नवी दिल्ली : अमृतपालने आत्मसमर्पण करू नये. त्याने रावी नदी पार करून पाकिस्तानात जावे, असे वक्तव्य लोकसभा खासदार आणि शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) प्रमुख सिमरजीत सिंग मान यांनी केले आहे.
अकाली दलाचे खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी पुन्हा एकदा फरार खलिस्तानी अमृतपालसिंगचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, अमृतपालसिगंच्या जीवास धोका असून सरकार त्याच्यावर अत्याचार करत आहे. त्यामुळे अमृतपालसिंगने आत्मसमर्पण कदापीही करू नये. त्याऐवजी त्याने रावी नदी पार करावी आणि पाकिस्तानात पळून जावे. यापूर्वीदेखील १९८४ साली ‘आमचे’ लोक पाकिस्तानात गेलेच होते. त्यामुळे अमृतपालसिंग पाकिस्तानात गेल्यास ते अतिशय न्याय्य ठरले, अशी मुक्ताफळे मान यांनी उधळली आहेत.
खलिस्तानी फुटीरतावादी नेता अमृतपाल सिंग अमृतसरमधील अकाल तख्त, भटिंडा येथील तख्त दमदमा साहिब किंवा आनंदपूर साहिबमधील तख्त केशगढ साहिब येथे आत्मसमर्पण करू शकतो, अशी शक्यता निर्माण झालेली असताना मान यांचे हे वक्तव्य आले आहे. पंजाब पोलिसांनी १८ मार्चपासून अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. तेव्हापासून अमृतपाल सिंग फरार आहे.