अमृतसर : खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांची पत्नी किरणदीप कौरला दि.२० एप्रिल रोजी अमृतसर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. किरणदीप कौरने यापूर्वी पोलिसांच्या चौकशीदरम्यान सांगितले होते की, ती अमृतपालच्या संपर्कात नाही.तसेच किरणदीप यूकेची नागरिक आहे त्यामुळे ती लंडनला जात होती. सध्या तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.
अमृतपालच्या पत्नीला अमृतसर विमानतळावर कोणता नातेवाईक सोडण्यास आला होता हे समजू शकले नाही. तसेच त्याबद्दल पोलीस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी या क्षणी कोणताही खुलासा करण्यास नकार दिला आहे. अमृतपाल फरार झाल्यानंतर किरणदीप कौरची यापूर्वीही चौकशी करण्यात आली होती. किरणदीप कौर ही ब्रिटनची नागरिक असल्याने तिचा पासपोर्ट भारतात वैध होता .पासपोर्टवर ती भारतात किती दिवस राहू शकली असती हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. किरणदीप कौरनेही यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला दोन महिन्यांनंतर भारत सोडावा लागेल.
अमृतपाल सिंगने या वर्षी १० फेब्रुवारी रोजी यूकेमध्ये राहणाऱ्या किरणदीप कौर या अनिवासी भारतीयाशी लग्न केले होते. अमृतपाल सिंग यांच्या मूळ गावी जल्लूपूर खेडा येथे अत्यंत गुप्त पद्धतीने दोघांचे लग्न पार पडले. या लग्नाचे फारसे फोटोही नाहीत. अमृतपाल सिंग यांनी लग्नानंतर सांगितले होते की त्यांची पत्नी पंजाबमध्ये त्यांच्यासोबत राहणार आहे, कारण हे लग्न उलट स्थलांतराचा संदेश आहे आणि सर्व पंजाबी स्थलांतरितांनी राज्यात परतावे अशी त्यांची इच्छा आहे. किरणदीपचे कुटुंब जालंधरचे आहे.