तापमानवाढीचा बियाणांवर परिणाम

    10-Apr-2023   
Total Views | 82
Effects of warming on seeds

वाढती लोकसंख्या आणि जागतिकीकरणाचे संपूर्ण सजीव सृष्टीवरच घातक परिणाम झालेले दिसतात. लोकसंख्येच्या विस्फोटामुळे तर जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, मानवी अस्वास्थ्य असे एक ना अनेक परिणाम जाणवतात. त्यातच २०२० आणि २०२१ ही दोन वर्षं बघितली, तर तापमान आणि पावसाच्या अतिरेकाचाही अंदाज बांधता येईल. अतिउष्ण, अतिपर्जन्य आणि अतिशीत अशा विचित्र तापमान बदलांसमोर जगातील एकाही देशाचा टिकाव लागला नाही. अशा या जागतिक तापमानवाढीचे पिकांबरोबरच बियाणांवर देखील तितकेच विपरीत परिणाम झालेले जाणवतात.

अतितापमान किंवा अतिपर्जन्यामुळे संपूर्ण भारतातील बियाणांचा दर्जा आणि आकार कमी झाला आहे, अशी माहिती एका सर्वेक्षणातून नुकतीच समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीचा दर्जा खालावला व त्यामुळेच पिकांना आवश्यक ती मूलद्रव्ये कमी प्रमाणात मिळाल्यामुळे पिकांची वाढ देखील योग्यरितीने झाली नसल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. म्हणजे तापमानवाढीचा एकूणच बियाणांच्या आकारमानावर तर परिणाम झालाच, पण त्याचबरोबर या बियाणांचा दर्जाही घसरला आणि पर्यायाने उत्पादन घटले, असे हे दुष्टचक्र!अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात कीटकनाशकांवर बंदी घालण्याचे प्रकरण विचाराधीन आहे. २०२० मध्ये मानवी स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरणार्‍या २७ कीटकनाशकांवर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर फेरविचार करत २७ पैकी केवळ तीन कीटकनाशके घातक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट केले.

यानिमित्ताने पुन्हा एकदा कीटकनाशकांचा भडिमार करून पिकवलेले धान्य, भाज्या, त्यांचा पिकांवर आणि उत्पादनावर होणारा परिणाम, हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले. कीटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी जरी कीटकनाशके फवारली जात असली तरी त्याचे दुष्परिणाम कालौघात दिसून येतात. जगातील इतर देशांमध्येही कीटकनाशके घातक घोषित करून त्यांच्यावर बंदी आणल्यामुळे ती वापरली जात नाहीत. याविषयी अभ्यास करताना लक्षात घेतले, तर आणखी एका अहवालानुसार जगभरातील तब्बल १ लाख ६८ हजार शेतकर्‍यांनी कीटकनाशके पिऊनच आत्महत्या केल्याचा अहवालही उपलब्ध आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये १०६.८४ दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन झाले. हे उत्पादन २०२१ पेक्षा २.७५ दशलक्ष टनांनी कमी नोंदवण्यात आले. तांदळाच्या पिकाच्याबाबतीत सांगायचे तर पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये ‘बौने’ विषाणूचा प्रसार झाल्यामुळे तांदळाच्या उत्पादनावर परिणाम झाला. ऑगस्ट २०२२ मधील अतिवृष्टीमुळे पिकांच्या परिपक्व होण्याच्या कालावधीत बदल झाल्याने आपसुकच त्यांची गुणवत्ताही ढासळली.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मे आणि जून या महिन्यांमधील उच्च तापमान हे पिकांवरील रोगप्रसाराच्या संभाव्य कारणांपैकी एक कारण. तापमानाचा परिणाम झाल्यामुळे बियाणांची वाढ अपूर्ण झाली. परिणामी, बियाणांमध्ये ‘एंडोस्पर्म’ची वाढ झाली नसल्याचे निदर्शनास आले.

‘एंडोस्पर्म’ हा वनस्पतीच्या विकासामध्ये अन्न साठवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारा एक घटक.त्याचबरोबर पिके उगवण्याच्या विविध टप्प्यांपैकी काही विशिष्ट कालावधीत पाऊस पडला, तर पिकांचे विशेष नुकसान होते. उदा. भात पिकाच्या फुलावर आलेल्या वेळेत पाऊस पडला, तर येणार्‍या तांदळाची चमक जाते व त्याचा परागीकरणावर ही परिणाम होतो.झपाट्याने बदलणार्‍या जागतिक हवामान आणि तापमानवाढीमुळे प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर कसे परिणाम होतात, ते आपण पाहिलेले आहेच. मात्र, त्याचा परिणाम इतर सर्व सजीवसृष्टीसहीत धान्यावर आणि पिकांवरही होताना दिसतो. याचाच अर्थ जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाच्या समतोलाकडे लक्ष देणे, ही काळाची गरज आहे, हे ओळखून त्यादृष्टीने वेळीच पावले उचलायला हवीत.




समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121