राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा परिसरातील ‘ब्लू बेल’ या शाळेचे दोन मजले ‘सील’ केले. याठिकाणी दहशतवादी कारवायांकरिता सशस्त्र आणि नि:शस्त्र लढा कसा लढावा, याचे प्रशिक्षण ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून दिले जात होते, असा दावा ‘एनआयए’कडून करण्यात आला आहे. त्यामुळे दहशतवादी कारवायांसाठी शाळेचा वापर केला जाणे अत्यंत धक्कादायक आहे. स्थानिक पोलीस यंत्रणा आणि त्यांचे खबर्यांचे जाळे अधिक घट्ट करण्याची वेळ आलेली आहे. पुणे हे कायमच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिलेले आहे. यापूर्वीदेखील ‘इंडियन मुजाहिद्दीन’ने पुण्यात आपले ‘मोड्यूल’ सक्रिय केलेले होते. आजही अर्धा डझन पुणेकर धर्मांध तरुण पाकिस्तान आणि आखाती देशात राहून आपले नेटवर्क चालवित असल्याचे यंत्रणांचे म्हणणे आहे. दहशतवाद्यांनी दि. १३ फेब्रुवारी, २०१० रोजी पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये ‘इंडियन मुजाहिद्दीन’ने बॉम्बस्फोट घडवला होता. या घटनेत एकूण १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यामध्ये भारतीयांसह सुदान, इटली, नेपाळ, इराणच्या नागरिकांचाही समावेश होता. कोंढव्यातील अशोका म्यूज सोसायटीमधून चालणारे ‘आयएम’चे मोड्यूल महाराष्ट्र ‘एटीएस’ने उघडकीस आणले होते. दि. १ ऑगस्ट, २०१२ रोजी जंगली महाराज रस्त्यावर सलग पाच ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात आले. ‘सिमी’च्या मध्य प्रदेशातील दहशतवाद्यांनी दि. ११ जुलै, २०१४ रोजी थेट फरासखाना पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट घडवत यंत्रणांना आव्हान दिले होते. परंतु, २०१४ साली राज्य आणि केंद्रात सरकार बदलल्यानंतर आजवर कोणत्याही मोठ्या दहशतवादी कारवाया झालेल्या नाहीत. सतर्क यंत्रणांमुळे ‘पीएफआय’चा निर्माण होऊ घातलेला तळ उद्ध्वस्त झाला आहे. ‘पीएफआय’च्या देशविघातक आणि विखारी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्यापासून ते आर्थिक रसद निर्माण करण्यासाठी काम करणार्यांना पुण्यामधून अटकदेखील करण्यात आलेली आहे. मुख्यत्वे ही कारवाई कोंढवा परिसरातच पुन्हा करण्यात आलेली आहे. ‘पीएफआय’वरील पुण्याच्या कारवाईच्या निमित्ताने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सतर्क यंत्रणा आणि मजबूत सरकार यामुळे संभाव्य घटना टळल्या आहेत. परंतु, सर्वसामान्य नागरिकांनी किती सतर्क राहणे आवश्यक आहे.
अभिव्यक्ती म्हणजे स्वैराचार नव्हे
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या सोयीनुसार जर बदलत गेल्या, तर मात्र भविष्यामध्ये नवी समस्या निर्माण होऊ शकते. मागील काही दिवसांत दोन-तीन तरुणांच्या कथित रॅप साँगवरून गदारोळ माजला आहे. या गाण्यांमधून समस्या आणि वेदना मांडण्याचा दावा करण्यात आला. मात्र, हा दावाच तकलादू आहे. हे ‘रॅप साँग’ महाविकास आघाडी सरकारच्या काळात का तयार करण्यात आले नाहीत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. या तरुणांच्या कथित समस्या केवळ भाजप-शिवसेनेचे नूतन सरकार सत्तेत आल्यावरच अस्तित्वात आल्या आहेत की काय? त्यामुळे जाणीवपूर्वक असे प्रकार केले जात आहेत की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. कोणत्याही गाण्याचा आत्मा त्याच्या संगीत आणि शब्दात असतो. शब्दांना धार असणे गैर नाही. पण, त्यामध्ये खोलीदेखील असली पाहिजे. या गाण्यांमध्ये वापरण्यात आलेली अश्लिल भाषा ही कोणत्या वैचारिक पातळीचे द्योतक आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील एका तरुणाने सुट्टीच्या दिवशी बेकायदेशीरपणे एक ‘रॅप साँग’चे शुटिंग केले. गाण्यात शुटिंगदरम्यान, तलवारी, चाकू अशी शस्त्रे वापरण्यात आल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. याची गंभीर दखल घेत माजी आयपीएस अधिकारी जयंत उमराणीकर यांची समितीदेखील नेमण्यात आली आहे. या ‘रॅप साँग’वरूनही सध्या वादंग उठलेला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लिल आणि समाजमान्य नसलेल्या भाषेत व्यक्त होणे टाळणे आवश्यक आहे. ही गाणी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होतात. झपाट्याने ती प्रसारित होत जातात. लहान मुलेदेखील ती पाहतात. वैचारिक प्रबोधनच करायचे असेल, तर अनेक कवी-गीतकारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता येऊ शकतो. पोवाडे, ओव्या, भजन, फटका, भारुड, गण-गवळणअसे असंख्य काव्य प्रकार मराठीमध्येही निर्माण झालेले आहेत. या सर्व काव्य प्रकारांच्या संगीताला स्वत:चा एक बाज आहे. त्यामधून आजवर अनेकांनी समस्या, व्यथा मांडण्यासोबतच प्रबोधनाचेही काम केले आहे. ‘रॅप साँग’च्या नावाखाली शिव्यांची सरबत्ती करून कोणताही सकारात्मक बदल घडणार नाही. त्याउलट समस्या अधिक बिकट होत जाईल. सकारात्मक बदलासाठी सकारात्मक मानसिकतेमधून काम करणे आवश्यक आहे.
लक्ष्मण मोरे