टेक्सासचे अग्नितांडव..!

    14-Apr-2023
Total Views | 64
dairy-farm-blast-in-texas-america

अमेरिकेतील टेक्सासमध्ये नुकताच एका डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानवी जीवनात अमूल्य असे योगदान देणार्‍या जनावरांचा अशाप्रकारे होणारा मृत्यू हा नक्कीच क्लेषदायक आहे. तसेच वैश्विकीकरणाच्या युगात जग एकमेकांच्या जवळ आले असताना, गाईंच्या अशा मृत्यूने जगही हादरले आहे.

टेक्सासमधील डिमिट येथील ‘साऊथ फोर्क डेअरी फार्म’मध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तीन दिवस मेहनत घ्यावी लागली. तरीही ही आग शमली नाही. या आगीत १८ हजारांपेक्षा अधिक गाईंचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही दुर्घटना नेमकी कशी झाली, हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. अमेरिकेतील काऊंटी न्यायाधीश मँडी गेफ्लरने संशय व्यक्त केला की, उपकरणे खराब झाल्यामुळे हा अपघात झाला. या दुर्घटनेत मृत पावलेल्या गाई या बहुतेक गायी ‘होल्स्टीन’ आणि ‘जर्सी’ गायी होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाईंचा मृत्यू झाल्याने शेतीपूरक संपूर्ण व्यवसायच ठप्प झाला आहे. या गाईंची सरासरी किंमतही साधारण दोन लाख भारतीय रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते.

जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत पशुधन हा महत्त्वाचा घटक. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, स्विडन यांसह अनेक युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्थेत पशू व पशूजन्य उत्पादनांचा महत्त्वाचे स्थान आहे. त्यावर लाखोंच्या संख्येने रोजगारदेखील उपलब्ध होतात. टेक्साससारख्या घटनांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा निर्माण तर झाला आहेच. मात्र, पशुधनाचेदेखील मोठे नुकसान झाले. त्यावर आधारित उद्योगांची साखळीदेखील विस्कळीत होणार आहे. या अनुषंगाने भारताचा विचार करणे देखील क्रमप्राप्त ठरते. भारतासारख्या विशालकाय देशालाही पशुधन मोठ्या संख्येने लाभले आहे.

 २०२२ मध्ये भारत हा जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे, तर अमेरिका दुसर्‍या स्थानी होता. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेटसांख्यिकीच्या माहितीनुसार, जगात दूध उत्पादनात २४ टक्क्यांचे योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०१४-१५ ते २०२१-२२ अशा मागील नऊ वर्षांच्या कालावधीत भारतातीलदूध उत्पादनात ५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर २०२१-२२ मध्ये देशातील दूध उत्पादन २२ कोटी टनांपर्यंत वाढले असल्याची माहिती पशुपालनतसेच दुग्धविकासमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत दिली होती. शेतीस जोड असलेल्या पशुधनावर आधारित उद्योगही भारतात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातून लाखो नागरिकांना रोजगारही प्राप्त झाला असल्याचे रुपाला यांनी सांगितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुग्ध उत्पादनातीलभारताचे यश अधोरेखित केले आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय साकारणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे, असेही गौरवोद्गार मोदींनीकाढले. पशुधनावरील व्यवसाय हा गरीब तसेच विकसनशील देशांसाठीएक आदर्श उदाहरण ठरू शकेल, असेहीपंतप्रधानांनी आवर्जून सांगितले आहे. ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डा’ने दिलेल्या माहितीनुसार, २०२२मध्ये दूध उत्पादनात भारतात उत्तर प्रदेश प्रथम, तर राजस्थान दुसर्‍या तर तिसर्‍या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे.

टेक्सासमधील घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर त्यावर आधारित पूरक उद्योगांनाही जबर फटका बसला असून, अन्नसाखळीसह रोजगारावरही त्याचा परिणाम जाणवणार आहे. ‘टेक्सास डेअरी वार्षिक अहवाल २०२१’नुसार, ‘कॅस्ट्रो काऊंटी’मध्ये जवळपास ३० हजार गायी आहेत. २०१३ मध्येही असाच मोठा अपघात घडला होता. त्यानंतर हा सर्वांत मोठा अपघात असल्याचे म्हटले जाते. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये प्राण्यांना आगीपासून संरक्षण देणारे कोणतेही फेडरल नियम नाहीत. अमेरिकेत गेल्या दशकभरात अशा प्रकारच्या भीषण आगीमध्ये सुमारे ६५ लाखांवर पशुधनाचा मृत्यू झाला आहे. भारतात आजपर्यंत अशा घटना घडल्या नसल्या तरी, यातून बोध घेणे गरजेचे आहे.

अमित यादव




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121