काही लोक त्यांच्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडतात : अजित पवार
"अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास हा त्यांचा मुद्दा," राऊतांचं प्रत्युत्तर
12-Apr-2023
Total Views | 70
14
मुंबई : "ईव्हीएममध्ये घोळ करता आला असता, तर देशातील अनेक विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते. एवढ्या मोठ्या देशात गडबड कुणी करू शकत नाही. पराभवाचे कारण काही लोक ईव्हीएमवर ढकलून देत आहेत.", अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी सुनावले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत त्यात घोळ होत असल्याची टीका केली होती. मात्र, अजित पवारांनी ही शक्यता धुडकावत त्यांनाच आरसा दाखवला आहे.
अजित पवार म्हणाले, "मला ईव्हीएमवर पूर्णपणे विश्वास आहे. कुणीही ईव्हीएममध्ये फेरफार करू शकत नाही. ही एक मोठी यंत्रणा आहे. त्यात कुठल्याही व्यक्तीला फेरफार करता येत नाही. काही पक्ष आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडतात. मात्र, हाच जनादेश आहे, असे ते विसरून जातात." यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतूक केले होते. "ज्या पक्षात केवळ दोन खासदार होते, त्याच पक्षाने २०१४ मध्ये जनतेचा विश्वास जिंकत सरकार तर स्थापन केलेच. शिवाय देशाच्या कानाकोपऱ्यात आपला पक्ष पोहोचवला." अजित पवारांच्या या विधानाला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्व प्राप्त झाले आहे.
यालाच विरोध करत उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांना सुनावले आहे. "अजित पवार हे महाविकास आघाडीतील सहकारी आहे. त्यांना जर ईव्हीएमवर विश्वास असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, या देशातील नागरिकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. अजित पवारांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे. मी हे मानत नाही." ठाकरे गट आणि राष्ट्रवादीत यामुळे चांगलीच जुंपली. ईव्हीएमवर विश्वास दाखवल्याबद्दल अजित पवारांना राऊतांनी टोलाही लगावला आहे.