खानिवडे ; पालघर जिल्ह्यात यंदा मार्च महिन्यात अवकाळी पाऊसाची अवकळा सुरूच असून 21 मार्च रोजी सकाळी धुमदार पडलेल्या पावसामुळे रब्बी शेती, फळ बागायत, वीट भट्ट्यां, मिठागरे, जनावरांचा सुका चाराआणि वाळायला टाकलेल्या सुक्या मच्छीला फटका बसला आहे. वरील व्यवसाय हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असल्याने या अर्थव्यवस्थेला याची झळ बसणार आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे यंदा मार्च च्या 5 तारखेपासून पावसाचा शिडकावा सुरू झाला होता .ऐन होळी उत्सवात शिडकावा हलक्या सरींमध्ये बदलला .त्यांनतर आतापर्यंत दिवसाआड रोज पावसाची हजेरी सुरूच असून 21 मार्चच्या पहाटे जोरदार वृष्टी करून पावसाने जागोजागी पाण्याचे लोट काढले .त्यामुळे काढणीला सुरुवात झालेल्या रब्बी पिकांवर परिणाम होणार असून काढून सुकविण्यासाठी ठेवलेला हरभरा , तूर, वाल , उडीद, मूग , तीळ , राई आदी कठवळ पिके भिजून गेली आहेत .तर बागायती पिकांमध्ये आताच धरलेली फळे गळू लागली आहेत .वीट भट्ट्यांचे भिजून नुकसान झाले आहे यात गरीब मजूर वर्गाला त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.
तर मिठागरांमध्ये काढून साठवलेले मीठ ओलावा धरून नुकसानीत जाऊ शकते .याच बरोबर वाफ्यांमध्ये पिकणारे मीठ पावसाने विरघळून जाऊन नुकसान होते .तर दरसाल डिसेंबर ते मार्च या महिन्यात बोंबिल , मांदेली , सुकट , जवळा , वाकटी , खारा , बांगडा आदी सुकवून खारवलेली मच्छी जी वाळत टाकण्यात येते तिच्यावर पावसाचे पाणी पडल्याने ती खराब होऊन नुकसान होते .तर जनावरांचा सुका चारा जो खरिपातील भात झोडणीनंतर पावाली म्हणून ओळखला जातो तो आणि माळरानातील गवताच्या तयार केलेल्या उघड्या गंज्यांना या पावसाचा फटका बसला आहे .
पुढे अजून काही दिवस हवामान असेच राहिले तर शेतीसह वरील इतर उद्योग मोठ्याप्रमाणावर नुकसानीत जाणार असून तसे होऊ नये म्हणून योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन ऋषि विभागाकडून करण्यात आले आहे .तर या आधीच्या नुकसानीचे पंचनामे संपामुळे होऊ शकले नाहीत त्यामुळे शासनाने अवकाळी नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .