तरुण चित्रकार ‘कुडलय्या’ (की कुडल्या?) हिरेमठ यांच्या जलरंग माध्यमातील कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर कलादालनात सुरू आहे. त्यांच्या प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा त्यांची जरी भेट झाली नसली, तरी त्यांच्या कलाकृती खूप काही सांगून गेल्या. कलाकारांची ओळख ही त्यांच्या कलाकृतींद्वारे होत असते. हिरेमठ यांची ही ओळख अशाच पद्धतीची आहे. त्यांच्याविषयी लिहिण्यापेक्षा त्यांच्या कलाकृतीविषयी आणि त्यांच्या चित्रांविषयी लिहिणं अधिक संयुक्तिक होईल. कारण, त्यांची कलासाधना ज्या दिशेने चालली आहे, ती अद्भुत आहे. त्यांच्या कलाकृतींचं आयुष्य फक्त एकाच प्रदर्शनापुरतं नाही, हे पाहणार्याच्या लगेच ध्यानात येईल.
आपली प्राचीन संस्कृती, आदर्श रुढी, आदर्श परंपरा यांच्या बाबतीत थोडासा जरी शांत चित्ताने विचार केला, तरी त्यांच्यातील गूढगम्य, आशयगर्भतेचा अंदाज येतो. आधुनिकतेच्या अग्निरथात असंख्य प्रवासी जीवनप्रवासात निघालेले आहेत. त्यातच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ याला कृत्रिम बुद्धिमता म्हटलं तर चालेलं का? हा प्रश्न आहेच. या नव्या विचारसरणीचा ‘ट्रेंड’ जागतिक स्तरावर मान्य होत असतानाच कुठेतरी दृश्यकला क्षेत्रात, प्राचीन संस्कृतीला आधुनिक तंत्रशैलीत व्यक्त करताना एखाद्या दृश्यकलाकाराला पाहायला मिळाले की समाधान वाटते.
तरुण चित्रकार ‘कुडलय्या’ (की कुडल्या?) हिरेमठ यांच्या जलरंग माध्यमातील कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर कलादालनात सुरू आहे. त्यांच्या प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा त्यांची जरी भेट झाली नसली, तरी त्यांच्या कलाकृती खूप काही सांगून गेल्या. कलाकारांची ओळख ही त्यांच्या कलाकृतींद्वारे होत असते. हिरेमठ यांची ही ओळख अशाच पद्धतीची आहे. त्यांच्याविषयी लिहिण्यापेक्षा त्यांच्या कलाकृतीविषयी आणि त्यांच्या चित्रांविषयी लिहिणं अधिक संयुक्तिक होईल. कारण, त्यांची कलासाधना ज्या दिशेने चालली आहे, ती अद्भुत आहे. त्यांच्या कलाकृतींचं आयुष्य फक्त एकाच प्रदर्शनापुरतं नाही, हे पाहणार्याच्या लगेच ध्यानात येईल.
भारतीय संस्कृतीत अत्यंत मानाचे स्थान प्राप्त केलेल्या गाईविषयीचं आणि बैल अर्थात नंदीबैलाविषयीचं हिरेमठ यांचं आकर्षण विशिष्ट श्रद्धेत परावर्तित झालेलं दिसतं. कारण, पारदर्शक जलरंग आणि जलरंगांप्रमाणे उपयोगात आणलेले ‘अॅक्रलिक रंग’ त्यांनी ज्या तन्मयतेने ‘कॅनव्हास’वर वा पेपरवर लेपले आहेत, त्यात त्यांची नैसर्गिक कल्पनाशक्तीच दिसून येते.
चल-अचल चित्र विषयांमध्ये महादेवाची पिंडी-नंदी जेव्हा दृष्टीस पडतात, तेव्हा आजूबाजूला वाढलेले गवत खाण्यासाठी आलेला बैल वा नंदी जो जीवंत भासतो. वास्तविक हे सारे चित्रघटक एका पृष्ठभागावर व्यक्त झालेले असतात. मात्र, पाषाणातील नंदीची मूर्ती आणि अवतीभवतीच्या वातावरणातून एखादा नंदी गवताचा आस्वाद घेताना दिसतो. लांब कुठेतरी काम करणारी माणसं देवळातील नादब्रह्माच्या अधीन झालेली घंटा आणि तिच्याशी संबंध जोडलेला सुंदर सजलेले नंदी दिसतो. एका आध्यात्मिक वातावरणाकडे हिरेमठांच्या कलाकृती घेऊन जातात.
महाराष्ट्रात संस्कृती आणि जुन्या परंपरा जतन करणारे गोंधळी, पिंगळा, वासुदेव, नंदीबैलवाले ही मंडळी भटकंती करुन उदरनिर्वाह करताना आपण अनेकदा पाहिलं असेल. आपण त्यांच्या खेळाकडे तेवढ्या पुरतेच पाहतो आणि दुसर्या एखाद्या बाबीत व्यस्त होतो. आपण त्यांच्या बाबतीत फारसा विचार करीत बसत नाही. चित्रकार हिरेमठ यांनी मात्र या सार्या विषयांकडे एका धार्मिक आणि सांस्कृतिक नजरेतून पाहिलेले दिसते.
एक संदर्भ असा आहे की, महाराष्ट्रात हे नंदीबैलवाले आले ते मूळ तामिळनाडूमधून. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना ‘ढवळा नंदीवाले’ म्हणतात. इतर ठिकाणी त्यांना ’तिरमाळी’ वा ‘तिरमळ’ म्हणतात. तिरुपती बालाजीच्या पर्वताला ‘तिरुमैल’ असे नाव आहे. नंदीवाले मूळचे तिकडचे असल्यामुळे त्यांना ‘तिरमळ’ असे नाव दिले गेले असावे. त्यांच्या भाषेत मराठी, हिंदी शब्दांचा उपयोग होतो. त्यामुळे कदाचित त्यांनी महाराष्ट्राला जवळ केले असावे. ‘पाटील नंदीवाले’, ‘ढवळा नंदीवाले’, ‘कोमटी नंदीवाले’ आणि ‘भांडी विकणारे नंदीवाले’ या चार प्रकारांत त्यांचा समाज पसरलेला आहे. हिरेमठ यांच्या कलाकृतीतील नंदीदेखील या चार प्रकारांच्या नंदींपैकी दिसतो. त्यांची सजावटदेखील भिन्न असते.
प्राचीन काळी धर्म तारण्यासाठी परमेश्वराने नंदीचे रूप घेतल्याचे संदर्भ आहेत. मग नंदीला शिवाचे वाहन, शिवाचे रूप ‘बळीराजाचा मित्र’ असेही मानले जाते. अशा अनेक धार्मिक पौराणिक आणि सांस्कृतिकतेशी नंदींचा संबंध आलेल्या हिरेमठांनी त्यांचा चित्रविषय बनविला. त्यांच्या चित्रांमधील दुसरी नायिका आहे, गाय. गाईला आपल्या भारतीय संस्कृतीत खूप मानाचे श्रद्धेचे स्थान आहे. भारतात गाईंच्या ‘डांगी’, ‘देवपी’, ‘गीर’ ‘खिल्लार’, ‘कांकरेज’, ‘ओंगल’ अशा विविध उपजाती आहेत. तिचे संपूर्ण शरीर पवित्र मानले जाते. तिच्या दुधापासून, तर गोमूत्र शेणापर्यंत प्रत्येक गोष्ट ही आयुर्वेदिक महत्त्व प्राप्त झालेली आहे.
हिरेमठांनी या सर्व बाबींचं महत्त्व विचारांत घेऊन गाय, तिचं वासरू, बैल, गोर्हा, खोंड, वळू, हत्ती, सिंह, वाघ या प्राण्यांशिवाय बुद्ध मंदिरे, भगवाध्वज श्रीविठ्ठल रूक्मिणी, लो. टिळक यांनाही त्यांचे चित्र विषय बनविले आहे. अनेक ठिकाणच्या अनेक ‘अँगल्स’नी पाहिलेली, विविध वेळी चितारलेली निसर्गचित्रणे पाहिल्यावर पाहणारा थक्क होतो. दुधाच्या किटल्या किंवा दुधाच्या चरव्या बांधलेल्या मोटरसायकल्स, पालखी दृश्य, ऐतिहासिक प्रसंग, महाभारतातील कुरूक्षेत्रातील श्रीकृष्णार्जुन प्रसंग अशाही विषयांना हिरेमठांनी स्पर्श केलेला आहे.
चित्रकाराने कोणत्या विषयघटकांवर कलाकृती साकारल्यात, यावर त्या कलाकृतींचा दर्जाही ध्यानात येतो आणि दृश्यकलाकारांची बैठक-प्रगल्भता ध्यानात येते. कल्पनाशक्तीला आणि कलासृजनाला वयाची अट नसते. एखाद्या मोठ्या ‘सेलिब्रिटी’ कंपूचा सदस्यच व्हायला पाहिजे, असेही नसते किंवा खूप वय झाले पाहिजे, असेही नसते. प्रतिभाशक्ती ही व्यक्त होण्यासाठी तणावरहीत मन, इच्छाशक्तीचे प्रकटीकरण आणि विचारांची पवित्र बैठक एवढेच हवे असते. हिरेमठ यांचे शारीरिक वय कदाचित लहानही असेल. मात्र, त्यांच्या रंगसाधनेतून साधलेल्या चित्रघटकांचं आणि कलाकृतीचं मोठेपण इतर मोठ्या म्हणवणार्या दृश्यकलाकारांच्या कलाकृतीतून कुठेही कमी वाटत नाही.
रंगांचे ’स्ट्रोक्स’, जलरंगांचे ’फ्लो’, पृष्ठभागाचा सफेद किंवा ’वॉश’चा ’निगेटिव्ह’ भाग जो हिरेमठांच्या कलाकृतीत ’पॉझिटिव्ह’ होतो, ही सारी किमया मला वाटते मानवनिर्मित नसते. मानवाकडून कुठलीतरी अद्भुत शक्ती हे सगळं करवून घेत असते. म्हणूनच त्यांनी ‘सिद्धा’ या नावे त्यांचे कलाप्रदर्शन योजले असावे. ‘इन्स्टाग्राम’वर, ‘फेसबुक’वरही त्यांच्या ’वॉल’ वरील कलाकृतीदेखील आशयगर्भ आहेत. त्यांच्या कलाप्रदर्शनासह एकूणच त्यांच्या कलाप्रवासाला दै. मुंबई तरुण भारत’च्या अनेक शुभेच्छा.
८१०८०४०२१३