पंतप्रधानांचा उद्यापासून दक्षिण ते उत्तर ‘पॉवरपॅक्ड’ दौरा
३६ तास, ५ हजार किमी, ७ शहरे आणि ८ कार्यक्रमांना उपस्थिती
22-Apr-2023
Total Views | 108
24
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून म्हणजे २४ एप्रिलपासून ३६ तासांत देशाच्या विविध भागांमध्ये ५ हजार किमी पेक्षा जास्त अंतराचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. यादरम्यान ते आठ कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि सात वेगवेगळ्या शहरांचा प्रवास करणार आहेत.
पंतप्रधानांच्या प्रदीर्घ दौऱ्याची माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान २४ एप्रिलला सकाळी प्रवासाला सुरुवात करतील. ते दिल्ली ते खजुराहो असा सुमारे ५०० किलोमीटरचा प्रवास करतील. खजुराहोहू ते रीवा येथे जाऊन राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर ते खजुराहोला परत येतील. या प्रवासात ते २८० किमीचे अंतर पार करतील. त्यानंतर १७०० किमीचा प्रवास करून ते केरळमधील कोची येथे युवम कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळी, पंतप्रधान कोची ते तिरुअनंतपुरम असा सुमारे १९० किमीचा प्रवास करतील आणि वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. तेथून सुरतमार्गे सिल्वासा येथे १ हजार ५७० किलोमीटरचा प्रवास करतील. तेथे ते नमो वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर पंतप्रधान पुढे देवका सीफ्रंटच्या उद्घाटनासाठी दमणला प्रयाण करतील, त्यानंतर ते सुरतला जातील. यावेळी सुमीरे ११० किमीचा प्रवास ते करतील. त्यानंतर सुरतहून पुढे ९४० किमी प्रवास करून ते दिल्ली येथे पोहोचतील. यामध्ये पंतप्रधान केवळ ३६ तासांमध्ये ५ हजार ३०० किमीचा प्रवास करणार आहेत.