नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकादा धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशांने दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबरसह प्रवाशांना मारहाण केली आहे. या मारामारीत २ जण जखमी झाले. ही घटना दि.१० एप्रिल रोजी सकाळी ६.३५ वाजता एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI-111 ने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उड्डाण घेत असताना घडली.
आरोपी प्रवाश्याने विमानात सहप्रवाशांशी भांडण सुरू केले. तसेच त्याला समजावून सांगण्यासाठी आलेल्या विमानातील क्रू मेंबर्सवरही त्याने हल्ला केला. यावेळी बराच वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही जेव्हा आरोपी प्रवाशांने गोधळ घालणे थांबवले नाही तेव्हा वैमानिकाने दिल्लीहून लंडनला जाणारे विमान पुन्हा दिल्लीच्या दिशेने वळवले.
आरोपीच्या या भांडणात विमानात बसलेले २ जण जखमी झाले.दिल्लीला परतताना विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विमानातून आगाऊ माहिती देण्यात आली. त्यामुळे विमानतळावर उतरताच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. एअर इंडियाने आपल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जखमी क्रू मेंबर्सवर उपचार सुरू असून एअर इंडियाने त्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळेत बदल करून दुपारी विमान पाठवण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे.
याआधी ही दि.७ एप्रिल रोजी दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत क्रू मेंबर्सना शिवीगाळ करत विमानाचे गेट उघडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आरोपी प्रवाशाला बेंगळुरू विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते.