नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांपासून फरार असलेल्या खलिस्तानी अमृतपालसिंग विरोधात पंजाब पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपालसिंग सलग पाचव्या दिवशी फरार आहे. अमृतपालला पकडण्यासाठी पोलीस सतत शोध मोहीम राबवत असून विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. दरम्यान, पंजाब पोलिसांनी राज्यातील शांतता आणि सौहार्द बिघडवल्याबद्दल १५४ जणांना अटक केली आहे. खलिस्तानी अमृतपाल फरार झाल्यानंतर बुधवारी दुपारी अमृतसर ग्रामीण पोलिसांचे दोन पोलीस अधिकारी त्याच्या घरी पोहोचले. पोलिस उपायुक्त हरकिशन सिंग आणि परविंदर कौन यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला आहे. अमृतपालला आत्मसमर्पण करण्यासाठी कुटुंबावर दबाव निर्माण केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीसही जारी केली आहे.
दरम्यान, तपास यंत्रणांनी वारिस पंजाब देच्या पाच सदस्यांच्या अनेक बँक खात्यांमध्ये २०१६ पासूनच्या ४० कोटी रुपयांच्या व्यवहारांचा शोध लावला आहे. काही प्रकरणांमध्ये दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या काही लोकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचेही आढळून आले आहे.