तथ्याधारित लेखनाचा तपस्वी

    21-Apr-2023   
Total Views |
pankaj kaluwala

गेले एक तप मनोरंजनाऐवजी तथ्याधारीत लिखाण करणारे तपस्वी लेखक पंकज कालुवाला यांच्याविषयी...

मुंबईत माहिम येथे जन्मलेल्या पंकज कालुवाला यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण मुंबईतच झाले. त्यांचे आजोळ पूर्वाश्रमीच्या ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील दातिवरे गावी असल्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुन्हा मुंबई गाठली. शाळा आणि महाविद्यालयात विज्ञानकथांची आवड त्यांना निर्माण झाली. शाळेच्याच ग्रंथालयातील पुस्तकं वाचण्यास शिक्षकांनी कधीही आडकाठी केली नाही. परिणामी, त्यांना विविध विषयांवरील पुस्तकं वाचता आली. निरंजन घाटे व प्रा. भालबा केळकरांसारखे विज्ञानलेखक पुस्तकरुपाने तेथेच भेटले व त्यातून विज्ञानासारख्या विषयाची गोडी लागली. मग जयंत नारळीकर, अरुण मांडे, डॉ. वसंतराव गोवारीकर, कोगेकर, प्रा. अ. बा. जोशी, डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी आणि इतरही विज्ञान लेखकांनाही त्यांनी वाचले आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यातून लिखाणाची आवड वाढत गेली.

निरंजन घाटे, लक्ष्मण लोंढे, जयंत नारळीकर यांच्या लिखाणाचा प्रभाव त्यांच्यावर होता. जे वाचले, आवडले आणि जे समजले नाही ते जाणून घेण्यासाठी ते नियमितपणे पत्र लिहून संवाद करत. विज्ञानाच्या ओढीतून त्यांनी विज्ञान शाखेत पदवी मिळवली. त्यातून विज्ञानकथा लिहिण्यास सुरुवात केली. त्या कथांना वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला. कालुवाला यांच्या लिखाणाची पहिली वाचक म्हणजे त्यांची आई. तिची प्रतिक्रिया त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असायची. तिला आवडलं, समजलं की, ते वाचक स्वीकारतात, असा त्यांचा अनुभव होता.

कालुवाला हे साधारण २०१० पासून लिखाण करत असून विज्ञान, युद्ध आणि गुप्तचर यंत्रणा यावर त्यांची १६ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. १९६२च्या चिनी आक्रमणात तत्कालीन राज्यकर्त्यांचे दोष होते, हे सत्य कोणी दुखावेल म्हणून त्यांनी नाकारले नाही. तसेच, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गुप्तचर यंत्रणांचे सबलीकरण केल्याची नोंदही ते आवर्जून घेतात. सध्या १९६५ आणि १९७१ या दोन युद्धांवर ते पुस्तक लिहिण्याचे काम करत आहेत.

“संवेदनशील विषयांवर लिहिताना काळजी घ्यावी लागते. मोह टाळून देशहित लक्षात घेऊन लिहावे लागते. उथळपणा टाळून संदर्भ तपासून वास्तविक माहिती द्यावी लागते. मिळणारी माहिती तपासून घ्यावी लागते. केवळ लेखक म्हणून मिरवण्याऐवजी लिखाण ही सेवा मानून काम केले, तर कसदार मजकूर देता येतो. वाचन कमी होत आहे, हा अपप्रचार आहे. वाचन संस्कृती धोक्यात आली आहे, हे सांगणे ‘फॅशन’ झालेली आहे. वाचकांच्या भावना, त्यांच्या बदलत्या धारणा, माहिती मिळवण्याची त्यांची भूक आणि नवेपणाचा वाचकांना लागलेला ध्यास हे लक्षात घेऊन लिखाण करणे आवश्यक आहे,” असे कालुवाला सांगतात.

संस्कारक्षम जाणत्या वयाचा व तारुण्यातला काळ ठाण्यात व्यतित केल्याचा मोठा प्रभाव त्यांच्या आयुष्यवर पडला. त्यांना वाचनासह पुस्तकं जमवणं, चित्रकला, आकाश निरीक्षण, सुतारकाम, बागकाम आदी छंद आणि आवड आहे. चाकोरीबद्ध वाट सोडून वेगळी वाट निवडायची म्हटली की, अडचणी येतातच. तशा कालुवाला यांनाही अडचणी आल्याच. लेखक व्हायचंय, हा निर्णय आधीच घेतला असला, तरी त्याची नेमकी वाट त्यांना दिसत नव्हती. अशा वेळी जयप्रकाश नारायण विद्यालय, आगरवाडीचे मराठी भाषा विषयाचे शिक्षक डॉ. नेताजी पाटील आणि भावना पाटील मदतीला धावून आल्या. निरनिराळ्या वर्तमानपत्रांकडे, मासिकांकडे लेखन पाठवित असले, तरी त्याकडे कुणीही ढुंकूनही पाहत नव्हते. डॉ. नेताजी पाटील यांना लेखन दाखविल्यानंतर त्यांनी त्या लेखनाचं कौतुकही केलं, मार्गदर्शनपर सूचनाही केल्या. इतकंच नव्हे, तर स्वत:च्या माहितीतल्या संपादकांशी संपर्क साधून त्यांनी काही मासिकं व दिवाळी अंकातून ते लेखन छापून येईल, अशी तजवीज केली, शिवाय त्या मासिकांचे अंक स्वखर्चाने वाटलेही होते.

नाशिकचे पक्षिमित्र दिगंबर गाडगीळ यांनी कालुवाला यांना ‘सायन्स फीचर्स’साठी लिहिण्यास उद्युक्त केले. ठाणे येथील आपला ‘परममित्र’ या द्वैमासिकाविषयी कळल्यानंतर संपादक माधव जोशी यांना त्यांनी एक लेख पाठविला. जोशी यांनी तो छापलाच शिवाय अपेक्षेपेक्षा अधिक मानधनही दिले. त्यानंतर ओळख वाढली व ‘परममित्र’साठी ते नियमितपणे लिहू लागले. २००४-२००५ च्या सुमारास हे योग जुळून आले आणि पुढील वाटचाल सुरु झाली. डॉ. नेताजी पाटील, दिगंबर गाडगीळ, माधव जोशी यांच्याबरोबरच दै. ‘तरुण भारत’ सोलापूर आवृत्तीचे माजी संपादक अरुण करमरकर व मकरंद मुळे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य मिळाले.

२०१२ साली दोन विज्ञानाची व एक हेरगिरीवरील अशी तीन पुस्तके माधव जोशी यांनी प्रकाशित केली व इतरही पुस्तंकं प्रकाशित झाली. ‘राजकीय हत्या’ या पुस्तकाला २०१६-१७चा पुण्याच्या समाज विज्ञान मंडळ न्यासाचा ‘कोशकार स.मा.गर्गे पुरस्कार’ मिळाला. १९९८ ते २००७ या काळात विज्ञान प्रसारासाठी ‘अभिनव सायन्स क्लब’ नावाचा उपक्रम विज्ञान प्रसार, नवी दिल्ली या संस्थेच्या साहाय्याने त्यांनी चालविला.

‘’नव्या पिढीला संदेश देण्याइतके आपण मोठे नाही. तरीही नव्या पिढीने स्वत: मधील गुण ओळखावेत. आपली बलस्थाने, आवड ओळखून, त्यांची जोपासना करावी व त्यांचा वापर राष्ट्रहितासाठी कसा करता येईल, याचा सतत विचार करावा,” असे आवाहन करणार्‍या पंकज कालुवाला यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

९३२००८९१००

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.