‘पीएफआय’ आता शाळेमध्ये!

    22-Apr-2023
Total Views | 186
NIA attaches Pune school's 2 floors used by PFI for camps
 
नुकतेच ‘एनआयए’ने पुण्यातील कोंढवा भागातील ‘ब्लू बेल’ शाळेतील दोन मजल्यांना ‘सील’ केले. या शाळेचा गैरवापर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेने युवकांना दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी केल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्यावर्षी दि. २२ सप्टेंबरला ‘एनआयए’ने या मजल्यांची तपासणी केली होती. आक्षेपार्ह कागदपत्रे, भारत सरकारविरोधी कारवाया, तसेच प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून युवकांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी या जागेचा वापर केला गेला. त्यानिमित्ताने...

दहशतवादासाठी शाळेचा गैरवापर

‘पीएफआय’ला २०४७ पर्यंत भारतात इस्लामिक राजवट आणायची आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी ‘पीएफआय’ने आपले जाळे विणले होते. पण, ‘पीएफआय’वर मोदी सरकारने बंदी घातली.पण, तरीही शाळा ही एक उत्तम ‘कव्हर’ ठरू शकते, हे लक्षात घेऊनच ‘पीएफआय’ने पुण्यातील या शाळेचा वापर आपल्या राष्ट्रविरोधी कारवायांसाठी करून घेतला. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी संबंधित शाळेचे मान्यतापत्र तपासल्यानंतर बर्‍याच गोष्टी उघड झाल्या. या मान्यतापत्रावर शिक्षणउपसंचालकांची स्वाक्षरीसुद्धा बनावट असल्याचे आढळून आले. शाळेचा मान्यता क्रमांकही एका मेडिकल बिलाचा असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. अशा या शाळेच्या इमारतीत वरच्या दोन मजल्यांवर दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे ‘एनआयए’ने म्हटले आहे. शाळेसारख्या ठिकाणी अशाप्रकारचे प्रशिक्षण देणे सोपे होते. कारण, कुणालाही संशय येणार नाही, असे हे ठिकाण. म्हणूनच एखादी जागा भाड्याने देताना किंवा कुणालाही वापरायला देताना सर्वसामान्यांनी किती दक्षता घेतली पाहिजे, हा या प्रकरणातून शिकण्यासारखा धडा.

दहशतवादी संघटना आणि प्रशिक्षण
 
जगातील दहशतवादी संघटनांचा अभ्यास केला तर असे आढळते की, प्रशिक्षण देणे हा त्यांच्या कुटिल हेतूला साध्य करण्यापैकी एक महत्त्वाचा टप्पा. नायजेरियातील ‘बोको हराम’सारखी दहशतवादी संघटना सदस्यांना स्फोटके, विमानविरोधी बंदुका वापरण्याचे प्रशिक्षण देते. ‘इसिस’सारखी संघटना तर शाळेत चक्क स्वत:चा अभ्यासक्रमही राबवत होती. पुस्तकांमध्ये सर्रास बंदुकांची चित्रे, टाईम बॉम्बस्फोटकांची चित्रे छापलेली असत. इतकेच नाही, तर लहान मुलांना त्यांच्याच पालकांना ठार मारण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यामुळे दहशतवादी संघटना आपला प्रशिक्षण कार्यक्रम सतत राबविण्याचा प्रयत्न करत असतात.त्याचबरोबर या दहशतवादी संघटना आपल्या विचारधारेला पूरक व्यक्ती हेरत असतात आणि या ‘ब्रेनवॉशिंग’ प्रक्रियेत जो जास्त प्रभावित होतो, त्याला आपला सदस्य बनवून घेतात. त्या व्यक्तीला मग अनेक वेळा ‘जहरी विचारधारा’ आणि आपल्यावर होणारा ‘तथाकथित अन्याय’ याचे डोस पाजले जातात. हल्ली हे सर्व ऑनलाईनसुद्धा केले जाते. या दहशतवादी संघटना तर आपले सदस्य ऑनलाईन हेरतात. ‘अल कायदा’ने मोठ्या प्रमाणात ऑनलाईन प्रशिक्षण दिले असल्याचे कित्येक प्रकरणांतील तपासानंतर उघड झाले होते.

या प्रशिक्षणातील पुढचा टप्पा म्हणजे, मग व्यक्ती म्हणून तो दहशतवादी त्या संघटनेसाठी किती मोलाचा आहे, तसेच त्याच्यात किती क्षमता आहे, याचे गुणगान गायले जाते. नंतर त्याला शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर त्याची कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयारी केली जाते. त्याचे कृत्य मुळातच किती पवित्र कार्याचा भाग आहे, हे त्याला अगदी पद्धतशीरपणे पटवून दिले जाते. त्याच्या कृत्याचे उदात्तीकरण करणारी आणि बुद्धीला पटणारी कारणे त्याला अगदी बेमालुमपणे दिली जातात. अन्यायाचा प्रतिशोध घेणे कसे महत्त्वाचे आहे इत्यादी त्याच्या मनावर अगदी ठासून पटवून दिले जाते. मग हळूहळू ही व्यक्ती आपल्या सामाजिक जीवनातून वेगळी होत जाते. आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून दूर जाऊ लागते. काही जण कुटुंबासोबत असले तरी मनाने अलिप्त होत जातात. काही जण घर सोडून देतात. मग त्यांचे मन पूर्णपणे एकाच विकृत ध्येयाने भारले जाते. टार्गेट ठरते. दिवस आणि वेळ पण ठरते. व्यक्ती जास्तीत जास्त एकांतवास स्वीकारत जाते. शेवटी ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी स्वत:ला स्फोटकाने उडवून दिले जाते. आत्मघातकी दहशतवाद हा असा भयंकर असतो. यात प्रशिक्षण हा भाग सगळ्यात महत्त्वाचा ठरतो, यात कदापि शंका नाही.

‘पीएफआय’ या आता बंदी घातलेल्या संघटनेचे प्रशिक्षण छुप्या पद्धतीने चालू होते. ‘फिजिकल एज्युकेशन’, ‘फिटनेस’ आणि ‘योगा सेंटर’ यांच्या नावाखाली तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात होते. ‘एनआयए’ने ‘पीएफआय’वरील देशभरात केलेल्या कारवाईत काही महत्त्वाची कागदपत्रे मागेच हस्तगत केली होती. त्यात भारताला २०४७ पर्यंत इस्लामी राजवटीत रुपांतरीत करणे हे ध्येय असल्याचे पूर्वीच उघडकीस आलेले आहे. त्यासाठी काही टप्पे ठरवून प्रशिक्षण देणे महत्त्वाचे मानलेले होते.पहिला टप्पा हा प्रशिक्षणाचा. जिथे शक्य तिथे मुस्लिमांचे ऐक्य साधणे आणि त्यांना ‘पीएफआय’च्या झेंड्याखाली एकत्र आणणे. ‘भारतीयत्त्व’ या पलीकडे जाऊन ‘इस्लामिक’ अशी प्रत्येकाची ओळख प्रस्थापित करायची. ‘फिजिकल एज्युकेशन’ (पी.ई) विभागाच्याद्वारे त्यांना हल्ला चढवण्याचे आणि संरक्षणाचे, तलवार चालवणे, रॉड आणि अन्य शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यात म्हटले होते.
 
दहशतवादी संघटना आणि प्रशिक्षणाचे ठिकाण

दहशतवादी संघटना आपल्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अशा जागा हेरतात की, ज्यांचा जरासाही संशय येणार नाही. कारणष शाळा, ‘फिटनेस सेंटर’ या ठिकाणांविषयी समाजात फार वेगळी प्रतिमा असते. त्या ठिकाणी असे काही होईल, अशी साधी कल्पनासुद्धा कुणी केलेली नसते. त्यामुळे सुरक्षारक्षकांना आरामात हुलकावणी देता येते. अमेरिकेत २०१८ मध्ये न्यू मेक्सिको येथे एका लहानशा कॅम्पसाईट वर मुलांना शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यांना शाळेत गोळीबार करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते, असा निष्कर्ष काढण्यात आला होता.काही वेळा धार्मिक स्थळांचा वापरसुद्धा प्रशिक्षणासाठी केला जातो. काही वेळा ‘सेफ हाऊसेस’चा वापर केला जातो. गावाबाहेरील घरे, फारसे कुणी येत नाहीत, अशी ठिकाणे अशा छुप्या कारवाया आणि प्रशिक्षणासाठी वापरली जातात. ‘९/११’चा हल्ला चढवणार्‍या दहशतवाद्यांनी तर स्वतंत्र अपार्टमेंट हॅम्बुर्ग येथे घेतली होती. त्यामुळे त्यांना ‘हॅम्बुर्ग सेल’ हे नाव पडले. तेथे हल्ल्याचा कट शिजला. विशेष म्हणजे, हे सगळं सुरु असताना शेजार्‍यांना जराही संशय आला नाही. कारण, दहशतवाद्यांचे वागणे अगदी सर्वसामान्य होते.

‘पीएफआय’ आणि आधीचे गुन्हे

१. दि. १३ ऑगस्ट, २०१० ला अलुवा पोलिसांनी ‘पीएफआय’च्या सहा सदस्यांना अटक केली. त्यांच्याकडून हिंदू आणि ख्रिश्चन धर्माविषयी विखारी प्रचार करणार्‍या पुस्तिकांच्या ३२० प्रती जप्त केल्या गेल्या. संदर्भ- सिक्स पीएफआय अ‍ॅक्टिव्हीस्ट हेल्ड, द हिंदू, चेन्नई, १४ ऑगस्ट २०१०

२ . केरळ सरकारने २०१२ साली केरळ उच्च न्यायालयात स्पष्ट केले होते की सीपीआय -एम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या २७ कार्यकर्त्यांच्या हत्येमध्ये ‘पीएफआय’चा हात आहे. संदर्भ - ‘पीएफआय इज बॅनड आउटफीट सिमी इन अदरफॉर्म, केरला गर्व्हमेंटटेल्स एचसी. ’द इंडियन एक्स्प्रेस, दि. २६ जुलै, २०१२

३. कुन्नूरच्या नारथ येथे २०१३ साली ‘पीएफआय’ने ट्रेनिंग कँप चालवला होता. पोलिसांनी धाड टाकून तलवारी, गावठी बॉम्ब इ. जप्त केले होते. संदर्भ - केरला कॉपकन्फर्म पॉप्युलर फ्रंट टेरर कॅम्प इन कुन्नूर, द पायोनियर, इंडिया, दि. २५ एप्रिल, २०१३

४. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता एन. सचिन गोपाल आणि विशाल यांची हत्या कँपसफ्रंट आणि ‘पीएफआय’ यांनी केली. संदर्भ- बॅन ऑर्डरस इन चेन्गानुर, माव्हेल्लीकरा, द न्यूज इंडियन एक्स्प्रेस.

५. ‘पीएफआय’ने ईशान्य भारतातून आलेल्यांच्या विरोधात ६० दशलक्ष एसएमएस दि. १३ ऑगस्ट, २०१२ ला पाठवले. पुणे, चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीतून सुमारे ३० हजार लोक ईशान्य भारतात परतले. यातील ३० टक्के एसएमएस पाकिस्तानमधून अपलोड केले गेले होते. गृहमंत्रालयाने १५ दिवस बल्क एसएमएसवर बंदी घातली. संदर्भ- दास, समीर कुमार २०१३ गव्हर्निंग इंडियाज नॉर्थ ईस्ट- एसेओन इन्सरजन्सी, डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड कल्चर ऑफ पीस., तसेच केरल बेस्ड पीएफआय ग्रुप ट्रीगरड हेट एस.एम.एस. लीडिंग टू नॉर्थ ईस्ट एक्सोडोस, बिहारप्रभा, रीट्रीव्ह दि. १४ मे, २०१४
 
६. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सुद्धा ‘पीएफआय’वर बंदी घालावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. कारण, तेथे धोलपूरच्या गोरुखुती भागात अतिक्रमण हटवत असताना जो हिंसक प्रतिकार केला गेला, त्यात ‘पीएफआय’चा हात असल्याचे पुरावे आसाम सरकारकडे आहेत. सिफाजर, लुमडिंग आणि बारचल्ला या ठिकाणच्या जमिनीवर धिंग, रुपोहीतात आणि लाहोरीघाट या मुस्लीमबहुल भागातून येऊन जाणीवपूर्वक दर पाच वर्षांनी अतिक्रमण केले जाते आणि तेथील लोकसंख्या बदलली जाते. - दि इकोनॉमिक्स टाईम्स, दि. २६ सप्टेंबर, २०२१. म्हणजेच बहुसंख्य होऊन देशातील मतदानाचे निकाल आपल्या बाजूने वळवणे, हा त्यामागचा उद्देश.

दहशतवादासाठी कोट्यवधींचे फंडिंग

‘पीएफआय’च्या मालकीच्या चार ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने काही दिवसांपूर्वी धाड टाकली. त्यात केरळमधील कुन्नूर, मलप्पुरम, एर्नाकुलम आणि मुन्नार या ठिकाणच्या ‘पीएफआय’च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मालमत्ता तपासल्या गेल्या. त्यात अनेक कागदपत्रे हाती आली. त्यानुसार केरळच्या ‘मुन्नार व्हिला व्हिस्टा’ प्रकल्पासह अनेक प्रकल्प हे अवैध मालमत्ता वापरात आणण्यासाठी उभारत असल्याचे आढळून आले. ‘पीएफआय’च्या नेत्यांनी परदेशात विशेषतः अबुधाबी येथेही बार-रेस्टॉरंट चालवायला घेतलेले आहेत. देशविदेशात मोठ्या प्रमाणात ‘रिअल इस्टेट’चा व्यवसाय करून ‘पीएफआय’तर्फे मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवण्यात आली आहे.‘सीएए’ नागरिकत्त्व सुधारणा कायदाच्या विरोधासाठी दिल्ली, अलीगढ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना पैसा पुरवल्याच्या संशयावरून ‘पीएफआय’ आणि ‘आरआयएफ रिहॅब इंडिया फाऊंडेशन’ यांच्यावर आधीच केंद्र सरकारची पाळत होती. तसेच, ‘रिहॅब इंडिया फाऊंडेशन’ यांसारख्या संघटनांनी काही ‘एनजीओं’वर आपले नियंत्रण मिळवून पैशांचा गैरवापर, अवैध मालमत्ता उभी केलेली आहे.

‘पीएफआय’ची सद्यःस्थिती काय?

जरी ‘पीएफआय’वर केंद्र सरकारने पूर्णपणे बंदी घातली असली तरी या संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय आहेत, असे दिसून येते. समाजात तेढ निर्माण करणे आणि प्रत्येक घटनेत इस्लाम धर्म कसा असुरक्षित आहे, हेच वारंवार समाजात ठसवणे, त्यातून समाजात सहानुभूती मिळवणे हा त्यामागचा हेतू. पहिल्या टप्प्यावर ‘फिजिकल एज्युकेशन’ विभाग अगदी प्रभावी व्हावा, आपल्या हितसंबंधांच्या आड येणार्‍या प्रत्येकाला ठार करावे, आपल्या विरोधकांच्या सुरक्षा यंत्रणांच्या विरोधात या विभागाने आपल्या संरक्षणाचे काम करावे, इस्लामच्या तत्त्वांवर आधारित राज्यघटना आपण जाहीर करून ती लागू करावी, या टप्प्यात परकीय मदतसुद्धा मिळेल, अशी ही सगळी भयंकर योजना आहे. यासाठी इस्लामी नागरिकांनी सतर्क राहण्याची खरी गरज आहे. ज्यांना हिंसाचार मान्य नाही, ज्यांना राष्ट्र महत्त्वाचे वाटते, त्या सगळ्या नागरिकांनी सजग राहिले पाहिजे. कारण, दहशतवादी हिंसाचारात शेवटी सर्वधर्मीय नागरिकच बळी पडतात. पुण्यातील घटनेमुळे ‘पीएफआय’चे जाळे किती विस्तृत आणि खोलवर रुजलेले आहे, याचा आणखीन एक पुरावा समोर आलेला आहे.म्हणूनच भारतीय नागरिकांनी कोणत्याही विचारधारेला बळी न पडता नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावणे महत्त्वाचे आहे. आपल्या आजूबाजूला जर कुणी देशविघातक कृत्य करत असल्याचा संशय आला, तर त्वरित सुरक्षा यंत्रणेला त्याविषयी कळवले पाहिजे. हाच बचावाचा मार्ग आपल्याकडे आहे.




-रुपाली कुळकर्णी-भुसारी



 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121