जो अंत:करणपूर्वक रामनामाचा अभ्यास करतो, रामनाम नेमाने घेतो, त्याला काम बाधा आणू शकत नाही, असे स्वामींचे सांगणे आहे. रामनामात वृत्ती विराम पावल्याने वासनेचा जोर कमी होऊ लागतो. वासना क्षीण होऊन जातात. सर्व संतांनी परमार्थसाधनेसाठी कामवासनेला टाळायला सांगितले आहे. कामाची त्यांनी निंदा केली आहे.
भगवंताचे नाम मनापासून घेणार्याला खरी विश्रांती अनुभवता येते, असे स्वामींनी मागील श्लोक क्र. 86 मध्ये सुरुवातीस सांगून टाकले. त्यावर मागील लेखात विवेचन केले आहे. रामनामाने चित्त शांत होऊ लागले. सदैव इतस्तत: भटकण्याची मनाची सवय रामानामाने कमी होऊ लागली. अर्जुनाने भगवद्गीतेत अशी शंका उपस्थित केली आहे की, या चंचल मनाचा निग्रह करणे, त्याला अटकाव करणे म्हणजे वादळाला हाताने थोपवून धरण्यासारखे अशक्य आहे. त्याला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण सांगतात की, “अर्जुना, चंचल मनाला आवरणे कठीण आहे, हे तुझे म्हणणे बरोबर आहे, पण ते अशक्य आहे, असे मात्र नाही. अभ्यासाने, सवयीने आणि वैराग्याने ते आवरता येते. या उपयांनी आपल्याला मन वश होते. रामनामात मन रमू लागले की, त्याला शांती आणि आनंद अनुभवता येतो. ते मन, स्वामी म्हणतात, त्याचप्रमाणे ‘सदानंद आनंद सेऊनि राहे’ असे होऊन जाते.
समर्थांसारख्या अधिकारी, अनुभवी व्यक्तीने हे सांगितले, तरी आपले अहंकारी मन ते मानायला तयार होत नाही. अहंकाराची अवस्था इतकी सूक्ष्म असते की, समर्थांचा उपदेश ऐकूनही मन विचार करते की, रामनामाशिवाय इतर साधने नाहीत का? अध्यात्मात तर आपण अनेक साधने असल्याचे ऐकतो. कोणी तप:साधना करतात, कोणी निग्रह करतात, कोणी योगसाधना करतात, तर कोणी ब्रह्म काय, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. एकदा ब्रह्मज्ञान झाले की, मग रामानामाची गरज काय, असाही विचार मन करते, हे सूक्ष्माहंकाराचे गमक आहे. समर्थांनी या श्लोक क्र. 86च्या तिसर्या ओळीत याचे उत्तर दिले आहे. स्वामी म्हणतात, ‘तयावीण (नामाविण) तो सीण संदेहकारी’ याचा अर्थ नामाशिवाय इतर साधने करु नयेत, असा नाही, पण ती साधने आचरताना त्यात शीण आहे, हे त्रास आहे, हे लक्षात ठेवावे. आता ब्रह्मज्ञानाचा विचार केला, तर ते ज्ञान जाणून घेण्यासाठी जाणकार व्यक्ती शोधली पाहिजे. त्यांनी ब्रह्मज्ञान सांगितले, तरी ते आत्मसात करण्यासाठी आपल्या बुद्धीची कुवत वाढवावी लागेल. बरं तेही जमले, तरी त्यासंबंधी दुसरे विचार ऐकताना पूर्वी ऐकलेल्या बाबत संदेह, संशय उत्पन्न होतो, त्याचे काय करायचे? हे खरे की ते खरे, याविषयी मनात भ्रम निर्माण होतो, या सर्व प्रक्रियेत मन संशयग्रस्त झाल्याने मूळ विचार बाजूला राहून मन अधिक चंचल होते.
या अवस्थेत मन शांत राहणार नाही, या कारणाने नामाशिवाय इतर साधनांमध्ये ‘सीण संदेहकारी’ असे स्वामी म्हणतात. नियमितपणे रामनाम घेण्यात, त्याच्या अनुसंधानात राहण्यात विश्रांती आहे, शीण नाही. स्वामी श्लेकाच्या चौथ्या ओळीत स्पष्ट करतात की, ‘निजधाम हे नाम शोकापहारी.’ म्हणजे नाम हे विश्रांतिस्थळ असून ते सर्व शोक दु:ख हरण करणारे आहे. अर्थात, आनंद मिळवून देणारे आहे. जेव्हा मन रामनामात रममाण होते, तेव्हा मनातील द्वेष, मत्सर, हेवेदावे, नैराश्य या विकृत मनोवृत्तींचे शमन होते. त्यामुळे मनाला चैतन्याची मूळ आनंदमयी प्रसन्न अवस्था अनुभवता येते. संशयात्मक स्थितीत मनाला आलेला शिणवटा नाहीसा होतो. इतर साधनांनी शिणलेले मन रामनाम घेताना स्वगृही आल्यासारखे विश्रांत पावते. थोडक्यात, नामात ज्ञान, आनंद व विश्रांती आहे, असे स्वामी सांगतात. मनाला अस्वस्थ करणारे वासना, विकार असतात. पण जो रामनाम मनापासून घेतो, त्याला विकार- वासना बाधा पोहोचवू शकत नाहीत. हे स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत-
मुरवीं राम त्या काम बाधू शकेना।
गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना।
हरीभक्त तो शक्त कामास मारी।
जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥87॥
मागील श्लोकाप्रमाणे समर्थ येथे पुन्हा ‘मुखी राम’ हा शब्दप्रयोग करतात. कारण, मुखी रामनाम असणे म्हणजे अंत:करणपूर्वक घेतलेले नाम असा अर्थ समर्थांना अभिप्रेत आहे. यावर मागील लेखात विवेचन केले आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात कामवासनेचा जोर विलक्षण असतो. कामवासना त्याला मन:स्वास्थ्य मिळू देत नाही. तथापि जो अंत:करणपूर्वक रामनामाचा अभ्यास करतो, रामनाम नेमाने घेतो, त्याला काम बाधा आणू शकत नाही, असे स्वामींचे सांगणे आहे. रामनामात वृत्ती विराम पावल्याने वासनेचा जोर कमी होऊ लागतो. वासना क्षीण होऊन जातात. सर्व संतांनी परमार्थसाधनेसाठी कामवासनेला टाळायला सांगितले आहे. कामाची त्यांनी निंदा केली आहे. असे असले, तरी प्रापंचिकाला व्यवहारात मर्यादित स्वरूपात आवश्यक तो काम दुर्लक्षित करता येत नाही. कामाचा अतिरेक पारमार्थिक साधनेत व्यत्यय आणतो, बाधा निर्माण करतो. हा अतिरेक टाळायला संत सांगतात. अशा वासनारूपी कामाला संत शत्रू समजतात. त्याची निंदा करतात.
कामाच्या अशा अतिरेकापासून दूर राहायला संत सांगत असतात. अनावर अशी कामवासना ताब्यात ठेवण्यासाठी मोठ्या धैर्याची आवश्यकता असते. ज्याच्या ठिकाणी धैर्याचा अभाव असतो, असा माणूस सहजपणे कामाच्या प्रभावाखाली जातो. वासनेच्या अतिरेकाचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागतात. परंतु, नामाच्या अभ्यासाने कामाला ताब्यात ठेवण्यासाठी ज्या धैर्याची आवश्यकता असते, ते धैर्य नामधारकाला मिळत असते. त्यामुळे तो सहसा कामवासनेबरोबर वाहत जात नाही. धैर्य माणसाला संयमाने कसे वागावे, हे शिकवते. रामनामाने विवेकी आचरण होऊन मन धारिष्ट गुण संपादन करते. समर्थ या श्लोकाच्या तिसर्या ओळीत सांगतात की, काम कितीही बलवान, शक्तिमान का असेना, नामस्मरणाचा अभ्यास करणारा हरिभक्त कामाचा पराजय करतो, त्याला मारुन टाकतो. स्वामी म्हणतात, ‘हरिभक्त तो शक्त कामास मारी.’ रामनामाच्या जोरावर कामाला नष्ट करणारा मारुती खरोखर धन्य होय. समर्थ हनुमानाचे परमभक्त आहेत. स्वामींच्या जीवनात हनुमानाला फार महत्त्वाचे स्थान आहे. हनुमान आणि समर्थ दोघेही ब्रह्मचर्याचा आदर्श आहेत. म्हणून समर्थही धन्यतेस पात्र आहेत.
रामायणात हनुमानाच्या नैष्ठिक ब्रह्मचर्याची कठोर परीक्षा घेतली आहे. हनुमानाने सीताशोधार्थ प्रचंड सागर ओलांडून लंका गाठली, पण रावणाच्या अनेक महालातून सीता कुठे शोधायची, असा त्याला प्रश्न पडला. त्याने सूक्ष्म रुप धारण केले व ज्या पहिल्या महालात प्रवेश केला तेथे रावणाच्या अनेक सुंदर स्त्रिया मद्यधुंद अवस्थेत पडलेल्या होत्या, त्यांना आपल्या वस्त्राची शुद्ध नव्हती. तेे सारे कामोद्दीपक दृश्य हनुमानाला नाईलाजाने बघावे लागत होते. सीतेसारखी पवित्र स्त्री या ठिकाणी असणे शक्य नाही. हे समजून तो बाहेर पडला व त्याने सीताशोधासाठी रावणाच्या महालाचा नाद सोडला. तथापि त्या महालातील तरुण स्त्रियांच्या अवस्थेचा किंचितही परिणाम हनुमानावर झाला नाही. यासाठी ब्रह्मचारी हनुमान धन्य होय, असे उद्गार स्वामींच्या तोंडून बाहेर पडले. हनुमान हा त्याच्या शौर्यामुळे, ब्रह्मचर्यामुळे व स्वामिभक्तीमुळे अजरामर होऊन राहिला आहे. रामनाम व रामाची भक्ती यांनी हनुमानाने अजरामर कीर्तीस संपादन केली आहे. या आणि यापूर्वीच्या चार श्लोकांच्या गटाला आचार्य विनोबा भावे यांनी ‘नाम शोकापहारी’ असे शीर्षक दिले आहे. रामानामाचे, नामस्मरणाचे महत्त्व पुढील आणखी काही श्लोकांतून स्वामींनी विविध तर्हेने समजावले आहे. त्यांच्या अभ्यासाने मानवी जीवन उद्धरुन जाईल. एक नवी दृष्टी प्राप्त होईल.