श्रीगजाननचरणीच स्वानंद!

    03-Apr-2023   
Total Views | 631
Dr. Swanand Pund

श्रीगजाननाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करायचे म्हटले, तर पहिले नाव येते ते डॉ. स्वानंद पुंड यांचे. प्रवचनकार, संशोधक, अभ्यासक आणि नितांत गणेशभक्त असणार्‍या डॉ. पुंड यांच्याविषयी...

स्वानंद म्हणजे स्वत:चा आनंद होय. डॉ. स्वानंद पुंड यांनी हा स्वआनंदासह तो आनंद आबालवृद्धांना प्रवचनं, लेख, व्हिडिओ, व्याख्यानांमधून दिला. त्यांनी अमरावती विद्यापीठातून वाङ्मय विषयात विद्यापीठात पाचवा क्रमांक, वाङ्मय पारंगतमध्ये पुणे विद्यापीठातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. ‘नेट’ परीक्षा ते प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाले. पुणे विद्यापीठातून ‘श्रीमत् आद्य शंकराचार्यांच्या महत्त्वपूर्ण प्रकरण ग्रंथाचे चिकित्सक अध्ययन’ या विषयावर संशोधन करून त्यांना ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी प्राप्त झाली. बंगळुरू येथील ‘डॉ. एस राधाकृष्णन् रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सेंटर’च्या शिफारशीवरून साऊथ अमेरिका विद्यापीठाची ‘डी.लिट्’ ही मानद पदवी त्यांना बहाल करण्यात आली.

डॉ. पुंड यांनी आजवर ६५ ग्रंथ लिहिले असून त्यांची १६ ई-बुक्स प्रकाशित झाली आहेत. विविध वृत्तपत्रांमधून ३५हून अधिक लेखमाला, तर २५०० लेख त्यांनी लिहिले. विविध दूरचित्रवाहिन्यांवरही त्यांची अभ्यासाधारित अनेक प्रसारणे झालेली आहेत. त्यांची मुख्य ओळख ही अभ्यासक-प्रवचनकार असून तीन हजारांहून अधिक प्रवचने आणि व्याख्याने त्यांनी विविध ठिकाणी दिली आहेत. त्यांच्या ‘श्रीगणेशोपासना ग्रंथमालिके’ची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, ‘श्रीशांकर स्तोत्ररसावली’ या ३८१ लेखांच्या मालिकेची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, तर संस्कृत साहित्यावर आधारित सर्वप्रथम आणि एकमेव अशा ‘गीर्वाणवाणी’ या युट्यूब चॅनेलवरील उपक्रमाची ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. ‘श्रीमन् मुद्गल महापुराण कथारूप आणि विश्लेषण’ या नऊ खंड आणि २३ हजार श्लोकांच्या विवेचनपर महाग्रंथाचे लेखन त्यांनी केले. पुराणकथा कशी आहे, यापेक्षा ती तशी का आहे, याचे विवेचन करून अभ्यासकांना एक नवी दृष्टी त्यांनी प्राप्त करुन दिली.

श्रीगणेशाच्या एकेका पैलूचे दीर्घ विवेचन करणारे ग्रंथ त्यांनी लिहिलेच, तसेच अद्वैत वेदान्ताधारितही त्यांनी ग्रंथरचना केली आहे. विविध विद्यापीठांच्या संस्कृत विद्यार्थ्यांसाठी, तसेच संस्कृतच्या अभ्यासकांना मार्गदर्शनपर अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली, ज्यामध्ये ‘सुभाषितमाला’, ’कवींद्रगाथा’, ’श्रीमद्भगवद्गीता (बारावा अध्याय)’ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘पुत्र भारतीचे’, १०० चिंतनकथा असणारा ‘अमृतधारा’, ‘सत्याचा विजय शेवटीच का’, ‘प्रभातचिंतन’ असे नैतिक शिक्षण देणार्‍या साहित्यकृतीही त्यांनी लिहिल्या.त्यांच्या प्रवचनाचे मुख्य विषय श्रीगजाननाधारित असतात. परंतु, केवळ कथा सांगण्यापेक्षा कथा संशोधन आणि अभ्यासपूर्वक मांडणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या पीएच.डीचा विषय असणारे शांकरवेदान्त, श्रीरामायण, मुद्गलपुराण, श्रीमद्भगवद्गीता, संतसाहित्य, महापुरुषांचे चरित्र हेही त्यांच्या प्रवचनांचे मुख्य विषय असतात. प्रवचनांचे हे विषय जरी परंपरागत वाटले, तरी मूल्यशिक्षण, सामाजिक समरसता, राष्ट्रनिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन यासही ते प्राधान्य देतात.

लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे ते संस्कृत विभागप्रमुख असले, तरी केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमात न रमता सर्वजनांसाठी संस्कृतभाषेची दारे त्यांनी उघडली. मग संस्कृत संभाषण शिबिरांचे आयोजन, संस्कृत गीतरचना, संस्कृत साहित्य रसास्वाद व्याख्यानमाला, संस्कृत बालसंस्कार शिबिरे, संस्कृत प्रभातयात्रा, संगीतसंध्या, संस्कृत जनपद संमेलन, सरलमानक कार्यशाळा, संस्कृत प्रदर्शनी, संस्कृत सप्ताह अशा अनेक ‘संस्कृतप्रसाराय’ कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले.‘युजीसी’ संचालित ‘स्वयम् पोर्टल’च्या धर्तीवर त्यांनी जनप्रबोधनासाठी अभ्यासमालिका रचित केली. श्रीमत् दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सहकार्याने श्रीगणेशाथर्वशीर्ष अभ्यासक्रम, ककासंवि, रामटेक यांच्या सहकार्य करारानुसार नीतिशतकम् अभ्यासक्रम मालिका, मेघदूत अभ्यासक्रम मालिका या अभ्यासक्रमांची निर्मिती त्यांनी केली. संस्कृत साहित्य रसग्रहणाचे अभिनव व्यासपीठ म्हणजे ‘गीर्वाणवाणी’ हा त्यांचा युट्यूब चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा संस्कृत साहित्य विषयाचा संपूर्ण या स्वरूपात ‘डिजिटल’ झालेला आहे, त्याचे सर्व श्रेय हे डॉ. पुंड यांचे आहे.

सुरुवातीला केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला हा उपक्रम, अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण विद्यापीठात प्रसारित केला. मग महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांत त्याचा प्रचार केला गेला. शेवटी केवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच कशाला, असे म्हणत समस्त संस्कृतप्रेमी जनतेसाठी उपक्रम मुक्त केला गेला.डॉ. पुंड यांना ‘डी.लिट्’ ही मानद पदवी मिळालीच, पण तसेच ‘मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार’, ‘प.पू. मामासाहेब देशपांडे स्मृती उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार’, ‘उत्कृष्ट गाणपत्य प्रचार-प्रसार पुरस्कार’, ‘ज्ञानप्रबोधन प्रवचनकार पुरस्कार’,‘राजरत्न पुरस्कार’, ‘धार्मिक भूषण पुरस्कार’ असे २५ हून अधिक पुरस्कार त्यांना लाभले आहेत.अध्यात्माला संशोधन आणि अभ्यासाची जोड देत पारंपरिकतेचा पाया डॉ. स्वानंद पुंड यांनी कायम राखला. श्रीगजाननाला सर्वस्व वाहून ‘स्वानंद’ जनहितार्थ प्रसारित करणार्‍या डॉ. स्वानंद पुंड यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!




वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत १२ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
दहशतवाद्यांनी कधी कल्पनाही केली नसेल त्याहून कठोर शिक्षा देणार!; बिहारमधील भाषणातून पंतप्रधान मोदींचा थेट इशारा

"दहशतवाद्यांनी कधी कल्पनाही केली नसेल त्याहून कठोर शिक्षा देणार!"; बिहारमधील भाषणातून पंतप्रधान मोदींचा थेट इशारा

(PM Narendra Modi Assures Response To Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. केंद्र सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार धरत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली असतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना "दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना आणि त्यांच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीक..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121