२०व्या शतकात भारताला राजकीय व सामाजिक परिप्रेक्ष्यात ज्या दोन महापुरुषांनी प्रभावित केले, ते महापुरुष म्हणजे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दोन्ही महापुरुषांचे योगदान शब्दातीत आहे. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या सशक्त, समरस राष्ट्राच्या निर्माणातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा आढावा घेणारा हा लेख...
ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. खर्या अर्थाने बाबासाहेबांचे जीवन आत्मसात करण्याचा हा दिवस. बाबासाहेबांचे जीवन एका संघर्षाची अशी कहाणी होती, जिने समाजातील प्रत्येक घटकासाठी काही आदर्श व मूल्ये निर्माण केली. बाबासाहेबांच्या आयुष्यात समाजाप्रति समर्पण व समाजनिर्माणाच्या एका अद्भुत संकल्पाची शपथ दृष्टिपथास येते. ज्या संघर्षमय वातावरणात बाबासाहेब आयुष्य जगले, कदाचित याहून अधिक संघर्ष अजून कोणाच्या वाट्याला आला नसावा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त एक वकील नव्हते, तर ते एक महान लेखक, अर्थशास्त्री, कायदेतज्ज्ञ, समाजसेवी आणि एक दूरदर्शी नेतासुद्धा होते. भारतीय समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय प्रक्रियेबद्दल बाबासाहेबांचे विचार अतुलनीय होते. या अनन्यसाधारण गुणवत्तेच्या जोरावर बाबासाहेब स्वतंत्र भारतात प्रथमच विधी आणि सामाजिक न्यायमंत्री झाले. ते भारतीय संविधानाचे जनक तसेच भारताच्या प्रजासत्ताक निर्मात्यांपैकी एक होते. भारतीय संविधाननिर्मितीच्या योगदानामुळेच त्यांना ‘भारतीय संविधानाचे पितामह’ म्हणूनही संबोधले जाते. देशाला दिशा देणारे बाबासाहेब समता, स्वतंत्रता आणि समरसतेच्या सौंदर्याचे प्रतीक पुरुष होते. संविधानाविषयी ते म्हणायचे की, “संविधान हे वकिलांसाठी फक्त पुस्तक नसून ते खर्या अर्थाने जीवन जगण्याचे एक माध्यम आहे.”
देशाच्या स्वातंत्र्यानंतर, देशासमोर सर्वात मोठे आव्हान हे एक सर्वसमावेशक, आदर्श संविधाननिर्मितीचे होते. तसेच भविष्यासाठी अशा संविधानाची रचना करायची होती, जी देशाला दिशा देऊ शकेल आणि येणार्या काळात भारतीय लोकशाहीला अधिक मजबूत करेल. आज आपल्याकडे एक विस्तृत, सशक्त आणि सर्वसमावेशक संविधान आहे, ज्याचा समाजातील प्रत्येक वर्ग, वर्ण, धर्म किंवा संप्रदाय अभिमान बाळगतो. याचे संपूर्ण श्रेय फक्त बाबासाहेबांनाच जाते, यात कोणतेही दुमत नाही. या संविधानाची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, समाजातील प्रत्येक वर्गाला समानता, एकरूपता व एकात्मतेच्या आधारे मार्गक्रमण करता येते. समानतेचे समर्थक असलेले बाबासाहेब शिक्षणाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात की, “शिक्षणाचा जेवढा अधिकार पुरुषांना आहे, तेवढाच तो अधिकार स्त्रियांनादेखील आहे.”
१९५१ मध्ये बाबासाहेबांनी वित्तीय कमिशनची स्थापनादेखील केली. देशात लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नि:पक्ष निवडणूक आयोगाची संकल्पनादेखील त्यांनीच अमलात आणली. त्यांच्याच दूरदृष्टीचा परिणाम म्हणजे, आज भारत विश्वातील सर्वात मोठा व सशक्त लोकशाहीचा देश म्हणून ओळखला जातो.
हीच दूरदृष्टी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीतूनदेखील प्रतिबिंबित होते. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मूलमंत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांचे विचार हे १०० टक्के बाबासाहेबांचे जीवन व अनुभवांवरून प्रेरित आहेत, हे स्पष्ट होते. एकदा पंतप्रधानांनी बाबासाहेबांबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले होते की, “जर आज बाबासाहेब नसते तर मी देखील नसतो!” हे फक्त बाबासाहेबांमुळेच शक्य झाले की, समाजातील शेवटच्या स्थानावर उभी असलेली ती व्यक्तीदेखील आपल्या सामर्थ्याच्या जोरावर सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकते. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे जीवंत उदाहरण आहेत, असे म्हणता येईल.
मोदीजी हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित व प्रेरित आहेत. जेव्हा ते २०१० मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी ‘संविधान गौरव यात्रा’ आयोजित केली होती. असे करणारे ते देशातले प्रथम राजनेता ठरले. एवढंच नाही, तर त्यांची ही पदयात्रा बाबासाहेबांच्या विचारांप्रति व संविधानाप्रति अतूट विश्वासाचे प्रतीक ठरली. त्याची दुसरी झलक तेव्हा पाहायला मिळाली, जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन मोदीजी पहिल्यांदा संसदेत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी फक्त संसदेलाच नाही, तर संविधानासमोर नतमस्तक होऊन त्याच शुद्ध भावनेने बाबासाहेबांना देखील आदरांजली अर्पण केली.
समाज व राष्ट्राच्या प्रगती व उत्थानासाठी बाबासाहेबांचे विचार सर्वस्वी अनुकरणीय आहेत. ते नेहमी म्हणायचे, “जर कोणत्याही समाजाची प्रगती बघायची असेल, तर त्या समाजातील स्त्रियांची शिक्षणाबद्दलची परिस्थिती तपासावी.” केंद्र सरकारची ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना त्याच बाबासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारी आहे. ‘स्वच्छ भारत’, ‘अंत्योदय योजना’, ‘उज्ज्वला योजना’, ‘डीबीटी’, ‘जन-धन खाते’, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ असे अनेक प्रयत्न हे बाबासाहेबांच्या विचारानुसार भारतातील आर्थिक-सामाजिक सशक्तीकरणासाठीचे प्रामाणिक प्रयत्न आहेत.
काश्मीरबद्दलदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे अत्यंत स्पष्ट होते. संविधान निर्मितीच्या वेळी ‘कलम ३७०’ विषयी जेव्हा चर्चा होत होती, तेव्हाची एक घटना जाणून घेणे क्रमप्राप्त ठरावे. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी शेख अब्दुल्ला यांना बाबासाहेबांशी भेटून या विषयावर चर्चा करण्यास सांगितले होते. डॉ. आंबेडकरांनी शेख अब्दुल्लांना आपल्या भेटीदरम्यान सांगितले की, “जर तुम्हाला भारताने तुमच्या सीमेचे रक्षण करावे, तुमच्यासाठी रस्ते बांधावे, तुम्हाला अन्नधान्याचा पुरवठा करावा, असे वाटत असेल, तर मग काश्मीरलादेखील भारताच्या इतर राज्यांप्रमाणेच दर्जा मिळायला हवा. पण, याउलट तुमची मागणी अशी आहे की, भारत सरकारकडे तुमच्या राज्यात (काश्मीर) खूप कमी अधिकार असावे आणि भारतीय लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये काहीच अधिकार नसावे. जर तुम्ही या प्रस्तावावर माझी अनुमती घेत असाल, तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की, ही बाब भारतहिताच्या दृष्टिकोनाच्या विरोधात आहे. एक भारतीय कायदेमंत्र्याच्या नात्याने मी हे कधीच करणार नाही.” जम्मू-काश्मीरबद्दल बाबासाहेबांच्या विचारात एवढी स्पष्टता होती की, ते काश्मीरला विशेष दर्जा देण्याच्या विरोधात होते. त्यांच्या या स्वप्नाला, ज्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले, ते मात्र पूर्ण करण्याचे ऐतिहासिक काम पंतप्रधान मोदी यांनी दि. ५ ऑगस्ट, २०१९ रोजी पूर्ण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित पाच विशेष स्थानांना ’पंचतीर्थ’च्या स्वरूपात विकसित केले, जेणेकरून पुढच्या पिढीला सतत प्रेरणा मिळत राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, “आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत भारतीय आहोत आणि माझी इच्छा आहे की, भारताचा प्रत्येक मनुष्य भारतीय बनून राहो व शेवटपर्यंत भारतीय राहो व त्याशिवाय काहीही न बनो.” त्यांच्यानुसार, महान प्रयत्नांना सोडून या जगात काहीच बहुमूल्य नाही.
आज मोदीजींनी बाबासाहेबांच्या याच आदर्शांना समोर ठेवून ’राष्ट्र सर्वप्रथम’ या जयघोषाला आत्मसात केले. ’शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या आवाहनाला मंत्र स्वरूपात स्वीकारुन, जबाबदार नागरिक राष्ट्राला समर्पित करावे लागतील, ज्यामुळे सशक्त, समृद्ध आणि समरस राष्ट्र निर्माणास मदत होईल. पुन्हा एकदा बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांना आपल्या आयुष्यात मूलमंत्र स्वरूपात आपण स्वीकारायला हवे. आपले जीवन प्रदीर्घ नव्हे, तर भव्य व महान व्हायला पाहिजे. याच विचारांचे आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरावे...!
- आचार्य पवन त्रिपाठी