पंतप्रधानांनी केले ९१ नव्या एफएम ट्रान्समीटरचे लोकार्पण

    28-Apr-2023
Total Views | 75
 
Tramsmeter
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९१ एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन केले. याचा फायदा १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ८४ जिल्ह्यांना होणार आहे. 'मन की बात' चा १०० वा भाग येत्या रविवारी म्हणजेच ३० एप्रिल २०२३ रोजी प्रसारित होणार असतानाच पंतप्रधानांनी नव्या ट्रान्समीटरचे लोकार्पण केले आहे.
 
पंतप्रधानांनी यावेळी त्यांच्या पिढीचे रेडिओशी असलेले भावनिक नाते अधोरेखित केले. “मन की बात’च्या आगामी १०० व्या भागाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, माझ्यासाठी, ही आणखी आनंदाची बाब आहे की, माझा एक "कार्यक्रम सादरकर्ता" म्हणूनही रेडिओशी संबंध आहे. देशवासीयांशी अशा प्रकारचा भावनिक संबंध केवळ रेडिओद्वारेच शक्य झाला. याद्वारे मी देशाच्या सामर्थ्याशी आणि देशवासियांमधील कर्तव्याच्या सामूहिक शक्तीशी जोडलेला राहिलो. मन की बातच्या माध्यमातून लोकचळवळ बनलेल्या स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि हर घर तिरंगा यांसारख्या उपक्रमाबाबत कार्यक्रमाच्या भूमिकेची उदाहरणे देऊन त्यांनी रेडिओसोबतचे नाते सांगितले.
 
गेल्या काही वर्षांत देशात होत असलेल्या तंत्रज्ञान क्रांतीने रेडिओ आणि विशेषत: एफएमला नवीन स्वरूप दिले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. इंटरनेटची व्याप्ती वाढत असल्याकडे लक्ष वेधून मुलाखती (पॉडकास्ट) आणि ऑनलाइन एफएमच्या माध्यमातून रेडिओ नाविन्यपूर्ण मार्गांनी समोर आला आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. “डिजिटल इंडियाने केवळ रेडिओला नवीन श्रोतेच दिले नाहीत तर एक नवीन विचार प्रक्रिया देखील दिली आहे”. प्रत्येक प्रसारण माध्यमात हीच क्रांती दिसून येते असे ते म्हणाले.
 
देशातील सर्वात मोठे डीटीएच व्यासपीठ असलेल्या डीडी फ्री डिशच्या सेवा 4 कोटी 30 लाख घरांपर्यंत पोहचत असल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरातील माहिती कोट्यवधी ग्रामीण कुटुंबांपर्यंत आणि सीमेजवळील भागातील घरापर्यंत वास्तविक वेळेत पोहोचत आहे असे त्यांनी सांगितले. अनेक दशकांपासून वंचित राहिलेल्या समाजातील घटकांपर्यंत शिक्षण आणि मनोरंजनही पोहोचत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “यामुळे समाजातील विविध घटकांमधील असमानता दूर झाली आहे आणि प्रत्येकाला दर्जेदार माहिती उपलब्ध झाली आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले.
 
देशातील रेडिओचे क्षेत्र विस्तारले
 
देशातील 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये 91 नवीन एफएम ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. या विस्ताराचा विशेष भर आकांक्षी जिल्ह्यांमध्ये आणि सीमावर्ती भागातील व्याप्ती वाढवण्यावर आहे. यामधे बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, लडाख आणि अंदमान आणि निकोबार बेटे, अशा विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा यात समावेश आहे. आकाशवाणीच्या एफएम सेवेच्या या विस्तारामुळे, ज्यांना या माध्यमाची कनेक्टिव्हीटी उपलब्ध नव्हती त्या अतिरिक्त 2 कोटी लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार असून सुमारे 35,000 चौरस किमी क्षेत्र विस्तारले जाणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121