‘माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी’ या ब्रीदवाक्यानुसार समाजसेवेसोबत शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे आणि ‘एनएसएस’च्या माध्यमातून विद्यार्थी घडवणार्या प्रा. भिमराव पेटकर यांचा जीवनप्रवास...
प्रा. भिमराव शामराव पेटकर यांचा जन्म शेगाव (बुद्रूक),चंद्रपूर येथे झाला. त्यांचे आईवडील शेतमजूर म्हणून काम करत असतं. प्रा. भिमराव यांचे प्राथमिक शिक्षण शेगाव (बुद्रूक) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी नेहरू विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयातून रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र या विषयातून केले. तसेच त्यांनी प्राणिशास्त्र विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून ’एमएससी’ ही पूर्ण केले. लहानपणापासून त्यांना ‘विज्ञान’ या विषयात आवड होती आणि पुढे हाच आवडता विषय त्यांच्या ‘करिअर’चा भाग बनला.प्रा. भिमराव पेटकर यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यामुळे संघर्ष हा त्यांच्या पाचवीला पूजलेला होता. शिवणकाम, शेतमजुरी, घर फेरणे अशी बरीच कामं त्यांनी शिक्षण सुरू असताना केली. दहावीला असताना प्रा. भिमराव पेटकर हिंदी या विषयात अनुत्तीर्ण झाले. त्यावेळी नाईलाजाने पेटकरांना तलावातील गाळ काढणे, कोळशाच्या खाणी, दगडाच्या खाणीत काम करावे लागले.
मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही. वेदनेवर फुंकर घालत बसण्यापेक्षा वेदनेची किनारच नष्ट करून त्यावर विकासाची बाग फुलवत राहावे, असे प्रा. भिमराव पेटकर म्हणतात आणि यामुळेच अथक परिश्रमानंतर प्रा. भिमराव पेटकर हिंदी या विषयात दोन ते अडीच वर्षार्ंच्या मेहनतीनंतर उत्तीर्ण झाले. मग पुढे नातेवाईकांनी त्यांना घरच्या परिस्थितीची जाणीव करून देत कला शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. परंतु, विज्ञान विषयाच्या आवडीमुळे त्यांनी कोणाचेही न ऐकता विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला. मग यांच काळात शासनाच्या ’कमवा आणि शिका’ योजनेत काम करत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवले. तसेच मध्यंतरी आपण शिक्षण सोडून व्यवसाय करावा, या उद्देशाने त्यांनी कर्ज घेऊन शिवणकामासाठी मशीनही विकत घेतल्या. परंतु, शिक्षणाची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे पुन्हा ते शिक्षणाकडे वळले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात ’एनएसएस’ , ’एनसीसी’मध्ये ही सहभाग घेतला होता. त्यामुळे याच कालावधीत स्वत:चा सर्वांगीण विकास साधत त्यांनी समाजसेवेला सुरूवात केली.
‘बीएड’साठीची प्रवेश परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. मात्र, प्रवेशासाठी लागणारे पाच हजार रूपये नसल्याने त्यांनी ‘बीएड’ला प्रवेश घेतला नाही. त्याऐवजी त्यांनी तलासरी येथे ’प्राथमिक अनौपचारिक शिक्षणा’साठी ‘साहाय्यक प्रकल्प अधिकारी’ म्हणून काम करायला सुरूवात केली. मात्र, शिक्षणक्षेत्रात काहीतरी करावे म्हणून नंतर त्यांनी ‘बीएड’चे शिक्षण पूर्ण केले. मग सुरुवातीला पंत समर्थ विद्यामंदिर,जोगेश्वरी येथे प्रा. भिमराव पेटकर विज्ञान विषय शिकवत. नंतर वर्तक महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविद्यालयात ‘जीवशास्त्र’ हा विषय शिकवायला त्यांनी सुरूवात केली. त्यानंतर आपण ही समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने पेटकर हे सामाजिक कार्यात ओढले गेल्याचे सांगतात. मग त्यांच्या सामाजिक कार्याला उभारी मिळण्यासाठी वर्तक महाविद्यालयाने त्यांना ’एनएसएस’ विभागाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आणि इथेच राष्ट्रसेवेची जागृती करत अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. तसेच त्या विद्यार्थ्यांपैकी एकाला महाराष्ट्र शासनाचा ’उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार’देखील पेटकरांच्या मार्गदर्शनाने प्राप्त झाला आहे. या सर्व कामाची दखल घेत पेटकरांना काही वर्षांनी ‘एनएसएस’चा पालघर जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. या काळात वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे आणि प्रा. भारती तोरणे यांचे ही सहकार्य लाभले.
आज प्रा. भिमराव पेटकर हे ‘बहुजन समता प्रबोधिनी’मध्ये खजिनदार या पदावर काम करतात. ही संस्था झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून त्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करते. तसेच गावखेड्यात विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका आणि संगणक प्रशिक्षणही संस्थेच्या माध्यमातून दिले जाते. व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, व्यक्तिमत्तव विकास शिबीर, दारूबंदी, हुंडाबळी, बालकामगार अशा अनेक विषयांवर जनजागृती ’बहुजन समता प्रबोधिनी’च्या माध्यमातून केली जाते. आज या संस्थेच्या कार्यामुळे झोपडपट्टीतील बरीच मुलेदेखील मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत.
प्रा. भिमराव पेटकर यांना सामाजिक कामासाठी ‘एकता कल्चरल अकादमी’चा पुरस्कार, एका वृत्तपत्रातर्फे ’आदर्श शिक्षक पुरस्कार’, ’महात्मा फुले शिक्षक पुरस्कार’, ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार-२०१३’, महाराष्ट्र शासनाकडून ‘रासेयो’चा विभागीय ’सर्वोकृष्ट कार्यक्रम अधिकारी’ हा पुरस्कारदेखील प्रा. भिमराव पेटकर यांना मिळाला आहे. भविष्यात विरार येथे ‘बहुजन समता प्रबोधिनी’द्वारे लोकसहकार्यातून ’समता कन्वेन्शन सेंटर’ उभारण्याचा पेटकरांचा मानस आहे. या संस्थेत पेटकरांना डॉ. दिनेश कांबळे (माजी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ) यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या ‘समता कन्वेन्शन सेंटर’मध्ये ई-ग्रंथालय, कलादालन, मेडिटेशन सेंटर, कॅफेटेरिया, हेल्थ सेंटर, लीगल एड सेंटर अशा अनेक सोईसुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र, हा प्रकल्प लोकसहकार्यातून उभा राहणार असल्याने लोकांनी ही या कामासाठी मदत करण्याचे आवाहन पेटकर करतात. या कार्यासाठी प्रा. भिमराव पेटकर यांना दै.’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
-सुप्रिम मस्कर