मुंबई : विद्यार्थ्यांचे उद्दिष्टापासून लक्ष भरकटविणे, त्यांना व्यसनाधीन करणे, अनैतिक कृत्यात गुंतवणे तसेच त्यांना गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त करण्याचे काम काही समाजविघातक शक्ती करत आहेत, त्यांच्यापासून आजच्या पिढीने सावध राहण्याची गरज असल्याचे आवाहन दै, मुंबई तरूण भारतच्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले आहे.
सह्याद्री विद्याप्रसाराक संस्थेच्या भांडूप येथील सह्याद्री विद्यामंदिरात दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या माध्यमातून ‘संवाद आपल्या पाल्याशी’ या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. 19 एप्रिल रोजी करण्यात आले होते. त्यावेळी योगिता साळवी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.सध्याच्या आधुनिक जगातील प्रश्न उपस्थित करत त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांचा समाज विघातक विघातक कृत्यात सर्रास वापर होत आहे. यामागची कारणे आणि त्याला विद्यार्थी बळी पडू नये यासाठी समाज आणि स्वत: विद्यार्थी काय करू शकतात याबद्दल योगिता साळवी यांनी मुद्देसूद विचार मांडत विविध उदाहरणे दिली. यावेळी अनेक मुलांनी प्रश्न विचारत हा कार्यक्रम अधिक प्रबोधनात्मक केला.
सायबर क्राईम म्हणजे काय? छेडछाड झाली असता त्यापासून कसे वाचायचे? अंमली पदार्थ आणि त्याचे परिणाम? लव्ह जिहाद श्रद्धा वालकर प्रकरण, याबाबतची विस्तृत माहिती योगिता साळवी यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांद्वारे दिली.विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही या विषयावर प्रबोधन होणे गरजेचे आहे असे मत शाळेचे पर्यवेक्षक विद्याधर सावंत यांनी व्यक्त केले. या वेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकही उपस्थित होते.