सृजनशील दादा

    25-Mar-2023
Total Views | 108

Creative Dada Wadekar


शेतकर्‍याच्या वेदना प्रत्यक्ष जाणून त्यादृष्टीने तयार करण्यात आलेल्या अवजारांचा प्रत्यक्ष वापर करणे, शेतकर्‍याकडून त्याची चाचपणी करून घेणे, निरीक्षण, सुलभता, सोपेपणा, प्रदीर्घ कामानंतर येणारा थकवा, अवजारासंदर्भात भविष्यात येणारी दुरूस्ती याची परीक्षणे आल्यानंतर त्या अवजाराच्या डिझाईनमध्ये बदल करणे... त्यासाठी संशोधक, सृजनात्मक तसेच संवेदनशील वृत्तीचे दर्शन मला जयवंत हरिश्चंद्र तथा दादा वाडेकर यांच्यात दिसले. नव्हे, तर ते जवळून अनुभवण्याचे भाग्य मला मिळाले.


शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, तो स्वयंभू झाला पाहिजे, त्याच्यातही संशोधक वृत्ती जागृत झाली पाहिजे, असा दादांचा आग्रह असायचा. शेतीत होणारे बदल त्यास अनुसरून शेतकर्‍यांना कमीतकमी परिश्रमामध्ये आणि अत्यंत सोप्या पद्धतीने शेतीची मशागत करता यावी, यासाठी त्यांनी अवजारे निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यांचा तसा माझा परिचय २००० पासूनचा. तेव्हा ते पालघर जिल्ह्याचे संघचालक होते. जसा त्यांचा सहवास वाढत गेला, तसा त्यांच्या कामाचा आवाका, विस्तार समजत गेला. त्यांनी निर्माण केलेल्या काही छोट्या अवजारांचा प्रत्यक्ष उपयोग त्यातील सुलभता आणि अनुभव सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न...


१. वैभव विळा : हे नाव खरे तर कोकण कृषी विद्यापीठाने दिलेले विळ्याचे नाव. भात कापणीसाठी लागणारा हा विळा. प्रत्यक्ष बाजारात येणारा विळा हा अत्यंत जड होता. साधारणत: एका हंगामातच तो खराब व्हायचा. त्याची धार बोथट व्हायची. दादांनी त्यात काही मोजके बदल केले. विळा वजनाचे हलका केला. पोलादी पातळ पट्टी वापरल्याने त्याची धारही प्रदीर्घ काळ टिकू लागली. कापणी सुलभ होऊ लागली. तो विळा एक वर्षांवरून तीन वर्षांपर्यंत टिकू लागला. सामान्य शेतकर्‍याला परवडणारे असे हे अवजार त्यांनी निर्माण केले.

२. फावडी : दोन प्रकारच्या फावड्यांचे संशोधन दादांनी केले. एक तर माती ओढता ओढता फावड्याच्या दुसर्‍या बाजूला असलेला छोटा टिकवासारखा भाग, ज्याने छोटे काम सुलभ होत होते. दुसरे एक फावडे शेण काढण्यासाठी खालच्या बाजूने सरळ असणारे फावडे बनवले होते, ज्यामुळे शेणगोठा करणे सोपे झाले. तसेच त्यांचा दांडाही मोठा ठेवला होता, त्यामुळे गोठ्यात जास्तवेळ काम करणे शक्य झाले.

३. लोखंडी बैलगाडी : दादांच्या निर्मितीमधील अविष्कार म्हणजे बैलगाडी. ही बैलगाडी तयार करताना शेतकर्‍याला वारंवार त्यांच्या देखभालीचा खर्च होणार नाही, याचा प्रामुख्याने विचार करतानाच बैलगाडी ओढणार्‍या बैलांचाही विचार केला. यातून त्यांची पशुप्राण्यांबद्दलची संवेदनशीलता अधोरेखित होते. आजही पूर्ण पालघर जिल्ह्यात त्यांनी निर्माण केलेल्या बैलगाड्या शेतकरी अगदी आनंदाने वापरत आहेत.

दादांचे हे अवजारप्रेम जसे होते, तसेच ते शेती करणार्‍या कष्टकर्‍यावरही होते. त्यांना प्रोत्साहनही त्यांनी दिले. उत्तम सेंद्रिय शेती आणि उत्तम देशी गायींचे संगोपन या दोन विषयांपासून त्यांनी याची सुरुवात केली. गेल्या वर्षांपासून आपले मातृऋण, पितृऋण फेडावे, यासाठी ’हरितारा’ या नावाने वाडा आणि विक्रमगड तालुक्यात या विषयांतील प्रत्येकी पाच जणांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम वाडा येथे त्यांचा मुलगा बिपीन यांच्या कारखान्यात पार पडला. संबंध वाडेकर कुटुंब यामध्ये सहभागी झाले होते.

आहार, विहार आणि प्रत्यक्ष व्यवहार याचा मेळ असणारे दादा... मी बघितलेले शेवटची दहा वर्षे तरी फलाहार हाच मनुष्यांचा मुख्य आहार आहे, याचा पाठपुरावा करणारे दादा... आयुष्यभर श्रमआधारित जीवनशैली आणि कर्मआधारीत नित्यनेमाने गीतेचे आचरण करणारे दादा... विनोबा भावे यांची पाठ असणारी गीता, येणार्‍या प्रत्येकाला आवर्जून ‘गिताई’ भेट देणारे दादा... राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामविकासाची संकल्पना राबविणारे दादा... प्रत्यक्ष माझ्यावर आपल्या मुलांपेक्षाही जास्त निरपेक्ष प्रेम करणारे दादा... परमेश्वराने या कर्मयोग्याला नक्कीच सद्गती दिली असणार, याबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नाही.



 
-किरण लेले
(शेतकरी (नैसर्गिक शेती)आणि देशी गायी संगोपक, लेले पाडा, बोरांडा, ता. विक्रमगड, कोकण प्रांत सहसंयोजक - अक्षय कृषी परिवार, राज्यपाल नियुक्त सदस्य- मुंबई विद्यापीठ)



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121