नवी दिल्ली : भारतासाठी दूरसंचार तंत्रज्ञान हे केवळ सामर्थ्याचे साधन नसून सक्षमीकरणाची मोहीम आहे. भारतात डिजिटल तंत्रज्ञान सार्वत्रिक असून ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे ( इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन- आयटीयु) नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन आणि भारताच्या ६जी व्हिजन डॉक्युमेंटचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन होत असताना आजच्या शुभदिनी भारतातील दूरसंचार क्षेत्रात एक नवी सुरुवात होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. यामुळे भारतासह ग्लोबल साउथसाठी उपाय आणि नवकल्पना उपलब्ध होणार आहेत. यामुळे भारतातील नवोन्मेषक, उद्योग आणि स्टार्टअपसाठी नवीन संधी निर्माण होतील. या उपक्रमामुळे दक्षिण आशियाई देशांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आणि सहयोग बळकट होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताच्या ग्रामीण भागात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगून, पंतप्रधान म्हणाले की, खेड्यांमधील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या शहरी भागापेक्षा जास्त झाली असून, यामधून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत डिजिटल शक्ती पोहोचल्याचे सूचित होत आहे. गेल्या 9 वर्षात सरकारी आणि खाजगी क्षेत्राने भारतात 25 लाख किमी ऑप्टिकल फायबरचे जाळे पसरवल्याची माहिती त्यांनी दिली. “2 लाख ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या आहेत, आणि 5 लाख सामायिक सेवा केंद्रे त्यांना डिजिटल सेवा देत आहेत, ज्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्था उर्वरित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत अडीच पट वेगाने विस्तारत आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.