मुंबई : दक्षिण कोरियातील एका ६० वर्षांच्या व्यक्तीने हजारहून अधिक श्वानांची उपासमारीने हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण कोरियातील पोलीस या संदर्भातील अधिक तपास करत आहेत. भटक्या श्वानांना घरी घेऊन जाऊन त्यांना मरेपर्यंत उपाशी ठेवण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे. या संदर्भात प्राणी संरक्षक स्वयंसेवकाने प्रतिक्रीया दिली आहे. Dogs Killed In South Korea
"त्या माणसाला कुत्र्यांना खायला अन्न देण्यासाठी पैसेही दिले जात होते. विशेषतः यात प्रजननायोग्य असलेल्या श्वानांचा सामावेश होता. पाळण्यासाठी विक्री योग्य नसलेल्या सर्व श्वानांची देखभाल करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर होती. २०२० पासून त्याला प्रतिश्वानामागे १० हजार कोरियन डॉलर दिले जात होते. त्याने सर्व कुत्र्यांना एका बंद खोलीत ठेवून मरण्यासाठी सोडून दिले.", अशी माहिती स्थानिक केबल ऑपरेट्स न्यूज चॅनलला त्यांनी दिली आहे.
द.कोरियातील यांगप्येंयोंग प्रांतात एक जण हरवलेल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी निघाला होता. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या माहितीनुसार, जखमी कुत्र्यांचा एकावर एक खच रचण्यात आला होता. त्यांना मरण्याच्या अवस्थेत सोडून दिले. काहींना पिंजऱ्यात तर काहींना उपाशीपोटी गोणीत भरले होते. चार कुत्र्यांचा बचाव करण्यात स्थानिक प्रशासनाला यश मिळाले आहे. दक्षिण कोरियात प्राण्यांच्या संगोपनाचे कायदे कठोर आहेत. पाळीव प्राण्याला अन्न पाण्याविना ठेवल्यास तीन वर्षांची कैद होऊ शकते. तसेच ३० दशलक्ष वॉन पर्यंत दंडही होऊ शकतो.