन्स’मध्ये उच्चशिक्षण झाले. पुढे मुंबई विद्यापीठातून ‘बिझनेस मॅनेजमेंट’मध्ये त्यांनी डिप्लोमा केला. हभप संत सोनोपंत दांडेकर यांचे पणतू असलेल्या आनंद यांच्यावर बालपणापासूनच नकळतपणे आध्यात्मिक संस्कार रुजले. आनंद यांचे वडील चंद्रशेखर हे व्यावसयिक, तर आई सुजाता भिडे या गेली 30 ते 32 वर्षे योगक्षेत्रात कार्यरत आहेत. ‘घंटाळी मित्र मंडळा’च्या योगसंस्थेच्या अध्यक्षा असलेल्या आईमुळेच आनंद यांनाही योगक्षेत्रात कार्य करण्याची तसेच, लेखनाची प्रेरणा मिळाली. त्यामुळे ’श्रीकृष्णलीला’ केंद्राची स्थापना करून गेली 22 वर्षे त्यांनी सत्संगाची परंपराही जपली आहे.
उच्चशिक्षित झाल्यानंतर लग्नाच्या हॉलच्या व्यवसायात कार्यरत असतानाच आनंद यांनी, ‘घंटाळी मित्र मंडळ, ठाणे’ येथील योगसंस्थेतून ‘योग डिप्लोमा’ व ‘योग थेरपी’ कोर्स पूर्ण करून एक उत्तम योगसाधक व योगशिक्षक बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर, देशी-परदेशी फिरण्याची आवड असल्याने यातूनच एकदिवसीय ‘नेचर वॉक’ या नावाने शालेय विद्यार्थ्यांच्या आजवर त्यांनी तब्बल 75 हून अधिक सहली आयोजित केल्या आहेत. बालवयापासून जडणारा हा छंद आयुष्यभर जोपासण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा छंदांतून आनंद यांनी समाजसेवा म्हणून तसेच समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने गेली 30 वर्षे ठाण्याच्या ‘घंटाळी मित्र मंडळ’ या योगसंस्थेत व संस्थेच्या संपादन विभागात सक्रिय कार्यरत आहेत. सुप्रसिद्ध ‘बिहार स्कूल ऑफ योग इन्स्टिट्यूट’चे परमपूज्य परमहंस स्वामी निरंजनानंद सरस्वती यांच्याकडून जिज्ञासू संज्ञास दीक्षा प्राप्त केली. गेल्या तीन-चार वर्षांपासून भारतीय संस्कृतींचे प्रतीक असलेल्या विविध शंखांचा संग्रह करावयाचा आगळावेगळा छंद त्यांना जडला आहे. याच छंदासाठी त्यांनी आतापर्यंत महाभारतकालीन शंखापासून तब्बल 118 प्रकारच्या शंखांचा संग्रह केला आहे. हे विविध प्रकारचे शंख त्यांनी केवळ आपल्या संग्रही न ठेवता त्याची शास्त्रोक्त आणि आध्यात्मिक माहिती शोधली असून शंखांचा विविध प्रकारे अभ्यास करण्याचा त्यांचा प्रयत्न आजही नियमितपणे सुरू आहे.
भगवान विष्णूंनी धारण केलेल्या चार आयुधांमध्ये शंख हे एक आयुध आहे. जे विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ती, नादशक्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. शंख गोळा करण्याच्या आनंद यांच्या या छंदाचे रूपांतर पुस्तक निर्मितीत झाले. नुकतेच आनंद यांचे ’शंखशक्ती’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तक निर्माणाची प्रेरणा माझ्या आई व कुटुंबीयांकडून मिळाल्याचे आनंद आवर्जून नमूद करतात. त्यांचे ’शंखशक्ती’ हे पुस्तक त्यांनी योगगुरु योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे व आध्यात्मिक गुरु परमपूज्य लिलाताई कर्वे यांना अर्पण केले आहे. ‘शंखशक्ती’ या नावाची फोड केली, तर शंख अधिक शक्ती. आपली संस्कृती व परंपरा जपणार्या 18 अध्यायी ’शंखशक्ती’ या पुस्तकातील सर्व प्रकरणे चिकित्सक असून ही ‘शंखशक्ती’ सर्वसामान्य व्यक्तीला स्वशक्तीची जाणीव करून देणारी असल्याचे ते मानतात. प्राचीन काळापासून ऋषिमुनीदेखील आपल्या पूजा-साधनेत शंखध्वनी करीत. हीच मेख ओळखून शंखाची उपयोगिता, शंखनादामुळे शरीर, मनावर होणारे होणारे सुयोग्य परिणाम जनमानसाला कळावे, याकरिता आनंद यांनी ’शंखशक्ती’ या विषयावर व्याख्याने सुरु केली. त्याचबरोबरीने, मुलाखतीद्वारे शंखमहिमा सर्वांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ठाणे-मुंबई सोबत शिकागो, अमेरिकेतही शंखशक्तीचा जनजागर आनंद करीत आहेत.
“आपली भारतीय संस्कृती ही वैविध्यतेने नटलेली आहे. भारतीय तत्त्वज्ञान, परंपरा, संस्कृती, सणवार प्रतीके आदी बाबी म्हणजे संतांनी, ऋषिमुनींनी दिलेला अमूल्य असा ठेवा आहे. शंखातून येणारा ध्वनी नकारात्मक ऊर्जेला नष्ट करतो. शंखनादामुळे घरातील वातावरण शुद्ध होते. तसेच शंखनादाचा शरीरालाही तितकाच फायदा होऊन श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरळीत होण्यात मदत होते. तेव्हा, शंखांचा हा अमूल्य ठेवा युवा पिढीला कळावा, त्यांनी हा ठेवा पुढे नेऊन, जनमानसात आपल्या संस्कृतीची मुळे रुजवावीत, हेच भविष्यातील आपले लक्ष्य आहे,” असे आनंद सांगतात. या दृष्टीनेच प्रत्येकाचे प्रयत्न असायला हवेत, अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात.
अलीकडे ‘हिंदू रिलिजस ग्रोथ प्रोग्रॅम’ या प्रकल्पावर काम करण्याची, तसेच अमेरिकेतील (बीएसए) ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित स्काऊटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी त्यांना मिळाली. हा प्रकल्पाबद्दल आनंद यांना सन्मानचिन्हही मिळाले आहे. अशा या शंखशक्तीच्या उपासनेला वाहून घेतलेल्या आनंद भिडे यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!