मुंबई : कधीकाळी जगभरात भारताची ओळख असलेली ‘एअर इंडिया’ ही विमान कंपनी पुन्हा एकदा जगभरात अधिराज्य गाजविण्यास सज्ज होत आहे. ‘एअर इंडिया’चे ‘टाटा समूहा’कडे पुनरागमन झाल्याने त्यांचे दिवस पालटू लागले आहेत. ‘टाटा समूहा’चे संपूर्ण लक्ष ‘एअर इंडिया’ला तिची हरवलेली ओळख परत मिळवून देणे आणि तिला जागतिक विमान कंपनी बनवण्यावर आहे.‘टाटा समूहा’चे संपूर्ण लक्ष ‘एअर इंडिया’ला तिची हरवलेली ओळख परत मिळवून देणे आणि तिला जागतिक विमान कंपनी बनवण्यावर आहे. या दिशेने ‘एअर इंडिया’ फ्रान्स आणि जर्मनीच्या सर्वात मोठ्या एअरलाईन्स कंपन्यांसोबत मोठा करार करणार आहे.
जगातील सर्वात मोठ्या विमानाची ‘ऑर्डर’ दिली
‘एअर इंडिया’ विमान वाहतूक क्षेत्रात जागतिक आघाडीवर बनण्याच्या दिशेने ‘टाटा समूहा’ने नवीन विमानांची ‘ऑर्डर’ देऊन आणखी एक मोठे काम केले आहे. कंपनीने ‘बोईंग’ आणि ‘एअर बस’ला एकूण ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. या कराराचा व्यवहार तब्बल ७० अब्ज डॉलर आहे. आतापर्यंतची ही जगातील सर्वात मोठी विमान ‘ऑर्डर’ आहे.वास्तविक, ‘टाटा समूहा’ने ’एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड’ खरेदी करण्यासाठी जर्मनीच्या ‘लुफ्थांसा’ आणि फ्रान्सच्या ‘एअर फ्रान्स केएलएम एअरलाईन्स’शी करार केला आहे. ‘टाटा समूहा’ची इच्छा आहे की, जेव्हा जेव्हा या संदर्भात लिलाव होईल, तेव्हा या दोन विमान कंपन्यांची देखभाल उपकंपनी त्या ‘कन्सोर्टियम’चा एक भाग असावी. ‘टाटा समूहा’ने आधीच ’विस्तारा’ आणि ‘एअर एशिया इंडिया’ या दोन ‘एअरलाईन्स एअर इंडिया’मध्ये विलीन करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे ‘सिंगापूर एअरलाईन्स’चीही ‘एअर इंडिया’मध्ये २५.१ टक्के भागीदारी आहे. ‘सिंगापूर एअरलाईन्स’ची अभियांत्रिकी उपकंपनीही ‘एआयईएसएल’च्या लिलावात सहभागी होणार्या ‘कन्सोर्टियम’मध्ये सहभागी होणार आहे.
दरम्यान, १८ हजार कोटी रुपयांच्या करारात सरकारने जेव्हा ‘एअर इंडिया’ ‘टाटा समूहा’कडे सोपवली, तेव्हा त्याची देखभाल दुरुस्ती आणि ऑपरेशन उपकंपनीला या करारातून बाहेर ठेवण्यात आले, म्हणजेच ती विकली गेली नाही. ती अजूनही सरकारी कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने फक्त ‘एअर इंडिया’च्या विमानांचीच दुरुस्ती करते, त्यामुळे ‘एअर इंडिया’साठी त्यावर मालकी असणे आवश्यक आहे.सर्वात मोठी विमान देखभाल कंपनी ‘आयईएसएल’ ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांचे देशभरात सहा हँगर आहेत, जिथे विमानांची देखभाल केली जाते. ‘आयईएसएल’ने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ४५० विमाने हाताळली. त्यानंतर ८४० कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. सरकार लवकरच खासगीकरणाच्या मार्गावर जाऊ शकते. या संभाव्य करारामुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना भारतात त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत होईल.भारताला आंतरराष्ट्रीय हब बनविण्याच्या दिशेने काम करण्यासाठी सरकार ‘एअर इंडिया’ आणि ‘इंडिगो’ यांसारख्या विमान कंपन्यांशी चर्चा करीत आहे. असे झाल्यास जगभरातील विमाने भारतात थांबू लागतील, ज्यामध्ये ‘एअर इंडिया’ आणि ‘आयईएसएल’चा चांगलीच प्रगती होईल. त्यातूनच ‘एअर इंडिया’ला गतवैभव प्राप्त होणार आहे.