नवी दिल्ली : टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क हे आता नवीन व्यवसायात नशीब आजमावत आहेत. काही दिवसापुर्वी मस्क यांनी परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. आता मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बाजारात बिअर आणली आहे. ही माहिती टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन टेस्ला गीगाबिअरची माहिती देण्यात आली आहे. या बिअरची किंमत भारतीय चलनात ८००० रूपये आहे. या बिअरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
टेस्लाच्या गीगाबिअरमध्ये ५ टक्के अल्कोहलची मात्रा आहे. या बिअरच्या पॅकमध्ये तीन बाटल्या असणार आहेत. प्रत्येक बाटली ३३० मिलिची आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी एलॉन मस्कने जर्मनीतील एका कार्यक्रमात बिअर बाजारात पाऊल ठेवण्याची घोषणा केली होती.टेस्लाने यापूर्वी मद्य बाजारात टेस्ला टकीला आणले होते. हे त्यांचे पहिले अल्कोहॉलिक ड्रिंक होते. यांची किंमत २ डॉलर होती. ग्राहकांना दोन बाटल्या ऑर्डर करण्याची अनुमती होती. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही बिअर १५० ते २०० रूपयांच्या दरम्यान मिळते.
जर्मनीमध्ये टेस्ला गीगाबिअरची निर्मिती होत आहे. बेल्जिअम, चेक गणराज्य, डेनमार्क, जर्मनी, स्पेन, फ्रांस, आयर्लंड, इटली, लक्झिमबर्ग, नेदरलँड, नॉर्वे, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि युनायटेड किंगडममध्ये ही बिअर खरेदी करता येणार आहे. मात्र भारतात ही बिअर कधी येईल, याची माहिती अद्याप समोर आली नाही.