नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया हिंसाचार प्रकरणात शरजील इमाम, सफूरा जरगर, आसिफ इक्बाल तन्हा आणि इतर आठ जणांना दोषमुक्त करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
दिल्लीमध्ये २०१९ साली सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आंदोलन करण्याच्या नावाखाली जामिया मिलिया इस्लामिया येथे शरजील इमाम, सफूरा जरगर, आसिफ इक्बाल तन्हा आणि त्यांच्या साथीदारांनी हिंसाचार घडविण्याचा कट रचला होता. त्याविरोधात दिल्लीतील सत्र न्यायालयात दाखल खटल्यात त्यांना दोषमुक्त करण्यात आले होते. मात्र, त्यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांनी या तिघांसह त्यांच्या साथीदारांना दोषमुक्त करण्यात आल्याच्या निर्णयास रद्द ठरविले आहे. यावेळी न्यायालयाने म्हटले की, प्रथमदर्शनी व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपी विद्यार्थी कार्यकर्ते जमावाचे नेतृत्व करत होते. ते दिल्ली पोलिस मुर्दाबादच्या घोषणा देत होते आणि बॅरिकेड्स हिंसकपणे ढकलत होते. शांततेने एकत्र येण्याचा अधिकार वाजवी निर्बंधांच्या अधीन आहे. त्यामुळे हिंसक क्रिया आणि हिंसक भाषणांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द केल्यानंतर शरजील इमाम, सफूरा जरगर, आसिफ इक्बाल तन्हा आणि त्यांच्या साथीदारांवर उच्च न्यायालयाने दंगल, बेकायदेशीर जमाव जमविण्यासह अन्य गुन्ह्यांखाली आरोपनिश्चिती केली आहे.