महाराष्ट्राला मागील दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्ती आणि विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. आधी ‘तौक्ते’ चक्रीवादळ, मग कोल्हापूर परिसरात आलेला महापूर, कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीने बसलेला फटका, या सगळ्या आपदांमुळे महाराष्ट्राला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. यंदादेखील गारपीट आणि अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांना झोडपून काढले असून तेथील शेतकर्यांना हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल होताना पाहावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्यातील फडणवीस-शिंदे सरकार शेतकर्यांना धीर देण्यासाठी प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर उतरल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संवेदनशील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाला भिंगरी लावून नुकसानग्रस्त शेतकर्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये फिरून नुकसानग्रस्तांना तत्काळ आवश्यक आणि शक्य तेवढी मदत देण्याचे निर्देश देत असून, अनेक ठिकाणी प्रत्यक्ष मदत पोहोचण्यास देखील सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राने कायमच एक तत्काळ अंमलबजावणी करायला लावणारा प्रशासक, संवेदनशील नेता आणि कार्यतत्पर नेतृत्व म्हणून मान्य केलेले आहे. मुख्यमंत्री असताना आणि नसतानाही त्यांनी कायमच जनतेशी असलेली नाळ जोडून ठेवली. तसाच प्रकार एकनाथ शिंदेंच्यादेखील बाबतीत पाहायला मिळतो. ‘कोविड’ आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये जनतेच्या हातात हात घालून त्यांना संकटातून बाहेर काढणारे नेता म्हणून शिंदेंचीदेखील ओळख महाराष्ट्राला मागच्या काळात झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही नैसर्गिक आपत्ती आणि आपदेच्या काळात खंबीरपणे उभे राहून महाराष्ट्रासाठी काम केलेले आहे आणि आजही राज्याचे कारभारी म्हणून ते दोघेही शेतकर्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करत आहेत. शेतकर्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग यावा, वेळेत नुकसान भरपाईसाठीही राज्य सरकार प्रयत्नशील दिसते. याउलट राज्य सरकारवर महाविकास आघाडी सत्तापिपासूपणाचा आरोप करत असली तरी सद्यःस्थितीत फडणवीस-शिंदे या राज्याच्या कारभार्यांची जनतेसाठी सुरू असलेली धडपड नक्कीच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता लक्षात ठेवेल!
हाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या घटनांमध्ये बाधित शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बांधावर असताना, राज्यातील विरोधी पक्ष मात्र स्वतःचे नगण्य अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतात. मुळातच राज्यशकट हाकताना प्रतिसाद देणारं सरकार आणि जबाबदार विरोधी पक्ष या दोन घटकांनी सोबत काम करणे अपेक्षित. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्रातील विद्यमान विरोधी पक्ष ज्यांची तीन तोंडे तीन दिशांना विभागली गेली आहेत, तो राजकीय स्वार्थ जपण्यापलीकडे फारसा काहीही करताना दिसत नाही. याउलट विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांनी राज्यात आलेल्या प्रत्येक संकटाची प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी करत सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. इतकंच नाही, तर शेतकर्यांना मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडलं होतं. पण, सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या पक्षांतर्गत राजकारणात गुरफटलेले आहेत. त्यांचे काका शरदराव पवार अजितदादांच्याच विरोधात स्वपक्षीयांना बळ देत असल्याचे पाहून दादांची अस्वस्थता चरमसीमेवर पोहोचली आहे. म्हणूनच अजितदादांना शेतकरी दिसत नसावेत, हा अंदाज. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तुलनेने नवखे असले तरी त्यांच्यातील आक्रमक शिवसैनिकाचेही दर्शन कधीच सभागृहात झाले नाही. शिवसेनेत जावं की ठाकरे गटाच्या बुडत्या नावेत कळपातील मेंढरसारखं दडून राहावं, या द्वंद्वात ते अडकलेलेच! एरवी सातत्याने राज्याचे दौरे करणारे मोठे साहेब मविआच्या फाटक्यात पाय घालून आपली पोळी भाजतायत, तर दुसरीकडे पक्ष अन् चिन्ह गेल्याच्या धक्क्यातून अजूनही न सावरलेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मोदी-शाहंना शिव्या देऊन दर्जाहीन कोट्या करण्यातच धन्यता मानत आहेत. निसर्गाने फटकारलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आणि जनतेसाठी एकीकडे फडणवीस-शिंदे हे राज्याचे कारभारी धडपड करत असताना, विरोधी पक्ष मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी कासावीस होत आहेत आणि हीच महाराष्ट्राची सध्याची स्थिती आहे, हे खेदाने नमूद करावे लागत आहे.