नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसन याचं भारतप्रेम सर्वश्रुत आहे. पीटरसननं अनेकदा भारताबद्दलच्या त्याच्या भावना मोकळ्या मनाने व्यक्त केल्या आहेत. भारतीय संस्कृती आणि येथील माणसांचा स्वभाव, याविषयी पीटरसननं अनेकदा भूमिका मांडली आहे. केविन पीटरसनला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वाची भूरळ असून त्याने स्तुतिसुमनं उधळली आहेत. एवढंच नाही, तर मोदींचा उल्लेख केविननं ‘हिरो’ असा केला आहे. केविन पीटरसनचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पीटरसनने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “आयकॉनिक! वन्यप्राण्यांवर प्रेम करणारा एक जागतिक नेता, जो या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांच्यासमवेत वेळ घालवण्यासाठी प्रचंड उत्सुक असतो. लक्षात ठेवा, मोदींनी त्यांच्या गेल्या वाढदिवसाच्या दिवशी भारताच्या वन्यक्षेत्रात चित्ते सोडले होते. हिरो! नरेंद्र मोदी,” असं केविन पीटरसननं आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.पीटरसनंच हे ट्वीट मोदींच्या जंगल सफारीच्या पार्श्वभूमीवर आहे. रविवार, ९ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी कर्नाटकच्या बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पांना भेट दिली. यावेळी मोदींनी जंगल सफारीचा आनंद लुटला. पंतप्रधान मोदींच्या याच दौर्यादरम्यानचा एक फोटो ट्वीट करून केविन पीटरसननं मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.