आजचा दिवस विशेष असल्याने मनाच्या श्लोकाचे विवरण तात्पुरते बाजूला ठेवून आजची तिथी लक्षून जन्मलेल्या दोन महान पुण्यपुरुषांचे स्मरण करणे उचित होईल. आज चैत्र शुद्ध नवमी. या तिथीला भगवंताच्या अवतार रूपाने जे दोन समर्थपुरूष प्रगट झाले, त्यांचा हा जन्मदिवस एक उत्तरेकडील शरयूनदीच्या तिरी वसलेल्या अयोद्धा नगरीत महापराक्रमी राजा दशरथाचा युवराज पुत्र राम म्हणून सुमारे सात सहस्र वर्षांपूर्वी जन्माला आले. याच तिथीला दुसर्या महापुरुषाचा जन्म महाराष्ट्रात गोदावरीनदीच्या काठी वसलेल्या मराठवाड्यातील जांब या छोट्याशाा गावी सुर्याजीपंत ठोसरांच्या घरात सुमारे 400 वर्षांपूर्वी झाला. ठोसरांच्या घरात जन्माला आलेल्या बालकाचे नाव नारायण असे होते. घरी सर्वजण त्याला लाडाने ‘नारोबा’ म्हणत. हे नारोबा पुढील आयुष्यात अथक प्रयत्नांतून स्वकर्तृत्वाने ‘समर्थ रामदास’ झाले. लोक त्यांना समर्थ या नावाने ओळखू लागले. तथापि समर्थ रामदासांच्या ‘समर्थ’ म्हणजे प्रभू रामचंद्र, रामदासस्वामी त्यांच्या वाड्.मयात रामरायाचा उल्लेख ‘समर्थ’ असा करतात.
श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र यांना हिंदू धर्माने परमेश्वराचा अवतार मानले आहे. दुष्टांचा विनाश आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी भगवंत मानवी रूपात अवतारकार्य पूर्ण करीत असतो, अशी आमची श्रद्धा आहे. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की, जेव्हा धर्माला अवकळा येते, लोक नीतिधर्माचे पालन करीत नाहीत, तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी मला अवतार घेणे भाग पडते. ’सज्जनांचे रक्षण दुष्टांचा विनाश आणि नीतिन्यायाच्या धर्माची स्थिरता’ हे माझे अवतार कार्य आहे. एकनाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणात रामजन्माचे प्रयोजन सांगताना एकनाथ रामाचा अवतार यासाठीच म्हणतात,
निजधर्माचे रक्षण। करावया साधुंचे पालन।
मारावया दुष्टजन। रघुनंदन अवतरला॥
रामचरित्राला रामायणातील पात्रांना प्राचीन आणि अर्वाचीन सर्व आचार्यांनी, गुरूंनी मोठ्या आनंदाने सानुकूल प्रतिसाद दिला आहे. स्वामी विवेकानंद लिहितात, राम म्हणजे पुरातन, आदरणीय व प्रिय वीरपुरुष आहे, तो सत्याचा आदर्श, नैतिकतेचा आदर्श तसेच आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श बंधू आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आदर्श राजा आहे. सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासात रामकथेला आणि रामाच्या आदर्शांना अपरंपार महत्त्व आहे.
भक्तिमार्गातील रामाचे महत्त्व सर्वजण जाणतात. आज रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सुवासिनी रामाला पाळण्यात घालून पाळणागीते गातात, फुले-गुलाल उधळतात, रामाच्या जयजयकाराने वातावरण भक्तिमय आनंदमय होऊन जाते. रामायणात रामाच्या कार्यकर्तृत्वाचा व बहुविध गुणांचा उल्लेख येतो. त्यापैकी ‘एकवचनी’, ‘एकपत्नी’, ‘एकवाणी’ असे थोडक्यात रामाचे गुणविशेष सांगितले जातात. ‘एकवचनी’ याचा अर्थ गुंतागुंतीच्या समस्येवर पूर्ण विचारांनी घेतलेला निर्णय, जो नंतर बदलावा लागत नाही. रामाच्या युवराज्याभिषेकाच्या वेळी कैकयीला पूर्वी केव्हातरी दशरथाने कबूल केलेले वर तिने मागून घेतले आणि रामाला 14 वर्षे वनवासात जाण्यास सांगितले. वस्तुतः दशरथाने होकार दिला नव्हता आणि दिङ्मूढ झाल्याने दशरथाने रामाला वनवासात जाण्यास सांगितले नव्हते. त्यात रामाचा संबंध नसल्याने ते तो नाकारू शकत होता, पण त्याने तसे केले नाही. वडिलांनी दिलेल्या वराचा, वचनाचा आदर राखून रामांनी 14 वर्षे वनवासात जाण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला व तो लगेच अंमलात आणला. त्यासाठी जे सामर्थ्य लागते ते रामाजवळ होते म्हणून तो ’समर्थ.’
आपल्या बाहुबलाचे सामर्थ्य एका बाणाने सात वृक्ष पाडून, रामाने सुग्रीवाला दाखवून दिले होते. रामाचा बाण कधीही फुकट जात नसे. आपल्या किशोरवयात रामाने विश्वामित्रांच्या आज्ञेवरून अनेक राक्षसांना कंठस्नान घालून ऋषिमुनींच्या यज्ञकार्यास निविर्घ्न केले होते. अफाट सामथ्यर्र् अंगी असल्याने तो ’समर्थ.’ ’एकपत्नी’ म्हणजे पत्नीवर अलोटप्रेम. रावणाने सीतेला कपटाने पळवले. त्यामुळे रामाचा त्वेेष, संताप अनावर होऊन जवळ कसलीही युद्धसामग्री, सैन्य नसताना वानरसैन्य तयार करून रामाने रावणाचा नायनाट केला. रामाने सज्जनांना अकारण त्रास देणार्या, देवांना बंदिवासात घालणार्या, सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण करणार्या, रंभा, वेदवती, सीता यांचा मानभंग करणार्या चौदा चौकड्यांच्या लंकाधीश रावणाचा त्याच्या राज्यात जाऊन समर्थपणे शिरच्छेद केला. सर्वांना भयमुक्त केले. शि. म. परांजपे यांनी म्हटले आहे की, “रामाचा जो जयघोष चालला आहे, तो रामाने बापाची आज्ञा पाळली, तो एकपत्नीव्रतधारी होता म्हणून नव्हे, तर त्याने रावणासारख्या दुष्ट जुलमी बलाढ्य राजाला मारले म्हणून...” वाल्मिकींनी परमार्थ भक्तियुक्त रामापेक्षा क्षात्रतेजाचा राम रंगवला आहे. रावणाचे अंत्यसंस्कार झाल्यावर रामाने सीतेला सांगितले, “शत्रूवर वार करून माझ्या संतापाचा शेवट झाला. माझा अपमान आणि माझा शब्द यांना मी मारून टाकले. माझी प्रतिज्ञा शेवटास गेली. मी दुष्ट पापी रावणाचा सूड घेतला. माझे पौरुष लोकांना दिसले. मी समर्थ झालो.” येथे रामांनीच स्वतःचा उल्लेख ’समर्थ’ म्हणून केला आहे. तो यथार्थ आहे.
रामदासांविषयी विचार करताना, लोक स्वामींना ’समर्थ’ का म्हणत, याचाही शोध घेतला पाहिजे. श्रीरामदास स्वामी यांना लोक ’समर्थ’ का म्हणत, याविषयी अनेकांचे अनेक तर्क आहेत. कोणी म्हणतात, रामदासी संप्रदायात रामदासस्वामी सर्वात वडील होते, म्हणून त्यांना ‘समर्थ’ म्हणत. स्वामी भिक्षेला निघाले की, ’जय रघुवीर समर्थ’ असा रघुवीरांचा जयजयकार करीत म्हणून लोक त्यांना ‘समर्थ’ म्हणून ओळखू लागले. नाशिकला 12 वर्षांचे तपाचरण केल्यावर रामाच्या आज्ञेने रामदास स्वामींनी 12 वर्षे तीर्थाटनाच्या निमित्ताने पायी भ्रमंती करून देव, देश यांचे दर्शन घेत लोकोपचारांचे सूक्ष्म अवलोकन केले. तीर्थाटन काळात त्यांनी अनेक ठिकाणी मठांची स्थापन केली, महंत मिळवले. स्वामींची भाषा मधुर, वृत्ती निरपेक्ष, वागणूक प्रेमादराची, त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. स्वामींनी 1100 मठ स्थापन केल्याचा उल्लेख आहे. जवळ काहीही नसलेल्या या बैराग्याने केवळ भिक्षेच्या जोरावर महंतांचा योगक्षेम चालवता, त्यांना संस्कृतिरक्षण कार्यासाठी प्रवृत्त केले. चाफळला राहून हे मठ-महंत समर्थपणे सांभाळले म्हणून ते ‘समर्थ.’ असे अनेकांचे अनेक तर्क आहेत. रामदास स्वामींना लोकांनी ’समर्थ’ पदवी दिली आहे. तथापि या संदर्भात शंकरराव देव यांनी केलेले विवेचन मार्मिक आहे. ते म्हणतात, हे तर्कवितर्क करण्यापेक्षा ‘समर्थ’ पदवी कोणाला मिळते, हे समर्थांनीच स्वतः दासबोधात सांगितले आहे-
बहुत जनांस चालवी। नाना मंडळे हालवी।
ऐसी हे समर्थपदवी।
विवेके होते॥ (18.10.46)
जो समाजाच्या सुखदुःखाची सूत्रे आपल्या हाती घेतो व सार्या समाजाला चालवतो, समाजाला कार्यप्रवृत्त करतो, त्यांना सन्मार्गाला आणून सोडतो, तो ‘समर्थ.’
समर्थ म्हणतात,
ब्राह्मणमंडळ्या मेेळवाव्या। भक्तमंडळ्या मानाव्या।
संतमंडळ्या शोधाव्या। भूमंडळी॥ (19.6.14)
या उपदेशाप्रमाणे आपण स्वतः कृती केली म्हणून, लोक रामदासास ’समर्थ’ म्हणत, असे अनुमान काढणे अपरिहार्य आहे, असे शंकरराव देव यांनी म्हटले आहे. देवांचे विवेचन उचित आहे. समर्थ नुसता उपदेश करीत फिरत नसत, तर स्वतः कृती करून चळवळी कार्यान्वित करीत.
चैत्र शुद्ध नवमीला जन्मलेल्या या दोन्ही ‘समर्थां’नी अफाट कार्य करून या राष्ट्राला संकटांपासून वाचवले, त्यांनीच हिंदूसंस्कृतिरक्षण करून आम्हाला उपकृत केले आहे. दोन्ही ‘समर्थां’ना साष्टांगभावे नमन...