नव्या भारताबरोबर अमेरिकेची मैत्री

    17-Apr-2023
Total Views | 64
editorial on india usa ralations

अमेरिकेने भारताचे महत्त्व ओळखले असून, आशिया खंडात शांतता प्रस्थापित करायचे असेल, तर नव्या भारताला पर्याय नाही, हे तिने मान्य केले आहे म्हणूनच अमेरिकी निर्बंधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भारत रशियाबरोबर व्यापारी संबंध कायम ठेवतो आणि त्याला विरोध केला जात नाही.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅण्टोनी ब्लिंकन यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत, प्रादेशिक तसेच जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यात युक्रेन आणि पूर्व आशियाचा समावेश होता. “अमेरिकेचे परराष्ट्र सचिव ब्लिंकन यांच्याशी नेहमीप्रमाणे छान संभाषण झाले. सध्याच्या प्रादेशिक तसेच जागतिक मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. भारत अमेरिका द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीची नोंद झाली,” अशा आशयाचे ट्विट जयशंकर यांनी केले. अमेरिकी राजदूत एरिक गार्सेट्टी देशात आल्यानंतर तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नुकताच अमेरिका दौरा केल्यानंतर हे संभाषण झाले, हे विशेष. तसेच गेल्याच महिन्यात ब्लिंकन यांनी ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने आयोजित परराष्ट्र मंत्र्यांची बैठक तसेच क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारताला भेट दिली होती.

भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जात आहे. २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितराहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रण दिले होते. ओबामा हे सपत्नीक भारत दौर्‍यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सारे राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून त्यांना विमानतळावर स्वागतासाठी जात नवा पायंडा पाडला होता. भारत अमेरिका या दोन राष्ट्रांत मैत्रीचे नवे पर्व त्यादरम्यान सुरू झाले, असे म्हटल्यास काहीही चुकीचे ठरणार नाही. त्यापूर्वी मोदी यांनी जो अमेरिका दौरा केला होता, तो अभूतपूर्व असा ठरला होता. त्यांच्या तेथे झालेल्या सभांना झालेली विक्रमी गर्दी हा जगभरात कौतुकाचा विषय ठरला होता.

एकेकाळी हातात भिकेचे कटोरे घेऊन अमेरिका दौर्‍यात जाणारा भारत, आज ताठ मानेने डोळ्यात डोळे घालून अमेरिकेशी जागतिक राजकारणावर चर्चा करतो, आपली परखड मते मांडतो आणि अमेरिका त्याला सकारात्मक प्रतिसाद देते. प्रसंगी अमेरिका विरोधी भूमिका घेत भारत आपले हित साधणारा निर्णय घेतो, अमेरिका त्याला विरोध करत नाही. हा १४० कोटी लोकसंख्येचा नवा भारत आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले. मात्र, त्यांना झुगारून देत भारताने रशिया बरोबरचे आपले व्यापारी संबंध कायम ठेवले. ‘एस ४००’ ही संरक्षण प्रणाली भारताने रशियाकडून विकत घेऊ नये, असा इशारा अमेरिकेने दिला होता. त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत भारताने आपल्या देशाला सीमा सुरक्षित करण्यासाठी ही प्रणाली रशियाकडून ना केवळ विकत घेतली, तर त्वरेने ती वापरातही आणली.

विस्तारवादी चीनच्या आक्रमक कारवाया दक्षिण आशिटयात वाढल्या आहेत. चीन, तैवान या दोन देशांत तणावाचे वातावरण आहे. भारताबरोबरही अरुणाचल प्रदेशच्या निमित्ताने चीनने पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. या पार्श्वभूमीवर चीनला रोखण्यासाठी भारत हाच आशियातील प्रमुख देश आहे, हे अमेरिका जाणून आहे. म्हणूनच तैवान जवळ चिनी हवाई दलाने प्रात्यक्षिके केल्यानंतर लगेचच अमेरिकेने भारताशी बोलणे करावीत, यातच सारे काही आले. म्हणूनच उभय देशांमध्ये लष्करी सहकार्य वाढले आहे. गेल्याच महिन्यात दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा जागतिक पातळीवर जो परिणाम झाला आहे, तो कमी करण्यासंदर्भातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली होती.

चीन हा दोन्ही देशांच्या विकासातील प्रमुख अडथळा आहे. त्यामुळेच त्याला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध केवळ पंतप्रधान मोदी हेच थांबू शकतात, हे युक्रेनने अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित केले आहे. भारताने यात मध्यस्ताची भूमिका पार पाडावी, असे अमेरिकेसह सर्व प्रमुख देशांनी वारंवार सुचवले आहे. तथापि, भारताने तटस्थ राहण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला आहे. भारताबरोबर अमेरिकेने तंत्रज्ञान तसेच संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत धोरण आखले आहे. अमेरिकी कंपन्या कालबद्ध पद्धतीने भारतात गुंतवणूक करत आहेत.

चिनी ड्रॅगनच्या विळख्यातून त्या हळूहळू स्वतःची सुटका करून घेत आहेत. २०३० पर्यंत भारत हा आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल, असे सर्वच आंतरराष्ट्रीय संस्था वारंवार सांगत आहेत. त्यामुळे भारताबरोबर असणारे मैत्रीपूर्ण संबंध, हे अमेरिकेच्या दीर्घकालीन पथ्यावर पडणारे आहेत. अन्न, ऊर्जा आणि जागतिक सुरक्षा या तिन्ही क्षेत्रात भारताचे योगदान नाकारता न येणारे असेच आहे. आशिया खंडात प्रस्थापित होत असलेली शांतता ही भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय आहे. ‘एअर इंडिया’ने अमेरिकी बोईंग तसेच ‘एअरबस’ या दोन विमाननिर्मिती करणार्‍या कंपन्यांकडून विमान खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय, तेथील अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारा ठरला आहे. सर्व क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे.

जगातील सर्वच अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत असताना, भारतीय अर्थव्यवस्था ही तेजीकडे वाटचाल करत आहे. भारताच्या वाढीचा दर हा अमेरिकेपेक्षाही कित्येक पटीने जास्त आहे. चीनच्या विस्तारवादी मानसिकतेला केवळ आणि केवळ भारत रोखू शकतो. म्हणूनच भारताबाबत अमेरिकेचे धोरण हे मैत्रीपूर्ण असेच राहिले आहे. आशिया खंडात स्थैर्य हवे असेल, तर भारताशिवाय कोणताही समर्थ पर्याय नाही. त्यामुळेच अमेरिका भारत यांच्यातील संबंध आता नवीन अध्याय लिहिणारे ठरले आहेत. त्यांना एक वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे. हा नवा भारत आहे, हे अमेरिकेने केव्हाच मान्य केले आहे. इतकेच!



अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121