अंबरनाथ : ग्रामीण भागातील शाळांमध्ये लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तितीक्षा फौंडेशनच्या माध्यमातून पायल कबरे यांनी सुरु केलेल्या वाचन चळवळीचे कार्य कौतुकास्पद आहे , वाचनासाठी पुस्तके कमी पडणार नाहीत यासाठी भरीव पाठबळ देण्याचे आश्वासन भाजपा आमदार संजय केळकर यांनी दिले.
तितीक्षा फौंडेशनच्या वतीने अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात हर ग्राम वाचनालय प्रकल्पांतर्गत अटल युथ मिनी लायब्ररीचे उदघाटन आ. केळकर यांच्या हस्ते मुंबई , कोकण विभाग भाजपाचे संयोजक अनिल बोरनारे यांच्या उपस्थितीमध्ये झाले.
ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे पण सोयी नाहीत, पाठयपुस्तके असतात पण अवांतर वाचनाचा अभाव दिसून येतो. त्याठिकाणी वाचन चळवळ राबवण्याचे कार्य प्रशंसनीय आहे , वाचनामुळे व्यक्तींचे आयुष्य बदलते, वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे असल्याचे आ. केळकर म्हणाले. फौंडेशनच्या भविष्यातील उपक्रमासाठी पुस्तके देण्याचे आश्वासन आ. केळकर यांनी दिले.
_202304181751557286_H@@IGHT_402_W@@IDTH_696.jpg)
हल्ली वाचन आणि लेखनामध्ये विद्यार्थ्यांची गती मंदावली असून अवांतर वाचन दुर्मिळ होत चालले आहे, शाळांत वाचनालये नाहीत यासाठी लोकसहभाग गरजेचा असल्याचे अनिल बोरनारे म्हणाले. सलील जव्हेरी, भरत फुलोरे, संजय आदक आदींची यावेळी भाषणे झाली. माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे, माजी नगरसेविका अनिता आदक , वैशाली बिरजे, सर्जेराव माहूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
गोरपे याठिकाणी वाचनालय सुरु करण्यापूर्वी बोहोनोली गावात वाचनालय सुरु करण्यात आल्याची माहिती फौंडेशनच्या अध्यक्षा तसेच भाजयुमोच्या प्रदेश विद्यार्थी विभागाच्या सह संयोजिका पायल कबरे यांनी दिली. वाचनालये सुरु करण्याबरोबरच शाळांना सर्वांगसुंदर रूप दिल्याने मुलांचा शाळॆत येण्याचा उत्साह वाढला आहे, फौंडेशनच्या माध्यमातून करियर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, वाचनालयाच्या उपक्रमासाठी लोकसहभाग गरजेचा असल्याचे पायल कबरे यांनी सांगितले.