गेल्या तीन महिन्यांपासून आलेले पाहुणे पक्षी भारतातील विविध भागांत मुक्कामी होते. यंदा काहीसे उशिरा आलेले हे पाहुणे मात्र लवकर परतू लागले आहेत. अचानक वाढलेल्या तापमानामुळे पाहुण्या पक्ष्यांनी आवराआवर सुरू केली असून घरात आलेला पाहुणा जाताना यजमान ज्याप्रमाणे भावूक होत असतो, तशीच अवस्था पक्षिप्रेमींची झाली आहे. पक्षीनिरीक्षकही हिरमुसले आहेत. त्याविषयी...
संत जनाबाई यांनी लिहिलेल्या एका अभंगातील ओव्या आजघडीला प्रत्येकासाठी तंतोतंत लागू होतात. त्यात त्यांनी,
पक्षी जाय दिगंतरा,
बाळकांसी आणि चारा
घार हिंडते आकाशी,
झाप घाली पिल्लापाशी
माता गुंतली कामासी,
चित्त तिचे पिल्लापाशी....
सुप्रसिद्ध निसर्गलेखक मारुती चितमपल्ली यांचेही याच आशयाचे एक पुस्तक आहे. ज्याचे शीर्षक ‘पक्षी जाय दिगंतरा’असून त्यात पक्ष्यांवर आधारित १६ लेखांचा संग्रह आहे. त्यात पक्ष्यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा केलेला आहे.पाहुण्या पक्ष्यांचे निरीक्षण ही खरेतर एक फार मोठी पर्वणी पक्षिमित्रांसाठी असते. दुर्बीण घेऊन तासन्तास प्रतीक्षा करत पक्ष्यांच्या हालचालीचे बारकावे आपल्या नेत्रात साठवून ठेवण्याचा आनंद काही औरच असतो. त्यासाठी दीर्घ प्रतीक्षा आणि संयम आवश्यक असतो. ही पर्वणी हिवाळ्यात आपल्याला मिळत असते.जगाच्या उत्तर भागात साधारणत: सप्टेंबरमध्ये हिवाळा वाढू लागतो. बर्फवृष्टी आणि वादळांमुळे त्या भागातील पक्ष्यांना अन्नाचा तुटवडा भेडसावू लागतो. बदलत्या हवामानात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी अन्नाच्या शोधात हे पक्षी दक्षिण दिशेकडे म्हणजेच आशिया खंडातील विविध देशांत येत असतात. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येणारे हे पाहुणे पक्षी यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्थिरावले. या पाहुण्या पक्षांतील काही प्रजातींचा विणीचा हंगामही येथेच सुरू होत असतो. पाणथळ जागी सुरक्षित निवारा आणि मुबलक अन्न असलेल्या ठिकाणी हे पक्षी साधारणत: एप्रिल अखेरपर्यंत राहत असतात.
_202304021958332591_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
यंदा मार्चमध्ये उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. त्याचबरोबर वाढलेले प्रदूषण पाणथळ जागांवर टाकण्यात येत असलेला भराव तसेच दलदलीचा प्रदेश कमी-कमी होत असल्याने यंदा देशातील बहुतांश भागांतून पाहुण्या पक्ष्यांनी निरोप घ्यायला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी हे पक्षी वास्तव्यास होते, त्या भागावर ओझरती नजर टाकल्यास पाहुण्यांनी टाकून दिलेले अतिरिक्त पंख नजर वेधून घेतात. हजारो मैलांचा प्रवास करताना अतिरिक्त वजन नको, त्यामुळे हे पक्षी जास्तीचे पंख टाकून मार्गस्थ होत असतात.दरवर्षी हिवाळ्यात साधारणत: अडीचशे ते पावणेतीनशे विविध प्रजातींचे पक्षी स्थलांतर करत असतात. यात काही स्थानिक पक्षी असतात, तर काही हजारो किलोमीटरचा प्रवास करुन आलेले असतात. भारतात पंजाब, चंदिगढ, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हे पक्षी पाणथळ जागांवर मुक्कामी असतात.मुंबई, ठाणे रायगडच्या खाडी परिसरात दाखल होणारे आकर्षक आणि रुबाबदार परदेशी पाहुणे म्हणजे ‘फ्लेमिंगो.’ लाल-गुलाबी पंख असलेल्या या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळत असते. ठाणे आणि नवी मुंबईच्या खाडी किनारी किंवा तलाव क्षेत्रात हजारोंच्या संख्येने हे पक्षी दिसतात. हवामानातील बदल, प्रजनन, अन्नाच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करून ‘फ्लेमिंगो’ पक्षी दरवर्षी येत असतात. त्यामुळे त्यांचे आकर्षण कायम असते.
नकटा बदक
उष्णकटिबंधीय प्रदेशातील उपसहारा मादागास्कर या ठिकाणी आढळणारा नकटा बदक हा स्थलांतरित पक्षी राज्यातील काही भागात विशेष करुन मंगळवेढा येथे गेल्या दोन वर्षांपासून आढळत आहे. आकाराला इतर बदकांच्या तुलनेने मोठा असल्याने नकटा बदक लगेच ओळखता येतो. त्याला पाणथळ्या जवळील झाडावर राहायला आवडते. पक्षी असेल तर पर्यावरण व पर्यायाने माणूस टिकेल. पक्ष्यांचे संरक्षण करावे, पर्यायाने निसर्गाचे संरक्षण ठरेल. त्यासाठी पाणथळ जागांचे संवर्धन काळाची गरज आहे. पाहुण्या पक्ष्यांचा मुक्काम जवळपास संपला असून, पुढील वर्षी हे पक्षी पुन्हा येतील, अशी अपेक्षा करुन या पाहुण्यांची प्रतीक्षा करुया!
खाडीक्षेत्रात ‘फ्लेमिंगों’चा संचार
अतिशीत प्रदेशातून भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशात मुक्कामाला येणारे स्थलांतरित पक्षी नवी मुंबई, ठाणे, मुंबईतील खाडीकिनारी दाखल होतात. उत्तरेकडून आलेले ‘फ्लेमिंगो’ पक्षी पर्यटकांना आकर्षित करत असतानाच युरोप, लडाख, अमेरिका येथून हजारो मैलांचा प्रवास करुन हे पक्षी येतात. या पक्ष्यांचे थवे लक्षवेधी असतात. ठाणे, ऐरोली, कल्याण, भांडुप, उरणच्या खाडीकिनारी अधिवास बनवून राहिलेले हे पक्षी भल्या पहाटे किंवा संध्याकाळी पाहणे अधिक आनंददायी असते. सहज ओळखता येणारे आणि पक्षीनिरीक्षकांसाठी पर्वणी असलेले फ्लेमिंगो आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. साध्या डोळ्यांनीदेखील या पक्ष्यांच्या हालचाली टिपता येतात. फ्लेमिंगोलाच रोहित, पांडव, अग्निपंख, समुद्रपक्षी या नावांनी ओळखले जाते. हा पक्षी पाण्यात पोहताना हंसासारखा दिसतो म्हणून त्याला हिंदीत ‘राजहंस’ किंवा ‘बोगहंस’ असेही म्हणतात. लांब मान, लांब पाय असलेला गुलबस पांढर्या रंगाचा पक्षी असून त्याची गुलाबी चोच वैशिष्ट्यपूर्ण असते. एखादी काडी मधोमध वाकवावी तशी या पक्ष्याची चोच मध्यावर ‘मोडलेली’ दिसते. या चोचीचा उपयोग करून हा पक्षी गाळातले खाद्य गोळा करतो. या पक्ष्याला माणसांची वर्दळ, गर्दी, त्रास सहन होत नाही. माणसापासून तो चार हात दूरच राहतो. आपण जर याच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तर थव्यातला म्होरक्या ‘हाँक!’ असा नाकातून आल्यासारखा आवाज काढून खाणं थांबवतो. हे पक्षी जेव्हा उडू लागतात तेव्हा त्यांचे काळ्या किनारी असलेले गडद शेंदरी रंगांचे पंख उलगडतात. ते दृश्य पाहताना आपण स्वप्न तर पाहत नाही ना, असं वाटतं. या पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी नवी मुंबईत ऐरोली येथे खास सोय करण्यात येते.
संकल्प वसुंधरेच्या संवर्धनाचा
घरातील ओला कचरा आणि सुका कचर्याचे वर्गीकरण करावे; म्हणजे कचर्याचे विघटन योग्य प्रकारे होते. शौचालयातील फ्लश टँकमध्ये एक लिटर पाण्याची बाटली भरुन ठेवली असता दिवसाला साधारण १५ लीटर पाण्याची बचत करता येऊ शकते.अंगणातील झाडांना शक्यतो सकाळच्यावेळी पाणी घालावे म्हणजे पाणी साठून राहून बुरशी लागण्याची शक्यता कमी होते.
-मदन बडगुजर