विद्या या विमुक्तये’ अशी विद्येची परिभाषा आहे. ज्यामुळे मुक्ती मिळेल ती विद्या होय. आसने, असल्या मुक्तीकरिताच असल्यामुळे त्याचे नाव वैदिक ऋषिमुनींनी ‘आसन’ असे ठेवले आहे. आसने अनेक प्रकारची आहेत. त्यापैकी कुंडलिनी जागृतीकरिता खालील आसने उपयोगाची आहेत.
१) पद्मासन : पद्मासन मुख्यतः ध्यानाकरिताच करावयाचे असते. पण, शरीर आरोग्याकरिता त्याचे २० प्रकार आहेत. पद्मासनातील सर्व आसने व्यवस्थित करण्यास साधारणत: १५ ते २० मिनिटे लागतात. आसने कधीच घाईने करू नयेत. संथपणे आसने केल्याने शरीरातील रूधिरप्रवाह आवश्यक तेवढ्या गतीने वाढून त्या अवयवातील रोग दूर होतो व अशा तर्हेने सर्व शरीर रोगमुक्त होते. ‘पद्म’ म्हणजे कमळ. आसनावर कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे मांडी घालून बसावे. मांड्यांचा आकार पाकळ्यांप्रमाणे असल्याने याला ‘पद्मासन’ असे म्हणतात. प्रथम उजवा पाय डाव्या मांडीवर व नंतर डावा पाय उजव्या मांडीवर घ्यावा. हे सततच्या अभ्यासाने साधेल. पाठीचा कणा सरळ ठेवावा. डाव्या तळहातावर उजवा तळहात ठेवून दोन्ही हात पुढ्यात पायावर ठेवावे. मान ताठ ठेवून डोळे बंद अथवा दृष्टी नासाग्री असावी. श्वास मंद चालू द्यावा. या आसनावर ध्यान करावे म्हणजे मूलाधारातील कुंडल अवस्थेवर ताण पडून कुंडलिनी जागृत होऊ शकते. ध्यान लागल्यावर तर ती जागृत होतेच.
२) सुप्त पद्मासन : पद्मासनावर तसेच बसून दोन्ही हात समोर सरकवीत न्यावे व कपाळ जमिनीला लावावे. हात डोळ्यांपुढे आणखी सरकवून तळहात जमिनीवर पसरावे. श्वास मंद चालू द्यावा. असल्या शांत अवस्थेत अधिक वेळ राहिल्यास ध्यान लवकर लागू शकते.
३) योगमुद्रा : पद्मासनावर बसून दोन्ही हातांनी पायांचे अंगठे धरावे व कपाळ हळूच समोर जमिनीला लावावे. श्वास मंद चालू द्यावा. असा अभ्यास अधिक केल्यास आपोआप ध्यान लागून कुंडलिनी जागृत होऊ शकते. ही मुद्रा असल्याने तशी चित्ताची अवस्था झाल्यावर अशी मुद्रा आपोआप होत असते. आसने करावी लागतात, तर मुद्रा चित्ताची ती अवस्था आल्यावर आपोआप घडत असतात. म्हणून शास्त्रात सांगितले आहे, ‘मुदं ददाति देवानां द्रापयति असुरानपि’ ज्यामुळे देववृत्तींना आनंद प्राप्त होऊन असुर म्हणजे उदंड वाईट वृत्ती शांत होतात. त्यांना ‘मुद्रा’ असे म्हणतात. योगमुद्रा अशीच आहे.
४) महामुद्रा : दोन्ही पाय समोर पसरून बसावे. डावा पाय गुडघ्यात मोडून डाव्या पायाची टाच शिवणीच्या ठिकाणी मूलाधारावर रेटावी. उजवा पाय डाव्या पायाच्या उजव्या भागाला ३० अंशाचा कोन करून सरळ जमिनीवर ठेवावा. नंतर दोन्ही हाताच्या बोटांनी उजव्या पायाचा अंगठा उजवा गुडघा न वाकवता धरावा. नंतर कपाळ उजव्या गुडघ्यावर लावून दोन्ही हातांची कोपरे जमिनीला लावावीत. अशा अवस्थेत मंद श्वास घेत अधिकाधिक वेळ राहावे. नंतर उजवा पाय बदलून डाव्या पायाचा ३० अंशाचा कोन करून उजव्या पायाची टाच शिवणीत रोवून कपाळ डाव्या गुडघ्यावर टेकावे. दोन्ही कोपरे जमिनीला लावून मंद श्वास घेत बराच वेळ तसेच राहावे. असा अभ्यास वाढविल्यास मूलाधारावर दाब पडून कुंडलिनी जागृत होते.
५) सिद्धासन : सिद्धासनाची संपूर्ण माहिती ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात विस्तृतपणे दिली आहे. ती साधकांनी अवश्य वाचावी. उजव्या पायाचा बाहेरील घोटा जमिनीवर ठेवून घोट्याच्या वरच्या भागाला मूलाधार रेटून सर्व शरीर त्या एका बिंदूवर तोलावे. डाव्या पायाची टाच नाभीवर रेटावी. दोन्ही मांड्या वर उचलून घोट्यावर सर्व शरीर तोलावे. पाठीचा कणा सरळ व खांदे वर असावेत. दोन्ही तळहात एकावर एक ठेवून पुढ्यात ठेवावे. खांदे वर उचलून हनुवटी किंचित आत ओढावी. दृष्टी नासाग्री केंद्रित करावी. गुदद्वार वर उचलून मूलबंध साधावा. पोट खपाटी घालून श्वास बंद ठेवावा व नाभीवर ताण द्यावा. याला ‘उड्डीयानबंध’ असे म्हणतात. हनुवटी कंठावर रेटून श्वास आत कोंडून ‘जालंधरबंध’ साधावा. अशा रीतीने तिन्ही बंध साधून श्वासनिरोध करून अधिकाधिक काळ तशा अवस्थेत असावे, जीव गुदमरून कुंडलिनी जागृत होईल. हे आसन अतिशय कठीण व धोकादायक आहे. ते उत्तम साधल्यास कुंडलिनी अवश्य जागृत होईल, पण न साधल्यास त्याचा शरीर व मनावर परिणाम होऊन साधकाची तंतू संस्था बिघडून आयुष्यभर त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागेल. म्हणून हे सिद्धासन सुयोग्य गुरूचे मार्गदर्शनाखाली करावे अथवा करू नये.
अष्टसिद्धी प्राप्ती : सिद्धासनाद्वारे कुंडलिनी जागृत झाल्यास साधकाला आपोआप अष्टसिद्धी प्राप्त होत असतात. त्या अशा :
’अणिमा’ म्हणजे अणूप्रमाणे अतिसूक्ष्म होणे.
‘गरिमा’ म्हणजे पृथ्वीच्या वजनाइतके स्वशरीराचे वजन करणे.
‘लघिमा’ म्हणजे शरीराचा आकार व वजन अतिलघु करणे.
‘प्राकाया’ म्हणजे शरीराचा आकार भयंकर वाढविणे.
‘परकायाप्रवेश’ म्हणजे दुसर्याच्या शरीरात प्रवेश करून राहणे.
‘आकाशगमन’ म्हणजे अवकाशातून स्वैर गमन करणे.
‘दूरदर्शन’ म्हणजे अती दूरचे दिसणे.
‘दूरश्रवण’ म्हणजे अतिदूरचे ऐकू येणे.
आपल्या मेंदूमध्ये अशी काही केंद्रे आहेत की, जी जागृत झाल्यावर वरील प्रकारच्या अष्टसिद्धींचे अनुभव येत असतात. परंतु, साधकाच्या शरीराची तशी अवस्था मात्र होत नसते. साधकाला आपले शरीर अणुपेक्षाही लघु आणि पृथ्वीपेक्षाही भारी वाटू शकेल, पण शरीराचा आकार किंवा वजन मात्र तेवढेच राहील. साधकाला अवकाशगमनचा मानसिक अनुभव येईल. परंतु, प्रत्यक्ष शरीर मात्र जमिनीवरच राहील. प्रकृतीने ज्याअर्थी असली संवेदना केंद्रे मानवाला दिली आहेत, त्याअर्थी त्या अवस्थांचा पूर्ण अनुभव घेणे योग्याला प्रयत्नाने शक्य आहे. सूक्ष्म वास घेण्याचे ज्ञान केंद्र कुत्र्यात अधिक तीव्र असल्याने त्याचा उपयोग करून कुत्र्यांद्वारे आश्चर्यकारक कामे केली जातात. तद्वत सतत प्रयत्न केल्यास अष्टसिद्धी शक्य आहेत.
आपल्या शरीरातील सर्वच स्नायू आपल्या ताब्यात नसतात. परंतु, प्रयत्नाने योगी आपल्या शरीरातील कोणतेही स्नायू लीलया हलवू शकतो. ही झाली स्वत:च्या शरीरावरील नियंत्रणाची गोष्ट. शिथिलासनावर विजय मिळविल्यास तसल्या साधकाच्या शरीराचा एक भागसुद्धा उचलणे इतरांना अशक्य होऊन जाते, असा प्रत्यक्ष अनुभव आहे. कारण, त्या शरीरावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम होऊन ते शरीर भयंकर जड पडते. परकाया प्रवेशाचा अनुभव लेखकाला एके काळी आला होता. यासाठी योगनिद्रा, कुंभक प्राणायाम, शवासन (प्राणशक्तीवर नियंत्रण) या साधना आधी सिद्ध झाल्या पाहिजेत.
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)