नवी दिल्ली : एखाद्या समस्येपासून ते समाधानापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा खरा बुद्धांचा वास्तविक प्रवास आहे. बुद्धांचा मार्ग म्हणजेच भविष्याचा आणि शाश्वततेचा मार्ग असून भारत त्याच मार्गावर वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे गुरुवारपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी पंतप्रधानांनी आयोजित फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन करून बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बुद्ध हे एक व्यक्तिमत्व नाहीत, ते एक भावना आहेत. बुद्ध हे असे चैतन्य आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन होते, बुद्ध हा एक विचार आहे जो परिवर्तन घडवून आणतो आणि गौतम बुद्ध हा विवेक आहे जो प्रकट करण्याच्या पलीकडचा आहे.हा बुद्ध विवेक हा शाश्वत आहे, जो संपूर्ण मानवतेला एका धाग्यात बांधून ठेवतो, असे पंतप्रधानांनी म्हटले.
भगवान बुद्धांनी दाखवलेला सिद्धांत, सराव आणि अनुभूतीचा मार्ग अनुसरत भारताने गेल्या नऊ वर्षाच्या प्रवासात या तीनही तत्वांचे पालन केले, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी भारताने संपूर्ण समर्पण वृत्तीने आणि समर्पण भावनेने कार्य केले असे सांगून भारत आणि नेपाळ मधील बुद्धिस्ट सर्किट चा विकास, सारनाथ आणि कुशीनगर येथील नूतनीकरण कार्य, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्याने लुंबिनी येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध वारसा आणि संस्कृती केंद्राची स्थापना अशी कधी उदाहरणे पंतप्रधानांनी दिली.
मानवतेच्या प्रश्नांसाठी भारतात उपजत असलेल्या सहानुभूतीचे श्रेय पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या शिकवणीला दिले. भारताने राबवलेल्या शांतता मोहिमेचा आणि तुर्की मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपासारख्या आपत्तीमध्ये मदत कार्यात भारताने मनापासून केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला.