वाचन, मनन, लेखन आणि रेखांकनासह रंगलेपन या बाबतीतील चित्रकार सुभाष गोंधळे यांची प्रगती, रहस्यमय, अद्भुत आणि मंत्रमुग्ध करणार्या सखोल आशयगर्भ कलाकृती करणार्या एका दृश्यकलाकाराची ओळख देणारी ठरली. त्यांनी त्यांच्या नावामध्ये संक्षिप्त टोपणनाव शोधले आहे. ‘सुगो’ या नावानेही त्यांची आपलेपणा निर्माण करणारी ओळख आहे. याच नामाभिधानाने त्यांच्या चित्रमालिका प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रशृंखलेत अनोख्या संकल्पनांसह कला आणि वैज्ञानिक स्वभाव व्यक्त होताना दिसतो.
दि. 26 फेब्रुवारीला फेसबुकवर रेखांकनकार आणि अक्षरसुलेखनकार सुभाष गोंधळे उपाख्य ’सुगो’ यांच्या एका पोस्टमधील माहिती वाचायला मिळाली. त्या माहितीनुसार गोंधळे हे विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते. परंतु, काहीतरी गोंधळ असावा. विज्ञान शाखेचा हा विद्यार्थी अनेक कॅलेंडर आणि सिनेपोस्टर हुबेहूब रंगवित असे. त्यांनी बी.एससीला प्रवेश घेतला खरा. परंतु, मन रमत होते वर्गातील मुलामुलींच्या ‘प्रॅक्टिकल’ वह्यांमधील आकृत्या काढण्यांमध्ये. चित्रांकनाचा सराव त्यानिमित्ताने होत होता.
हाच सराव वर्गातील मुलामुलींची त्याच्या वहीमधील स्केचेस् काढून देण्यापासून, तर फावल्या वेळातील वर्गातील फळ्यावरील शिक्षकांच्या कार्टून रेखाटण्यापर्यंत पुढारलेला होता. त्यांच्याच या पोस्टमध्ये वाघाचे म्हणजे पट्टेरी वाघाचे एक त्यांनी चित्तारलेले, एक हसणारे चित्र पाहायला मिळाले, हे चित्र मला फार ‘युनिक’ भासले. डरकाळी फोडणारा वाघ, जीभ बाहेर काढलेला वाघ किंवा तोंड मिटविलेला वाघ, चित्रांच्या फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळतात. परंतु, अक्षरश: खळाळून हसणारा वाघ, पाहायला मिळाला तो चित्रकार गोंधळेंच्या चित्रांकनाद्वारे!
वास्तववादी शैलीत काम करण्याची हातोटी, रंग-पेन्सिली, चारकोल-पावडर अशा विविध रंगमाध्यमांसह जलरंग, तैलरंग, अॅक्रेलिक रंग अशा रंगमाध्यमांवरील दादागिरी त्यांनी परिश्रमाने मिळविली आहे. विज्ञान शाखा सोडून 1980ला त्यांनी मुंबईतील जगप्रसिद्ध अशा ‘सर जे. जे. कला महाविद्यालया’त प्रवेश घेतला. तिसर्या वर्षी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. काम करणार्या व्यक्तींची नेहमी गरज असते. त्या काळात गोंधळे यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘मुंबई दूरदर्शन’ या दृक्-श्राव्य माध्यमांमध्ये कथा-चित्रकार म्हणून काम केले.
खास कलेच्या अभ्यासासाठी त्यांनी युरोपचा दौरा केला. तिकडे साकारलेली अनेक रेखाचित्रे नंतर भारतात आल्यावर त्यांच्यावर लेखासोबत उपयोगात आली. त्यांचा हा प्रयोगशील कलाप्रवास त्यांना अमेरिका, युरोप, दुबईसह अनेक मान्यवरांच्या संग्रही कलाकृतींच्या माध्यमाने पोहोचलेला आहे.
वाचन, मनन, लेखन आणि रेखांकनासह रंगलेपन या बाबतीतील त्यांची प्रगती, रहस्यमय, अद्भुत आणि मंत्रमुग्ध करणार्या सखोल आशयगर्भ कलाकृती करणार्या एका दृश्यकलाकाराची ओळख देणारी ठरली. त्यांनी त्यांच्या नावामध्ये संक्षिप्त टोपणनाव शोधले आहे. ‘सुगो’ या नावानेही त्यांची आपलेपणा निर्माण करणारी ओळख आहे. याच नामाभिधानाने त्यांच्या चित्रमालिका प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रशृंखलेत अनोख्या संकल्पनांसह कला आणि वैज्ञानिक स्वभाव व्यक्त होताना दिसतो. निसर्गचित्रणे आणि वास्तवावर आधारित चित्रांव्यतिरिक्त त्यांनी तात्त्विक, भौतिक आणि आध्यात्मिक विषयांना स्पर्श केलेला आहे. त्यांच्या अलीकडील काही दृश्यकलाकृतींमध्ये मंत्र किंवा आकृतिबंध आहेत.
मंत्र, आकारबद्ध आणि रंगबद्ध केलेला तर मनावर अद्भुत परिणाम होतात. रंगाकार मानवी मनावर अपेक्षित परिणाम करतात. जर तो कलाकार आध्यात्मिक मार्गातील असेल, तर निर्माण होणारी कलाकृतीदेखील दैवी समाधान देते. रंगयोजना आणि अक्षरमंत्र योजना स्वत:ला वाईट हेतूंपासून दूर ठेवतात. हा ‘सुगों’चा अनुभव आहे. अशा प्रकारांच्या कलाकृती पाहताना आत्मा शुद्ध होतो. शरीर निरोगी होते. या संकल्पनेतून त्यांनी ‘अक्षरा’ ही एक अक्षर सुलेखनाची मालिका साकारली. या मालिकेत त्यांनी ‘ओम्’ ‘स्वस्तिक’, आणि ‘रिम-रहम’ सारख्या आकृतिबंधांचा शरीरावर तसेच आत्म्यावर खोल प्रभाव करता पडू शकतो, हे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंधांचा शरीरावर आणि आतम्यावर खोल प्रभाव पडतो. त्यांनी ध्वनी प्रतिबिंबित आकार-रंगबद्ध केले आहेत. श्रवणीय ध्यानात्मक आभा, गूढवाद आणि अतितीव्र करणारे रंग उपयोगात आणून मनाला शांत करणार्या संकल्पनांची निर्मिती केली आहे. ही बाब फारच अद्भुत आहे. संपूर्ण ब्रह्मांड हे सजीव आणि निर्जीव वस्तूंनी बनलेले आहे. या दोनही घटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अवकाश गती आणि वेळ या तिघांना ‘ट्रिनिटी’ म्हटलं जातं. या ‘ट्रिनिटी’चा विचार चित्रकार ‘सुगों’नी त्यांच्या कलाकृती साकारताना केलेला दिसतो.
त्यांच्या सुलेखन कलाधिष्ठित कलाकृतीबाबत बोलताना ते म्हणतात, “ ’ॐ नमः शिवाय’ हा मंत्र आपल्याला थेट मंदिराच्या गाभार्यात घेऊन जातो.” मंत्रोच्चारानंतर निर्माण होणारी स्पंदनं आणि आवर्तनं ही चित्रांच्या माध्यमातून ‘कॅनव्हास’वर प्रकट करणं, हे ‘सुगों’च्या शैलीचं खास वैशिष्ट्यं म्हणता येईल. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ या मंत्राने भावही ‘कॅनव्हास’वर तेवढ्याच ताकदीने साकार झाले आहेत. ‘हे अक्षरांनो मंत्र व्हा’ असं तर म्हटलं आणि खरोखरच ती अक्षरं मंत्र झाली आणि आपल्याशी बोलू लागली, तर अक्षरं शब्द स्वतःच्या अर्थ भावासहित आपल्याला सामोरी आली, तर काय बहार येईल. ‘सुगो’ अर्थात सुभाष गोंधळे हे सुलेखनकार ’ज्ञातव्य’ (समजण्यास सोपे) या आपल्या प्रदर्शनाद्वारे आपल्याला ही संधी उपलब्ध करून देतात.
त्यांच्या कलाकृती जेव्हा कलारसिकांशी बोलतात, तेव्हा त्या दृश्यकलाकाराचं महत्त्व कळतं. चित्रकार, लेखक, रेखांकनकार, अक्षरसुलेखनकार ‘सुगो’ अर्थात सुभाष गोंधळे यांच्या कलाप्रवासास अनेक शुभेच्छा....!
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ