रामनामाचा अभ्यास, चिंतन, नाम घेणे हे आपले अंतःकरण सुधारावे यासाठी आहे. आपल्या आनंदप्राप्तीतील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे अहंकार. जर जपसाधनेने अहंकार वाढत असेल, मी इतरांपेक्षा निराळा असून श्रेष्ठ आहे, असा सूक्ष्माहंकार उत्पन्न होत असेल, तर नामाचे खरे महत्त्व समजले नाही, असे म्हणावे लागेल. रामनामाच्या अभ्यासाने माणसाला चारित्र्यसंपन्न, नीतिमान व निगर्वी जीवनातील आनंद गवसला पाहिजे. विकारवशतेेतून सुटण्याचा काय आनंद असतो, याचा शोध लागला पाहिजे. समुदायात गेल्यावर किंवा सार्वत्रिक आनंद घेत असताना अतिआदराने रामनामाचा घोष करायला हरकत नाही, असे स्वामींचे सांगणे आहे.
भगवंताचे नाम ‘शोकापहारी’ म्हणजे सर्व दु:खांचा नाश करणारे, आनंद देणारे आहे, असे स्वामींनी मागील श्लोकात सांगितले आहे. रामनाम म्हणजेच ‘नामस्मरण’ हा अभ्यासाचा विषय आहे. तो अनुभूतीचा विषय आहे. त्यामुळे नामाबद्दल तार्किकतेने विचार करायचे ठरवले, तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तसेच सध्याच्या काळात बुद्धिप्रामाण्य आणि विज्ञाननिष्ठा या दोन शब्दांना महत्त्व आहे. तार्किकता, बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा यांची प्रापंचिक, ऐहिक व्यवहारासाठी अत्यंत आवश्यकता आहे. याबद्दल दुमत नाही. विज्ञाननिष्ठा, तार्किकता, बुद्धिप्रामाण्य यांचा सरळ संबंध भौतिक घटकांशी आहे. भौतिकशास्त्राचे नियम जसेच्या तसे आत्मिक अनुभूतीसाठी लावता येत नाहीत. रामानामाचा, नामस्मरणाचा थेट संबंध आत्मिक अनुभूतीशी असल्याने रामानामाचे विश्लेषण तर्कशास्त्र, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्य हे घटक आपल्या सिद्धांतांवर करु शकत नाहीत.
हा विषय केवळ अनुभूतीचा असल्याने त्यासाठी दृढ श्रद्धा, अहंकाराचा त्याग, चारित्र्यसंपन्नता, नीतिमानता, शरणागतता इत्यादी गुणांची आवश्यकता असते. हे गुण न मिळवता आत्मानुभूती नसलेले काही भोंदूबाबा भोळ्या भाविकांना फसवतात, नादी लावतात. त्यामुळे ‘अध्यात्म’ हा भ्रम आहे, असा विचार समाजात पसरवला जातो. सामान्य माणसाची भगवंतावरील श्रद्धा डळमळीत होऊ लागते. अशावेळी भोंदूबाबांच्या नादी न लागता समर्थांसारख्या आत्मसाक्षात्कारी पुरुषांचे सांगणे काय, ते जाणून घ्यावे. त्यांचे विचार ऐकणे, त्यावर विश्वास ठेवणे, हे आपल्यासाठी श्रेयस्कर असते. आपल्यासारख्या अध्यात्माचा अनुभव नसलेल्या सामान्य माणसांसाठी समर्थ त्यांच्या अनुभवातून तपस्येतून सांगतात की, रामनाम अतिशय साधे, सोपे व चांगले आहे, हे सांगणारा स्वामींचा पुढील श्लोक असा आहे-
बहू चांगले नाम या राघवाचें।
अती साजिरें स्वल्प सोपें फुकाचें।
करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें।
जिवां मानवां हेंचि कैवल्य साचे ॥८८॥
आतापर्यंत आपण पाहिले की, मनाच्या श्लोकांच्या क्रमांक ८१ पासून स्वामी प्रत्येक श्लोकातून रामानामाचे महत्त्व, नाम कसे हितकारक आहे आणि ते सर्वसाधनांचे सार कसे आहे, हे वेगवेगळ्या मार्गांनी समजावून सांगत आहेत. त्यातून नामसाधनेचे विविध पैलू उलगडून सांगत आहेत. त्यात वरवर पाहता द्विरुक्ती वाटली, तरी त्यातील भावार्थ वेगळा असून समर्थ त्यातील प्रत्येक घटक बारकाईने श्रोत्यांसमोर ठेवत आहेत, हे लक्षात येते. हे सांगून झाल्यावर वरील श्लोक क्र. ८८ मध्ये स्वामींनी निष्कर्ष काढला आहे की, रामनाम हे खरंच खूप चांगले आहे.
आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ स्वामी नामातील वेगवेगळे गुण उलगडून सांगत आहेत. या श्लोकात स्वामी पुढे म्हणतात की, रामनाम हे ‘अती साजिरे’ म्हणजे सुंदर शोभून दिसणारे आहे. रामनाम ही लालित्यपूर्ण आहे. ‘अती साजिरे’ या शब्दरचनेतून स्वामी ‘राम’ या शब्दातील कोमल नाद स्पष्ट करतात. रामनामाचे उच्चारण करताना उच्चार प्रक्रियेतील स्नायूंना ताण घ्यावा लागत नाही. म्हणून ते ‘अती साजिरे’ याशिवाय ते स्वल्प म्हणजे छोटेसे आहे. स्वल्पाक्षरी आहे. त्यात कठोर व्यंजने नसल्याने सर्वांसाठी सोपे आहे. हे गुण नामात आहे, पण प्रापंचिकदृष्ट्या विचार करता ते बिनखर्चाचे आहे. ते फुकटात मिळणारे आहे.
त्यासाठी कुणाला पैसे द्यावे लागत नाहीत. इतर साधनांचा विचार करता यज्ञ-याग तीर्थयात्रेहून परत आल्यावर करावयाचे दानधर्म, व्रतवैकल्ये यासाठी पैसे खर्च करावे लागतात. सर्व यथासांग पार पाडायचे, तर जवळ मोठ्या प्रमाणावर द्रव्य असल्याशिवाय ते शक्य होणार नाही. पुण्यसंचय करण्यासाठी शास्त्रात अशी अनेक व्रतवैकल्ये सांगितली आहेत. साधने सांगितली आहेत, पण ती खर्चिक आहेत. या सार्यांच्या तुलनेत रामनाम, नामस्मरण हे फुकट करता येण्यासारखे आहे. फक्त त्यावर विश्वास हवा. इतर साधनांत अवडंबर असते. अनेक प्रकारांनी पूर्वतयारी करावी लागते. नामाच्या ठिकाणी तो प्रकार नाही. नाम हे केव्हाही, कुठेही गाजावाजा न करता, त्यांचे प्रदर्शन न करता, कुणावरही अवंलबून न राहता घेता येते. या कारणाने ते सोपे सुलभ आणि फुकाचे फुकट मिळणारे आहे, जे फुकट आणि सहजगत्या मिळते, त्याची माणसाला किंमत नसते. तथापि त्याचे मूल्य समजून घेतले पाहिजे.
फुकट मिळते ते टाकाऊ समजून नये. नाम हे किती गुणकारी व उपयुक्त आहे, हे स्वामी या श्लोकांच्या तिसर्या व चौथ्या ओळीत स्पष्ट करीत आहेत. राघवाचे नाव चांगले असून ते दु:खाचे आपत्तीचे निर्मूलन करते. नामाचे चित्त एकाग्र होऊ लागते. मनाला नामाचा छंद लागत की मनाला अहंकार, द्वेष, मत्सर, स्वार्थ या विकारांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. रामनाम स्थिर झाल्यावर मनातील द्वेष, मत्सर, असुया इत्यादी विकार नाश पावतात व मन पवित्र होऊ लागते. मन विकाररहित, स्वार्थरहित झाल्याने सर्व सृष्टीत, सर्व आनंदाचा चैतन्याचा साक्षात्कार होतो. कैवल्य किंवा मोक्ष याहून काही वेगळा नसतो. प्रपंचाचे मूळच निर्मूळ झाल्याने हाच मानवाचा मोक्ष होय. स्वामींच्या रचनेत मोठी खुबी आहे. राघवाचे नाम चांगले, सोपे, फुकाचे स्वल्प, साजिरे अशी सुरुवात करून, स्वामी नामाला मानवाच्या अंतिम ध्येयापर्यंत मोक्षापर्यंत नेऊन सोडतात.
या श्लोकात राघवाचे नाम हे चांगले आहे. सर्वदृष्ट्या श्रेयस्कर आहे, हे सांगितले. अर्थात, ही नामसाधना ज्याची त्याला करायची आहे, कोणी जपमाळ घेऊन ती करेल किंवा कुणाला ती साधल्यावर मन नामात राहील. हा झाला वैयक्तिक विचार अथवा एकांतात करायची साधना, पण माणूस काही फार काळ एकटेपणाने राहू शकत नाही. त्याला कुटुंबातील व्यक्तींबरोबर नातेवाईकांबरोबर अथवा समाजात वावरावे लागते. अशावेळी नाम कसे घ्यावे, असा प्रश्न पडतो. सार्वजनिक ठिकाणी एखाद्या कार्यक्रमात काही माणसे जपमाळ बरोबर घेऊन जातात आणि आपल्या नामसाधनेचे प्रदर्शन करतात.
रामनामाचा अभ्यास, चिंतन, नाम घेणे हे आपले अंतःकरण सुधारावे यासाठी आहे. आपल्या आनंदप्राप्तीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार, जर जपसाधनेने अहंकार वाढत असेल, मी इतरांपेक्षा निराळा असून श्रेष्ठ आहे असा सूक्ष्माहंकार उत्पन्न होत असेल, तर नामाचे खरे महत्त्व समजले नाही, असे म्हणावे लागेल. रामनामाच्या अभ्यासाने माणसाला चारित्र्यसंपन्न, नीतिमान व निगर्वी जीवनातील आनंद गवसला पाहिजे. विकारवशतेतून सुटण्याचा काय आनंद असतो, याचा शोध लागला पाहिजे. समुदायात गेल्यावर किंवा सार्वत्रिक आनंद घेत असताना अतिआदराने रामनामाचा घोष करायला हरकत नाही, असे स्वामींचे सांगणे आहे. अर्थात, तो विषय स्वामींनी पुढील श्लोक क्र. ८९ मध्ये घेतला असल्याने त्यासंबंधीचे विवेचन पुढील लेखात पाहता येईल. (क्रमश:)
७७३८७७८३२२