पुन्हा खुणावणारा ‘कोरोना’

    10-Apr-2023
Total Views | 77
Corona


‘रोज मरे त्याला कोण रडे.’ गेली तीन वर्षे आपण कोरोनाच्या दहशतीखाली काढली. या काळात आपल्या शरीरात व आपल्या मानसिकतेतही बदल झाला आहे. व्हायरसमध्ये जसे ‘म्युटेशन’ होते, तसे ते आपल्या शरीरातही होऊ लागले. आपले शरीर कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी जास्त सज्ज झाले आहे. आपल्या मानसिकतेतही बराचसा बदल झाला आहे. तरी अजूनही पूर्वीसारखीच काळजी घेणे तितकेच क्रमप्राप्त.

दि. २४ मार्च, २०२० रोजी ‘लॉकडाऊन’ घोषित झाले व तेव्हापासून नंतर जगण्याची एकूणच पद्धत बदलली. सर्व व्यवहार ठप्प झाले. सर्व कुटुंबाला सक्तीने घरी बसावे लागले. ज्यांना या आजाराची लागण झाली, त्यांना सक्तीने ‘क्वारंटाईन’मध्ये किंवा इस्पितळात ठेवण्यात आले. अनेक जणांचे मृत्यू हे कोरोना या आजारातील गुंतागुंतीमुळे झाले. या सर्वांतून सावरण्यास अनेक महिने गेले. या काळात केंद्र सरकारने प्रभावीपणे काम केले. कोरोना रुग्णालयांची विक्रमी वेळात उभारणी, मोफत उपचार, ’आरटीपीसीआर’ या महागड्या चाचणीचा मोठ्या प्रमाणात निदानासाठी वापर. गरिबांना मोफत धान्यपुरवठा अशा अनेक आघाड्यांवर सरकार काम करत होते. दि. १६ जानेवारी, २०२१ला ‘कोविड ’विरोधी लस उपलब्ध झाली. तिचे मोफत वितरण देशभर झाले. १०० कोटींच्यावर लोकांनी पहिला डोस घेतला. बर्‍याच लोकांनी दुसरा डोस घेतला, तर फार कमी जणांनी तिसरा डोस घेतला.

आजार जुना झाल्यावर त्याची दहशतही कमी झाली होती. २०२०च्या वर्षअखेर जनजीवन हळूहळू सामान्य होऊ लागले होते. काही बंधने घालून दैनंदिन व्यवहार सुरु होत होते. लसीकरण सुरू झाले होते आणि लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात होता. लोक काळा भूतकाळ विसरू पाहत होते, अशा वेळेस एप्रिल २०२१च्या सुमारास कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा गंभीर होती. अनेक जणांचे यात धक्कादायक व अकाली मृत्यू झाले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. काही आठवड्यात साथ आटोक्यात आली, पण तोपर्यंत जनजीवन पुन्हा एकदम उद्ध्वस्त झाले होते. अनेकांनी आपले रोजगार गमावले होते. अनेकांना आपल्या उद्योगधंद्यातील आर्थिक नुकसानीमुळे आपले धंदे बंद करावे लागले.

कोरोनाची लाट सुरू होऊन आज तीन वर्षे उलटून गेली, तरी कोरोनाची दहशत अजून संपलेली नाही. याची प्रचिती सध्याच्या नवीन लाटेने येत आहे. देशभरात एका दिवसात पाच हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळू लागले आहेत. त्यातच ‘एच३एन२’ या नवीन ‘व्हायरस’ची लागण सुरु झाली व ही साथ पसरते आहे, ही भीती निर्माण झाली. मनुष्य प्रजाती या पृथ्वीतलावर हजारो वर्षे अस्तित्वात आहे. त्याचबरोबर इतर प्राणी, वनस्पती, पंचमहाभूते या सर्वांचे अस्तित्व पृथ्वीतलावर आहे. सृष्टीचा व्यवहार नियमबद्धरीतीने चाललेला असतो. व्हायरस, बॅक्टेरिया व इतर जीवाणू मनुष्याची प्रतिकार शक्ती चांगली असल्यास त्याला सहसा त्रासदायक ठरत नाही. साथीचा उद्रेक झाल्यावर किंवा महामारीत रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. कोरोनाच्या बाबतीत हेच घडले. बघता बघता हा रोग जगभर पसरला आणि तीन वर्षे उलटून गेली, तरी आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही.

कोरोना व्हायरस - फ्लू सदृश्य लक्षणे या आजारात उद्भवतात. यात होणार्‍या गुंतागुंतीमुळे अनेकांचे मृत्यू उद्भवतात. १९१८ साली स्पॅनिश फ्लूची साथ जगभर पसरली. लाखो लोकांना त्याची लागण झाली व हजारो मृत्युमुखी पडले.


’एच१एन२’ व्हायरस - ‘एशियन फ्लू’ महामारी. १९५७-५८ दक्षिण चीनमध्ये या आजाराची सुरुवात झाली व तो झपाट्याने जगभर पसरला. कोट्यवधी लोकांना त्याची लागण झाली व लाखो लोक यात मृत्यू पावले. सुदैवाने यावरील लस लवकर विकसित करण्यात आली व त्याचा उपयोग ही महामारी संपविण्यात झाला.

’एच३एन२’ व्हायरस - हाँगकाँग फ्लू व्हायरस. सध्या ज्या व्हायरसची चर्चा चालू आहे तो म्हणजे ‘एच३एन२’ व्हायरस. जुलै १९६८ साली या व्हायरसची साथ भारत आणि उर्वरित आशिया खंडात पसरली. व्हिएतनाम युद्धावरून अमेरिकेत परतणार्‍या सैन्यामुळे ही साथ अमेरिकेत फोफावली. या आजारावर लस शोधण्यात आली व साथ आटोक्यात आली.

या काही व्हायरसबद्दल माहिती यासाठी दिली की, काही वेळा अज्ञान चांगले असते. आमच्या लहानपणी सर्दी, खोकला झाला, तर आईच्या हाताने लावलेल्या ‘व्हिक्स वेपोरब’ने तो बरा व्हायचा. हॉस्पिटल गाठावे लागले, असे क्वचित व्हायचे. गोवरची साथदेखील घरोघर यायची. सर्व चाळीत पसरायची, पण गुंतागुंतीचे प्रमाण कमी होते. हल्ली व्हायरसबद्दल ज्ञानात भर पडली, पण आजार मात्र खर्चिक झाले. याचा अनुभव कोरोना काळात घेतला. ज्यांना सरकारी इस्पितळात बेड नाही मिळाले, त्यांचे बिल कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये पाच ते दहा लाखांच्या घरात जाऊ लागले. कोरोनाचे निदान करण्यासाठी लागणारी ‘आरटीपीसीआर’ ही चाचणी साडेचार हजार रुपयांत होत होती.कोरोनाची पहिली लाट आली. दुसरी लाट आली. अनेक लाटांची भाकिते करण्यात आली. त्यासाठी तयारी करण्यात आली, पण लाट काही आली नाही. आता नवीन लाट आपल्या उंबरठ्यावर आली आहे.

या नव्या ‘कोरोना’ लाटेत काय करावे?

‘रोज मरे त्याला कोण रडे.’ गेली तीन वर्षे आपण कोरोनाच्या दहशतीखाली काढली. या काळात आपल्या शरीरात व आपल्या मानसिकतेतही बदल झाला आहे. व्हायरसमध्ये जसे ‘म्युटेशन’ होते, तसे ते आपल्या शरीरातही होऊ लागले. आपले शरीर कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी जास्त सज्ज झाले आहे. आपल्या मानसिकतेतही बराचसा बदल झाला आहे. जीवनाबद्दलची आसक्ती कमी झाली आहे. मृत्यूचे भय कमी झाले आहे. आपली काळजी आपणच घेतली पाहिजे, हे मनोमन पटू लागले आहे. आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य जीवनशैली, समतोल आहार, आधुनिक वैद्यकशास्त्राबरोबरच आर्युवेद, होमियोपॅथी, नॅचरोपॅथी, योग, ध्यानधारणा, विपश्यना, ब्रह्मविद्या यांचा स्वीकार व अवलंब आवश्यक आहे. दररोज स्वत:साठी दोन तास देणे. यात व्यायाम, चालणे, योग, ध्यानधारणा, प्राणायाम यांचा अवलंब करावा. जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. जेवण प्रसन्न चित्ताने करावे. आहारात समतोल आहार, हितभूक, मितभूक या तत्त्वांचा अवलंब करावा.

सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार अंगावर काढू नये. आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुंतागुंत वाटत नसेल, तर सर्वच रुग्णांची चाचणी करण्याची आवश्यकता नाही. कोरोनाचा आजार जसा जुना होत राहिला आहे, तसे यातील गुंतागुंतीचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाण कमी होत राहिले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने इलाज केल्यास कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णदेखील गुंतागुंत न होतो बरा होतो.या कोरोना काळात अनेक सार्वजनिक आरोग्याचे नियम पाळायला आम्ही शिकलो. वरिष्ठ नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, बाहेर पडताना मुखपट्टीचा वापर करणे, हात वारंवार धुणे, हस्तांदोलन टाळणे, गळाभेट टाळणे या गोष्टी आता अंगवळी पडल्या आहेत. या नवीन लाटेत या सर्व गोष्टींचा आपणास अवलंब करावा लागेल.


कोरोना लसीकरण : दि. १६ जानेवारी, २०२१ पासून देशात लसीकरण सुरु झाले. केंद्र सरकारतर्फे सर्व राज्यांमध्ये लस मोफत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आली. पहिला डोस व्यवस्थित घेतला गेला. दुसर्‍या डोसमध्ये थोडी शिथिलता आली आणि तिसरा डोस फार कमी जणांनी घेतला. हे मनुष्य स्वभावास अनुसरुन आहे. जेव्हा लस काही ठरावीक वयोगटासाठी उपलब्ध होती तेव्हा ओळख काढून ती लस घेण्यासाठी आटापिटा करण्यात आला. परंतु, साथ कमी झाल्यावर लोकांचा लसीकरणाचा उत्साह कमी झाला.

आज गरज आहे, प्रभावी लसीकरणाची. आजही अनेक असे नागरिक आहेत की, ज्यांनी पहिला डोसदेखील घेतला नाही. अज्ञान, अहंकार, गैरसमज, आळस यामुळे ते आपला धोका तर वाढवित आहेतच, पण त्याचबरोबर ते कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याच्या मार्गात अडथळा आणत आहेत. आरोग्य यंत्रणेने एकही डोस न घेतलेले नागरिक शोधून त्यांचे लसीकरण प्राधान्याने करावे, तसेच ज्यांचा दुसरा व तिसरा डोस राहिला आहे, त्यांना तो घेण्यासाठी प्रवृत्त करावे. सध्याच्या कोरोना साथीवर आळा घालण्यासाठी तो प्रभावी मार्ग ठरेल.ताप, सर्दी, खोकल्यासाठी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरी व्यवस्थित आराम करा व लवकर बरे व्हा.कोरोनाच्या नवीन लाटेत देव तुम्हा-आम्हा सर्वांचे रक्षण करो!



-डॉ. मिलिंद शेजवळ



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121