मुंबई : सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी सध्या पाळीव हत्तींचा अभ्यास करण्यास सुरुवात केलेली आहे. संभाजी, महानायक, पानिपत अशा अनेक गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्यानंतर पुन्हा एकदा शिवकाल उभा करण्याचे विश्वास पाटील ठरवत आहेत. शिवकाल निर्माण करावा म्हणजे त्यांनी ज्या प्राण्यांसोबत काम केले होते त्या प्राण्यांना समजून घेणे व त्यांच्या अभ्यास करणे गरजेचे आहे असे पाटील म्हणतात.
विश्वास पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्ट वरून याची माहिती देताना सांगितले, "इतिहास लेखनासाठी काझीरंगा जंगल पट्ट्यासह इतर भागात हत्तींचा अभ्यास सुरु आहे. हत्ती घोड्यांच्या वर्णनाशिवाय ऐतिहासिक लेखकाचा प्रवासच अपूर्ण पडतो. पूर्वी अगदी मौर्य काळापासून सुसंस्कृत माणसांसोबत हत्ती नागरी जीवनामध्ये आला. लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी, इंदिरा गांधी हे देखील जमना पार जाऊन सर्कशीचा आनंद लुटत असत. अश्वविद्येप्रमाणे आता थोडी हस्तिविद्या समजून घ्यावी या उद्देशाने माझी देशाच्या जंगलातून भटकंती सुरु आहे."