सण कोणताही असो. त्यातुन पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याचे भान प्रत्येकाने राखणे गरजेचे आहे. सततच्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक सण-उत्सवांची चर्चा होऊ लागली आहे. त्यातुनच बहुतांश ठिकाणी पर्यावरणपूरक होळी तसेच नैसर्गिक रंग वापरुन धुलीवंदन साजरे करण्यात येते, हे प्रमाण वाढविणे काळाची गरज आहे. पाहुया होलिकोत्सवाचे निसर्गरंग...
होळी हा हिंदूंचा सांस्कृतिक व धार्मिक सण आहे. आपल्यामधील दुर्गुण होळीत टाकून त्यांचे रूपांतर सद्गुणांमध्ये, चांगल्या गुणांमध्ये होऊन आपण चांगले वागू, असा संकल्प केला जातो. जे वाईट असेल ते होळीमध्ये जळून जाईल. चांगल्या विचारांचा, चांगल्या सुभाषितांचा शिमगा करा, अपशब्दांची, शिव्यांची होळी करा. हा सण पौराणिक काळापासून सुरू आहे. होळी सणाचा संदेश वाईट गोष्टींना जाळून चांगल्या गोष्टींचे संरक्षण करणे असा होतो. त्यामुळे या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
होळी पेटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडे आणि शेणाच्या गोवर्यांचा वापर केला जातो. रात्रभर या होळीमध्ये लाकडे आणि गोवर्या जाळल्या जातात. यावेळी अनेक चांगली हिरवीगार झाडे तोडली जातात, कापली जातात आणि वाळलेल्या ओल्या शेणाच्या गोवर्या होळीमध्ये जाळत असतात. काही तरुण लोकांकडून वर्गणीद्वारे तर काही मुले चोरी, जबरदस्ती करून ऐनकेनप्रकारे वखारीतून, इतर ठिकाणातून, घरांमधून लाकडे जमा करून त्यांची होळी करीत असतात.
हल्लीच्या होळीमुळे प्रदूषणात भर
हल्ली ज्या पध्दतीने होळीचा अतिरेक केला जातो. त्यामुळे वातावरणात हवा दूषित होते व हवेचे प्रदूषण होते तसेच पर्यावरणाचे संतुलन बिघडत असते. आर्थिक नुकसान होत असते. भारतात आज फक्त १२ ते १३ टक्के जमीन जंगलाखाली आहे. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने हे प्रमाण ३३ टक्के असायला हवे. कारण अवैध वृक्षतोड, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे वेळीच बोध घेऊन पर्यावरणाचे जतन करणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्यच आहे.
प्राचीन काळात व मध्ययुगीन काळात जंगले मोठ्या प्रमाणावर होती, झाडे मोठ्या प्रमाणावर होती. लोकसंख्याही कमीच होती. आता लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. ही वाढती लोकसंख्या पर्यावरणाची अतोनात हानी करीत आहे. अन्न शिजविण्यासाठी मानवाला लाकडे, गोवर्या, रॉकेल, गॅस इत्यादी इंधनाची गरज असते. गोरगरीब जनतेजवळ पैसा नसल्यामुळे त्यांना गॅस घेणे परवडत नाही. त्यामुळे भारतात वृक्षतोड, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळेच पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. वृक्षांना वाचविणे आवश्यक आहे. ‘झाडे लावा-झाडे जगवा!’ वृक्षांचे अनेक फायदे आहेत.
शिवरायांचे आज्ञापत्र
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञापत्रात वृक्षांचे महत्त्व सांगितले असून ‘रयतेनेही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली ती झाडे तोडिलियावरी त्याचे दु:खास पारावर काय?’ वृक्षांची काळजी घेण्याबाबतीत छत्रपती शिवाजी महाराज स्वत: किती दक्ष होते, हे त्यांच्या आज्ञापत्रावरून दिसून येते. संत तुकाराम महाराज यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे वृक्षांचे महत्त्व सांगताना म्हटले आहे. आपण राहतो तेथील सभोवतालचा परिसर म्हणजे आपले ‘पर्यावरण’ होय.
होळी असावी श्रध्देची
होळीच्या लाकडांवर नागरिक पाणी गरम करतात व या पाण्याने अंघोळ करतात, म्हणजे रोगराई होत नाही, अशी लोकांची अंधश्रध्दा पाहावयास मिळते. जर असे केले तर नजीकच्या भविष्यकाळात आपल्याला लाकडे आणि पाणीही मिळणे कठीण होईल. अमंगलाची होळी करावी, दुर्गुणांची होळी करावी. एका गावात एकच छोटी होळी करावी. त्यामध्ये केरकचर्याच्या होळ्या पेटवा. लाकडांच्या होळ्या पेटवू नका, होळी सणाला अंधश्रध्देचे रूप न देता काळानुसार सण साजरा करावा. प्रदूषणविरहित सण साजरे करावेत. पर्यावरण रक्षणासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरण्यासाठी आधुनिक पध्दतीने होळी साजरी करावी. जनतेचे प्रबोधन व्हावे, लोकशिक्षण व्हावे, जनजागृतीसाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे गरजेचे आहे.
वनसंपदेचे जतन करुया
भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण-उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. त्यामागे धार्मिक तसेच शास्त्रीय कारणेही सांगितली जातात. एकीकडे आपण सण-उत्सवांतील शास्त्र जपण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरीकडे त्याच शास्त्राचे एक अंग असलेल्या पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचे काम करत असतो. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे म्हणा किंवा जाणते अजाणतेपणाने आपल्या हातून कमी अधिक प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असते. त्यासाठी आपण पळवाटही काढतो, मी एकट्याने करुन काय होईल, किरकोळ हानीमुळे किती परिणाम होईल, असे म्हणत असतानाच थोडी-थोडी पर्यावरणाची हानी प्रत्येकाकडूनच होत असते. त्यामुळेच आजघडीला हजारो सजीव नामशेष झाले असून, तेवढेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जीवसृष्टीचा निवारा असलेली जंगले हळूहळू कमी होत आहेत. त्यासाठी विकासकामे जेवढी कारणीभूत आहेत, तेवढेच सण-उत्सव देखील. प्रत्येक सण-उत्सवात वनसंपदेचा वापर केला जातो. तो थांबणे अत्यंत गरजेचे आहे.
एका आकडेवारीनूसार भारतात जंगलाचे प्रमाण अवघे २४ टक्के आहे. ही शासकीय आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात हे प्रमाण १५ टक्केपेक्षाही कमी असावे. जगाच्या तुलनेत भारतातील जंगलांचा वाटा अवघा २ टक्केच आहे. ब्राझील, कांगो, पेरू आणि रशिया या देशांत सर्वाधिक जंगल आहे. जगातील प्राणवायूचा ठेवा अशी ओळख असलेल्या ब्राझीलमध्ये ५९ टक्के जंगल आहे. त्याखालोखाल पेरू ५६ टक्के, रशिया ५० टक्के इतके जगातील प्रमुख दहा देशांत ६६ टक्के जंगलाने व्यापले आहे. त्यात भारताचा वाटा अवघा २ टक्केच आहे. लोकसंख्येचा विचार केला तर हे प्रमाण अतिअत्यल्पच आहे. भारतात सर्वाधिक जंगलाचा भूप्रदेश मध्यप्रदेशात ११ टक्के आहे.त्या खालोखाल अरुणाचल प्रदेश ९ टक्के , छत्तीसगड ८ टक्के आणि महाराष्ट्र तसेच ओडिशा या राज्यांत अवघे ७ टक्के जंगल शिल्लक आहे. याचाच अर्थ पर्यावरणाची हानी आणि जंगलतोड अशीच सुरू राहिली तर पुढच्या दशकात महाराष्ट्रासह देशातील जंगले केवळ पुस्तकांत आणि छायाचित्रांतच शिल्लक राहतील.
पर्यावरणपूरक उत्सवांची गरज
हल्ली जंगलेच कमी झाल्याने वस्तीतील लहान-मोठे वृक्ष बिनदिक्कत तोडले जातात. आणि होलीकोत्सव साजरा केला जातो. जी मंडळी हे करतात, त्यांना याचे काहीएक सोयरसुतक नसते. होळी साजरी करताना ब़र्याचदा पर्यावरणाची हानी होते. चांगले, बळकट वृक्ष किंवा त्यांच्या फांद्या तोडून होळीनिमित्ताने त्या पेटविल्या जातात. परंतु याने पर्यावरणाचे नुकसान होत असून वृक्षसंपदेचे जतन न केल्यास आपलाही जीव धोक्यात येवू शकतो. म्हणूनच पर्यावरणपूरक होळी साजरी करणे आवश्यक आहे. केवळ होळीच नाहीतर वर्षभरात जेवढे उत्सव येतात ते पर्यावरणपूरक पध्दतीनेच साजरे करण्याचा निर्धार प्रत्येकाने करायला हवा. पूर्वीच्या तुलनेत आज वृक्षतोडीविरोधात पर्यावरणवादी भूमिका घेत आहेत. झाडे कापून लाकूड वापरण्यापेक्षा लाकडाचा कचरा, वाळलेली पाने असे पर्याय सूचविण्यात येत आहेत. शिवाय गायीच्या शेणापासून बनविलेल्या गोव़र्या म्हणजेच शेणी होळीमध्ये जाळून पर्यावरणपूरक होळी साजरी करता येते. याचे अनेक फायदे आहेत.
गायीच्या शेणाच्या गोवर्या जाळून जो धूर निर्माण होतो. त्यामुळे डास व आरोग्याला घातक विषाणू-जीवाणू नाहीसे होतात. शिल्लक राहिलेल्या राखेत नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि काही प्रमाणात उपयोगी धातू असतात. त्यामुळे शेतामध्ये नैसर्गिक सुक्ष्मपोषक खत म्हणून राखेचा वापर करता येवू शकतो. सल्फर ऑक्सिडेशन आणि फॉस्फेट सोल्यूबलायझेशन या प्रक्रिया ही राख जमिनीत घडवून आणते. कचरा निर्मूलन प्रक्रियेमध्ये शेणातील जंतूंमुळे पाण्यातील विरघळलेले धातू, कीटकनाशके व औषध निर्माण आणि पेट्रोकेमिकल प्रक्रियेमध्ये कचर्यातील घातक घटकांचे विघटन होते.
धुलीवंदनात नैसर्गिक रंगांचा वापर
होळीमध्ये कृत्रिम रंग वापरले जातात. हे आपल्या त्वचेसाठी हानिकारक असतात. त्या ऐवजी जर आपण राखेसोबत कोरडे नैसर्गिक रंग जसे मेहंदी, हळदी, बिटची पावडर, वाळलेल्या फुलांपासून बनवलेले रंग वापरले तर ते त्वचेचे संरक्षण करतील आणि ते सहजपणे साफही होतात. त्यामुळे पाणी कमी लागेल, शिवाय कोरडे रंग वापरल्याने पाणी बचतही केल्याचेही समाधान मिळेल. अशा पद्धतीने पर्यावरण संवर्धनाच्या कामामध्ये सर्वांचे योगदान देता येऊ शकते.
-मदन बडगुजर