‘विकास’ लोकवाद्यांचा!

    22-Mar-2023   
Total Views |
Vikas Kokate


‘नम्र जाला भूतां। तेणें कोंडिलें अनंता’ या तुकारामांच्या अभंगातील ओळीप्रमाणे मातीशी स्वत:ची नाळ घट्ट जोडून असणार्‍या विकास कोकाटे यांच्या वादनकलेचा प्रवास...
 
विकास कोकाटे यांचा जन्म रामनगर, घाटकोपरमध्ये झाला. त्यांचे मूळ गाव फदालेवाडी, पुणे. विकास यांचे प्राथमिक शिक्षण पंतनगर, घाटकोपर येथील नगरपालिकेच्या शाळेत आणि फदालेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी शिनोली येथील ’रयत शिक्षण संस्थे’च्या भीमाशंकर विद्यामंदिर येथून पूर्ण केले. विकास यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत सुरुवातीला वास्तव्यास होते. मात्र, एकदा विकास यांच्या वडिलांचा कामावर अपघात झाला. त्यात वडिलांच्या पायाला जबर दुखापत झाली. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक भार वाढला आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याने विकास कुटुंबासह मुंबईतील घर विकून गावी गेले. मग विकास यांनी ‘आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, घोडेगाव’ येथून ‘बीए राज्यशास्त्र’ विषयात पदवी संपादन केली. त्यावेळी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने विकास हे शेतीच्या कामात आपल्या आईला मदत करू लागले.
 
विकास यांच्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा असल्याने वादनकलेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. लहानपणी महाशिवरात्रीच्या जत्रेत मिळणारा छोटा ढोल विकास वाजवत. पुढे गावाकडे आल्यावर अखंड हरिनाम सप्ताहात विकास पखवाज वादन करत. यातूनच वादनाची आणि लोकसाहित्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली. असं म्हणतात की, लोककला ही एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित होत जाते. तसेच वडील मारूती कोकाटे आणि आजोबा महादू कोकाटे यांच्याकडून वादनाचा वारसा विकास यांना मिळाला. परंतु, वादनकलेला शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमाची जोड मिळावी, यासाठी विकास यांनी मुंबई विद्यापीठाच्या ’लोककला अकादमी’तून २००७-०८ यावर्षी लोककलेतील पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. यावेळी विजय चव्हाण, कृष्णा मुसळे आणि शंकर घोटकर यांच्याकडून लोकवाद्यांचे धडे विकास यांनी घेतले. तसेच प्रा. प्रकाश खांडगे, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्याकडून लोककला आणि लोकसाहित्य अभ्यासक्षेत्राचे मार्गदर्शन ही विकास यांनी मिळवले. त्यानंतर विकास यांनी ’लोकसाहित्य’ या विषयातून मुंबई विद्यापीठातून ’एम.ए’ पूर्ण केले.
 
आज संबळ, ढोलकी, पखवाज, दिमडी, हलगी, डफ ही लोकसंगीतातील वाद्याचे वादन विकास कोकाटे करतात. पदवीच्या द्वितीय वर्षाला असताना विकास मुंबईत आले आणि त्यांनी ’फायनान्स कंपनी’ मध्ये ‘ऑफिसबॉय’ म्हणून काम करायला सुरुवात केली. परंतु, काही वर्षांनी लोककलेचा अभ्यासक्रम विकास यांनी पूर्ण केल्यावर विकास यांना इतर कुठे काम करण्याची गरज भासली नाही. कारण, लोककलेच्या अनेक कार्यक्रमांतून उदरनिर्वाहाएवढा पैसा विकास यांना मिळू लागला होता. विकास यांची लोककलेच्या अभ्यासाची चिकाटी पाहून विकास यांना मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीअंतर्गत ’शाहीर अमरशेख अध्यासना’त संशोधक समन्वयक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

विकास कोकाटे यांची भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे बिकानेर येथे महाराष्ट्रातील लोकवाद्यांच्या वादनासाठी निवड झाली होती. तसेच ‘अमृत कला महोत्सव २०२३’, ’संगीत नाटक अकादमी’चा ’राधारंग’ , ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’, अशा कित्येक महोत्सवात विकास कोकाटेंनी वादक म्हणून काम केलेले आहे. ‘उडान महोत्सवा’त परीक्षक, पंचरंगी पठ्ठे बापूराव कार्यक्रमात कलावंत समन्वयक, ’नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अपॉर्च्युनिटीज् फॉर द हँडिकॅप्ड इंडिया’ साठी तालवाद्य प्रशिक्षक, तमाशा प्रशिक्षण शिबिरात शिबीर साहाय्यक अशा जबाबदार्‍या ही विकास कोकाटे यांनी निभावल्या आहेत.

झी मराठी वाहिनीवरील ’मराठी पाऊल पडते पुढे पर्व -१’, स्टार प्रवाह वाहिनीवरील ’राजा शिवछत्रपती’ मालिका, ‘धिना धिन धा’, ‘जय महाराष्ट्र’, ’लोकरंग’, ‘चला हवा येऊ द्या’ अशा टीव्ही मालिका आणि वाहिन्यांसाठी वादक म्हणून विकास यांनी काम केले आहे. त्याचबरोबर ’सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अ‍ॅण्ड ट्रेनिंग’ कडून लोकसंगीतातील संशोधनासाठी २०१८-१९ मध्ये ‘ज्युनिअर फेलोशिप’ प्राप्त करून विकास यांनी ’महाराष्ट्र के प्रायोगिक लोककलाओं के लोकवाद्य : महत्त्व एवं स्थान’ या विषयावर संशोधनही केले आहे.

विकास कोकाटे यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीकडून ’उस्ताद बिस्मिल्ला खान युवा प्रतिभा पुरस्कार २०१९’, शिवशंभू सामाजिक संस्थेकडून ’शिवशंभूरत्न पुरस्कार २०१६’ , महादेव कोळी समाज संघटनेकडून लोकसंगीतातील कामासाठी सन्मानचिन्ह, संस्कृती महोत्सवात लोकवाद्य वादनासाठी सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. विकास नेहमी म्हणतात की, “वादन कला ही लोकसंगीताला नवसंजीवनी देत असते. त्यामुळे वादन कलेत येऊ इच्छिणार्‍यांनी जिद्दीने, चिकाटीने वादन क्षेत्रात काम करावे. तसेच कलाकारांनी अहंकारावर मात करायला शिकायला हवे.आणि नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता या तुकारामांच्या अभंगातील ओळीप्रमाणे कलाक्षेत्रात काम करायला हवे.”


 
-सुप्रिम मस्कर



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.