मराठी वास्तवापासून फारकत

    01-Apr-2023
Total Views | 308
Muslim Marathi Literature Conference and Abdul Kader Muqadam

मुकादम साहेबांसारखे असगर अली इंजिनिअर यांचा वारसा सांगणारे गृहस्थ मुस्लीम मानसिकतेच्या चौकटीतून आणि आपला सांस्कृतिक वारसा अरब जगात शोधण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकले नाहीत. त्यांना भारतीय संत परंपरेशी तादात्म्य साधणारे मुस्लीम मराठी संत साहित्य आपलेसे वाटत नाही, तेथे जावेद कुरेशींसारख्या ‘एआयएमआयएम’च्या कार्यकर्त्याकडून आणि इतर तशीच मानसिकता ठेवणार्‍या मुस्लीम मराठी लेखकांकडून काय वेगळी अपेक्षा ठेवता येणार?


मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुधारणावादी मुस्लीम विचारवंत अब्दुल कादर मुकादमांनी भूषविल्याचे मागे आपण वाचलेच आहे. त्यांना वेळेअभावी पूर्ण भाषण वाचता आले नव्हते. जो थोडा वेळ त्यांना मिळाला, त्यात त्यांनी एका मुस्लीमविश्व कोशाचा उल्लेख करून त्यातील पाचव्या खंडात मुस्लीम समाजावर मुल्ला-मौलवींची जी समाजाच्या प्रगतीत आड येत असणारी विखारी पकड आहे, त्याचा निर्देशकेला होता. मी भाषण संपल्यावर त्यांना भेटलो. त्यांचे एक पुस्तक माझ्याजवळ आहे. त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली आणि अध्यक्षीय भाषणाची प्रत मागितली. तेव्हा ती उपलब्ध नव्हती. मी थोडा चिवटपणा दाखवला, त्यांच्याशी दोन-चार वेळा दूरध्वनीवरून संवाद साधला. सुमारे तीन महिन्यांनी मला भाषणाची छापील प्रत मिळाली. ती उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मुकादम साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या भाषणाला मुस्लीम मराठी साहित्याची पार्श्वभूमी होती. मुस्लीम मराठी साहित्याच्या प्रेरणा, त्यांचे अनुभव विश्व, सामाजिक अनुभवांची शिदोरी, त्यात नव्या सामाजिक आणि राजकीय संदर्भात प्रकट होऊ शकतील, असे विषय यावर मुक्त चिंतन मुकादम साहेबांनी केले असेल, अशा अपेक्षेने मी वाचन करू लागलो, पण माझ्या पदरी घोर निराशा आली.


छापिल २० पृष्ठांच्या भाषणाचे विषयवार भाग करायचे, तर ढोबळमानाने तीन प्रकार करता येतील.ललित आणि वैचारिक साहित्यातील भेद आणि त्यामागील बांधिलकी - (४ पृष्ठे.) या भागात दोन प्रकारच्या साहित्य प्रकारांची केवळ माहिती आहे.इस्लाम स्थापनेनंतर मध्यपूर्व आणि अरब समाजात निर्माण झालेले वैचारिक आणि विशेष करून वैज्ञानिक साहित्य - (१० पृष्ठे.) त्यात केवळ तोंडी लावण्यापुरता मुस्लीम साहित्यिकांचा उल्लेख आणि एकूणच मुस्लिमांना मराठी साहित्यात खलनायकाची भूमिका दिल्याबद्दलची खंत, असे विवरण आहे. इस्लामपूर्व काळातील अरब समाज सांस्कृतिक व वैचारिकदृष्ट्या आदिम अवस्थेत होता. पण, पैगंबरांच्या निधनानंतर केवळ २०० वर्षांत समाजाने या क्षेत्रात प्रगतीची जी झेप घेतली ती विस्मयकारक होती. (पृ १२). या भागात उल्लेखलेले अनेक ग्रंथ खुद्द मुस्लीम समाजाला तरी माहीत असण्याची शक्यता किती, याचा विचार दिसत नाही. एक नक्की की, त्या ग्रंथांचा मुस्लीम मराठी साहित्याच्या बाबतीत काय संबंध आहे, याचे स्पष्टीकरण मुकादम साहेबांनी दिले असते, तर ते योग्य वाटले असते. इस्लाम आल्यावरच अरबांची सांस्कृतिक प्रगती झाली, यावरच त्यांचा भर होता. त्यांचे हे विधान बहुसंख्य मुस्लीम लेखक विचारवंतांचे आवडते विधान असते. ते खरेच आहे का?

इथे अरब म्हणजे कोणता समाज, हे आधी समजून घेतले पाहिजे. केवळ सौदी अरेबिया, खाडीतील आज वेगळे अस्तित्व दिसणारे टींबाएवढे आणि दक्षिणेस येमेनमधील देश म्हणजे अरब नव्हेत. उत्तरेस सीरिया, इराक, पश्चिमेकडे इजिप्त ते मोरक्कोपर्यंत सर्वच अरब देश आहेत. जिथे फराहोंची संस्कृती जन्मली, हजारो वर्षे नांदली, ज्या वारशाचा इजिप्शियन लोकांना अभिमान आहे, त्यानंतर जेथे ख्रिश्चन धर्म वाढला, कॉप्टिक ख्रिश्चन परंपरा वाढली, ते अरब समाज सांस्कृतिक व वैचारिकदृष्ट्या आदिम अवस्थेत म्हणावेत? अरब समाज गेली हजारो वर्षे तैग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या दोआबात वस्ती करतो आहे. त्या सुपीक भूमीत अनेक संस्कृती निर्माण झाल्या आणि उद्ध्वस्त झाल्या, ज्या जुन्या करारातील सर्व प्रेषितांना कुराण शरीफमध्ये पूर्व प्रेषितांचे स्थान मिळाले आहे, त्या प्रदेशातील अरब समाज सांस्कृतिक व वैचारिकदृष्ट्या आदिम अवस्थेत समजावा? अगदी अरबस्तान, मक्का-मदीना आहेत तो प्रदेश तरी आदिम अवस्थेत होता का? नव्हता. तेथे हजरत खदीजांसारखी कर्तबगार महिला व्यापारी होती, तिला आपला जीवनसाथी निवडण्याची मुभा होती, जेथे काव्य परंपरेला समाजात स्थान होते, त्या संस्कृतीला ते केवळ मूर्तीपूजक होते म्हणून त्यांना एकजात सर्व मुस्लीम समाज ‘रानटी’, ‘आदिम’ म्हणून मोकळा होतो. ती त्यांची एकांतिक मानसिकता आहे.


 हा समाज स्थिर नव्हता, असेही नाही. मक्केच्या आणि इतर मरूस्थल (Oasis) ठिकाणी स्थिर समाज होता. मक्का आणि मदीना ही दोन्ही शहरे व्यापारी मार्गावर होती. अशा परिस्थितीत ते या शहरांमधून आदिम जीवन जगत होते, असे म्हणणे परिस्थितीचा विपर्यास करणे होईल. अल्बर्ट हौरानी त्याच्या 'History of Arab Peoples' यात देतो की, अरबी भाषेत वृत्तबद्ध काव्य करण्याची परंपरा होती. त्या प्रकारच्या रचना विशेष व्यक्तीसाठी अथवा स्मरण प्रसंगी रचून म्हणत असत. त्यांना ‘कसिदा’ म्हणत. ते काव्य उपमा-उत्प्रेक्षांसह असे. आपण कशिदा, म्हणजे कलाकुसरीने केलेले विणकाम म्हणतो, त्याचे मूळ या काव्यापर्यंत जाते. त्यात बौद्धिक मेजवानी, गूढार्थ असे. काव्याच्या आरंभी कवीचे गाव सांगितले जाई. त्यात प्रेमालाप असे, पण अश्लिलता नसे. सार्वजनिक ठिकाणी गाईल्या जाणार्‍याकाव्याला ‘दीवान’ म्हणत. हौरानीने अगदी थोडकी माहिती दिली असली तरी त्यातील वैचारिक श्रीमंतीची झलक दिसते. या सांस्कृतिक वारशाला ग्रहण लागले ज्यावेळी काही स्वतंत्र बाण्याच्या कवींनी पैगंबरांची आगळीक केली. त्यासाठी त्यांच्यावर ‘सर तन से जूदा’ शिक्षा अमलात आली. तसेही जे कुराण शरीफमध्ये आहे तेच सर्वत्र, तर वेगळ्या साहित्याची गरज काय, असे म्हणून ते कॉन्स्टंटिनोपल ते नालंदापर्यंत वाचनालये जाळणारे इतर संस्कृतींना मान्यता देतील? एकंदरच मुस्लीम उम्माची सांस्कृतिक समज बदलण्याची आवश्यकता आहे.

परंपरांची निवड


धर्मांतरित आणि स्थलांतरित समाजांसमोर एक मोठा आणि कळीचा प्रश्न असतो, त्यांनी नवा धर्म अथवा नव्या प्रदेशात वास्तव्य स्वीकारल्यानंतर कोणती परंपरा स्वीकारायची? याचे उत्तर भारतीय मुस्लीम समाजाने शोधले नाही. इस्लाम, अल्ला आणि अल्लाचे रसूल स्वीकारल्यावर त्याच भूमीत विकसित झालेली परंपरा आयात करायची की ज्या परंपरेत त्यांचे पूर्वज जगले, तीच परंपरा पुढे चालवायची? हा प्रश्न खरेतर स्वातंत्र्यानंतर सुटायला हवा होता. उदाहरण द्यायचे झाले, तर जगातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाने प्राचीन हिंदू परंपरा सोडली नाही. भारतात उलटा प्रकार घडत राहिला. सामन्यात पाकिस्तान जिंकल्यावर मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये फटाके फुटत असत. रामजन्मभूमीचा इतिहास सर्वांना महिती आहे. ते मंदिर बांधून पूर्ण होण्यापूर्वीच ते ५० वर्षांत नष्ट करू, असा प्रचार माध्यमांमधून फिरतो आहे. त्याचा अस्वीकार करणारे पत्रक, निवेदन कोणत्याही मुस्लीम संघटनेने केलेले नाही. डॉ. पठाण यांनी कानउघडणी केल्याप्रमाणे भारतीय मुस्लीम यावेळीही राष्ट्रीय अस्मितेच्या संदर्भात गाडी चुकवणार आहेत, असे दिसते.

‘भारतातील संस्कृती संगम’ या शीर्षकाखाली दिलेल्या मजकुरात भारताबाहेरच्या लेखक आणि विद्वानांचे संदर्भ जास्त आहेत. त्यांचा ‘भारतीय संदर्भात ज्ञानसाधक’ असा उल्लेख केला आहे. अल्बेरूणी आणि अमीर खुस्रो हे दोन प्रमुख विद्वान. त्याशिवाय इतर विद्वानांची नावे दिली आहेत. ते सर्व परदेशी होते. फक्त एका धर्मांतरित ब्राह्मणाने रामायणाचे भाषांतर केल्याचा उल्लेख आहे. जाता जाता ते शहाजहानचा मोठा मुलगा दारा शिकोहचा विद्वानांचा ‘शिरोमणी’ असा उल्लेख करतात. त्याचा भाऊ असलेल्या औरंगजेबाने त्याला ‘काफिर’ ठरवून १६५९ मध्ये त्याचा खून करवला. कारण, तो मुस्लीम आणि हिंदू विद्वानांचा आदर करत असे. त्याने अनेक हिंदू ग्रथांची भाषांतरे करविली होती. मुकादम लिहितात की, औरंगजेबावर अनेक कादंबर्‍या, नाटके लिहिली गेली आहेत. परंतु, दारा शिकोह या सुफी संत प्रवृत्तीच्या शोकांत नायकावर मराठीत एकही पुस्तक नाही. तसे पाहिले तर मराठी मुस्लिमांना दारा शिकोह जवळचा कधी वाटला आहे? याचे कारण आतापर्यंत भारतीय मुस्लिमांसाठी औरंगजेब पाक बादशहा होता, कारण त्याने हिंदूंवर जिझिया कर लावला, गैर-मुस्लिमांना हालहाल करून मारले, मंदिरे तोडली. हे सर्व मुस्लीम मानसाला सुखावणारे होते. त्याचे कौतुक का तर तो कुराणाच्या प्रती लिहून आपली गुजराण करत असे. त्याची इतर खुनशी कृत्ये केवळ धार्मिकतेच्या बुरख्याखाली झाकली गेली. या मानसिकतेत जगणारे मराठीच काय, पण इतर प्रांतांतील मुस्लीम साहित्यिकांसाठी सर्व धर्मांचा आदर करणारा मानवतावादी दारा शिकोह कसा नायक ठरणार? तो काफिर ठरतो. त्याचे योग्य मूल्यमापन करणारे मुस्लीम नाहीत, हिंदू आहेत. मुस्लीम मानवतावाद हा काफिरांच्या संदर्भात उपस्थित होत नाही.

एकांगी विवरण


मुकादम साहेबांचे भाषण मला एकांगी वाटते. त्यांना अरबांच्या साहित्याचे, वैज्ञानिक प्रगतीचे कौतुक आहे. त्यांना भारतात येऊन आपले बुद्धिवैभव प्रदर्शित करणारे अल्बेरुणी, अमिर खुस्त्रोेचे कौतुक आहे. पण, भारतात जन्मलेल्या आणि भारतीय साहित्य आणि संस्कृतीशी एकरूप झालेल्या संत आणि वैज्ञानिकांचा उल्लेखही करावा वाटत नाही. कबीर, रसखान, रहिम या संतांच्या रचना साहित्य म्हणूनही उत्कृष्ट आहेत. ते हिंदू देवतांचे भक्त होते, केवळ यामुळे मुकादम साहेबांना ते निर्देश करण्यायोग्य वाटले नाहीत? तीच गोष्ट मुस्लीम मराठी संतांच्या बाबतीत आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाबाबत एक शब्द नाही. पाकिस्तानने अब्दुस सलामांना ते केवळ अहमदीया आहेत म्हणून वाळीत टाकले. त्याची तुलना मुकादम साहेबांनी यु. म. पठाणांच्या संत साहित्यावर टाकलेल्या बहिष्काराशी करावा काय? मुकादम साहेबांनी माझे ज्येष्ठ मित्र आणि सुफी साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. मुहमद आझम यांचाही उल्लेख केला नाही. मराठीत सुफी गूढवादाचे सविस्तर विवेचन करण्याचे श्रेय आझम साहेबांना जाते. त्यांचं कौतुक कोणाला? माझ्यासारख्या काफिराला! जर मुकादम साहेब साहित्यिक म्हणून कुरेशींना उद्धृृत करतात, तर डॉ. मुहमद आझम यांना सुफी विचारवंत म्हणून का नावाजत नाही? वैज्ञानिक क्षेत्रात भारताचे मिसाईल पुरुष अब्दुल कलांमांचा निर्देश का विसरतात? कलामांचे कौतुक फक्त हिंदूंनीच करावे.


मुस्लिमांनी त्यांना का वाळीत टाकले? कारण, ते भगवद्गीतेची महती सांगत. मुस्लमानांची जी विद्यापीठे वेगळी आहेत तेथे त्यांच्या नावे एखादा मोठा मार्ग, वाचनालय आता तरी आहे. मुस्लीम वाचकांनी जर सकारात्मक माहिती दिली आणि ती देताना २०१४ पूर्वीची असेल, तर मला आनंद वाटेल. २०१४ नंतर मनात नसले तरी अशी नामांकने मनाविरूद्ध घडली असतील. कलामांना किती मुस्लीम संघटनांनी गौरविले? त्यांना १९९८ मध्येच स्वा. सावरकर पुरस्कार दिला गेला. त्याच्या राष्ट्रीय संरक्षण क्षेत्रातील कामाचे कौतुक कोणाला? फक्त हिंदूंना!!एकंदर काय तर मुकादम साहेबांसारखे असगर अली इंजिनिअर यांचा वारसा सांगणारे गृहस्थ मुस्लीम मानसिकतेच्या चौकटीतून आणि आपला सांस्कृतिक वारसा अरब जगात शोधण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकले नाहीत. त्यांना भारतीय संत परंपरेशी तादात्म्य साधणारे मुस्लीम मराठी संत साहित्य आपलेसे वाटत नाही, तेथे जावेद कुरेशींसारख्या ‘एआयएमआयएम’च्या कार्यकर्त्याकडून आणि इतर तशीच मानसिकता ठेवणार्‍या मुस्लीम मराठी लेखकांकडून काय वेगळी अपेक्षा ठेवता येणार?

भारतात राष्ट्रपती ते उप-सैन्यप्रमुख अशी महत्त्वाची पदे मुस्लिमांनी भूषविल्यानंतरही ते सर्व येता-जाता अन्यायाचे रडगाणेच गात राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत त्यांच्या सैन्यातील मुस्लीम सैनिकांचा आकडा फुगवून सांगणार, जणू काही मुस्लीमच फक्त शिवाजी महाराजांसाठी लढत होते. यातून हिंदू मानस कळत-नकळत मुस्लिमांपासून दुरावते आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. इथेही त्यांची बस चुकते आहे. कुरेशींच्या फुगवलेल्या आकड्यांचे गणित मी एका लेखात मांडले होते. आधीच्या दिग्गज संशोधकांना जहलिया इतिहासकार ठरवून, हे नवा इतिहास(?) मांडणार, वर तोच खरा इतिहास असल्याचा कांगावा करणार. डॉ. श. नू. पठाण आणि कोकणातून आलेले, स्वत: आंबा विक्रेते आणि हिंदू ग्राहकांचे तोंड भरून कौतुक करणारे, तसेच अनेक पुस्तकांचे लेखक असलेले (आता नाव लक्षात नाही) असे एक दोन परखड मत व्यक्त करणारे, माझ्या दृष्टीने सन्माननीय अपवाद सोडता, येता जाता ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळणारे साहित्यिक, मुस्लीम नेते स्वत:च्याच मानसिकतेचे बळी - ‘व्हिक्टिम’ आहेत, हेच मुस्लीम मराठी साहित्य संमेलनात अथपासून ते इतिपर्यंत जाणवत राहिले.



-डॉ. प्रमोद पाठक


 


 
अग्रलेख
जरुर वाचा
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी!

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी!

लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यातर्फे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या चित्रपटाची महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने अधिकृत घोषणा करण्यात आली. “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे,” असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. हा केवळ ऐतिहासिक चरित्रपट न राहता, आधुनिक महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारांकडे परत नेण्याचा प्रयत्न असून, हा सिनेमा ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव करतानाच, आजच्या समाजातील निष्क्रियतेला जाबही विचारणार आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121