ठाणे : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाकडे वाटचाल करत आहोत. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या आता लगेच सोडविल्या जाणार आहेत. ते आता तणावात राहता कामा नयेत. त्यांच्यावर दर्जात्मक शिक्षण अवलंबून आहे. शिक्षक संघटनांनी देखील त्यांच्या प्रश्नांमध्ये अडकून न राहता शिक्षणावर त्यांनी लक्ष्य केंद्रित करावे. असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
एनईपीच्या युगात शैक्षणिक जगताच्या बदलत्या परिस्थितीवर चर्चा व विचारमंथन करण्यासाठी महाराष्ट्र शासन व ई स्कॉलर नॉलेज सर्विस यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर एकदिवसीय परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी केसरकर यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना सगळ्या कला-कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. संशोधनाला भाषा नसते म्हणून मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. लहान मुलांना खेळांच्या माध्यमातून शिकवावे लागेल, त्यांच्या मेंदूवर किती ताण द्यावा, याचा विचार करावा लागेल, जे जे प्रयोग शिक्षणात झाले. त्याचे पुढे काय ? याचा आढावा घेतला जाणार आहे.
आता शिक्षकांना ठराविक विषय शिकवून चालणार नाही त्यांना इतर विषयही शिकवावे लागतील. आजच्या शिक्षणामध्ये मोठे बदल होणार आहेत आणि त्या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याबरोबर बैठक होणार आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य व्हावे असे मला वाटते. जी मुले परदेशात जातील तेथील राष्ट्राची भाषा आणि तेथील तंत्रज्ञान शिकवणे हे शिक्षकांसमोर मोठे आव्हान असेल. कंपन्यांनी स्वतः आता शाळा दत्तक घेतली तर दर्जात्मक शिक्षणावर भर देता येईल. विद्यार्थ्यांची आता प्रगती देखील तपासली जाणार आहे. महिन्याभरात शिक्षण विषयक अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.
परराज्यातील शिक्षण पद्धतीमधील बेस्ट प्रॅक्टिसेस या आत्मसात कराव्या लागतील. शिक्षणाबाबत आता एकदाच निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर कोणताही बदल होता कामा नये. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे संपूर्ण देशाचे आहे आणि त्यादृष्टीने त्याकडे पहावं लागेल. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी आता त्यांना वाट पाहायला लागणार नाही, असे केसरकर म्हणाले. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अनुदानित शाळा आणि शिक्षकांच्या पगारावर सर्वाधिक खर्च होतो. त्यामुळे दर्जात्मक शिक्षणावर त्यांनी भर दिला पाहिजे. यासाठी त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.