ठाणे : सण-उत्सवाच्या माध्यमातुन संस्कृती,परंपरा जपण्याबरोबरच ज्ञानदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी ठाण्यातील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानने हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ सुरु केली आहे. ठाणे पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात गुरुवारी (दि.६ एप्रिल रोजी) हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात अतिथी भाविकांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.
कोपरीतील श्री पवनसुत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी सत्यनारायणाच्या महापुजेनिमित्त हजारो गोरगरिबांना अन्नदान करण्यात येणार आहे. श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानच्यावतीने गेली ४२ वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गुरुवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवाची साग्रसंगीत पूजा-अर्चा, सकाळी सुंदरकांड पाठ, दुपारी महाप्रसाद (भंडारा) तर,सायंकाळी सुश्राव्य भजन-कीर्तन आणि महिलावर्गासाठी हळदीकुंकूचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच, यंदा प्रथमच आयोजकांनी उत्सवानिमित्त वाचन चळवळीची रुजवात केली आहे. कोपरीच्या या हनुमान मंदिरात येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तके भेट देण्यात येणार आहेत. ठाण्यातील या वाचन चळवळीला बळ मिळावे यासाठी अनघा प्रकाशनचे अमोल नाले यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे पवनसुत प्रतिष्ठानच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.