नवी दिल्ली : मानहानीच्या खटल्यात २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर १२ दिवसांनी राहुल गांधी सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठी गेले आहेत. मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. दरम्यान, मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार आहे.
राहुल गांधी यांना दिल्लीहून सुरतला रवाना होण्यापूर्वी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. राहुल गांधींबरोबर प्रियांका गांधी, राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुरतमध्ये आले आहेत.तसेच यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आहे.
राहुल गांधी यांच्या वतीने सुरत न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी आणि न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यासाठी अशा दोन याचिका राहुल गांधीनी न्यायालयात दाखल केल्या आहेत. यामुळे काँग्रेस पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहात आणि देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहे.राहुल गांधींच्या सुरतमध्ये आगमनादरम्यानही पक्ष शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
या सर्व प्रकरणात केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, जेव्हा तुमचा खटला सुरू होता तेव्हा तुम्ही अपील का केले नाही? न्यायालयाने तुम्हाला दोषी ठरवल्यानंतर तुम्ही हे नाटक करत आहात. हे केवळ न्यायालयावर दबाव निर्माण करण्यासाठी आहे. काँग्रेस पक्ष संपूर्ण कुटुंबाला देशापेक्षा वरचढ मानतो, अशी टीका ही किरेन रिजिजू यांनी केली आहे.