“भारतात राहणार्या सर्वांचा ‘डीएनए’ एकच आहे, सगळे भारतीय हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्यात ‘डीएनए’ समान आहे,” असे विधान सरसंघचालक मोहनराव भागवतांनी केल्यावर देशभर प्रतिक्रिया उमटल्या. संघाला आता हिंदू आणि हिंदुत्वाशी काहीहीदेणंघेणं नाही इथपासून ते भाजपच्या ‘सबका साथ, सबका विकास’ घोषणेला अनुसरून संघ आता मुस्लीम अनुनय करतो आहे इथपर्यंत या प्रतिक्रिया होत्या. याच्या दोन्ही बाजू तपासण्याची आवश्यकता आहे. सुरुवात दुसर्या बाजूपासून करू...
‘समान डीएनए’ चर्चेत ‘ओवेसी टाईप’चे मुस्लीम नेते आहेत, ज्यांना हा विषय काढून संघ ‘घरवापसी’ला प्रोत्साहन देऊ इच्छितो, अशी भीतियुक्त शक्यता वाटते आणि त्यामुळे या विधानातून संघ मुस्लिमांना आणि भारतीयांना भ्रमित करू इच्छितो, असा त्यांचा दावा आहे.‘समान डीएनए’ विधानाचे दुसरे टीकाकार हे कट्टर हिंदू प्रकारातले, बहुतांश एकांडे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यातही बरेच चांगले अभ्यासू वक्ते, व्यासंगी हिंदुत्ववादी लेखक आणि लहानलहान गटांच्या माध्यमातून धर्मरक्षणाचं काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यातल्या कित्येकांना हा नेमका काय विषय आहे, हे कळलेलं नाही किंवा आपला एकांडा किंवा ‘लोन वोल्फ अॅक्टिव्हिझम’ चालू ठेवण्यासाठी संघ आपल्या रस्त्यावरून भरकटला आहे, हे दाखवणं ही त्यांची व्यावसायिक आणि व्यावहारिक गरज आहे. ‘संघ आता हिंदुत्ववादी राहिला नाही,’ हे सतत सांगून त्यांना आपला वाचक, श्रोता किंवा अनुयायी ग्राहक वर्ग वाढवायचा आहे.
या प्रकारचे एकांडे हिंदुत्ववादी आपापल्या भौगोलिक सीमेच्या मर्यादेत जगतात आणि फिरतात किंवा त्याच्या बाहेर गेलेच तर त्यांचे डोळे उघडे नसतात. त्यामुळे बाहेर परिस्थिती काय आहे, हे कळण्याची त्यांची मानसिक स्थिती नाही. जसं ‘सामना’मधून पूर्वीपासून ’पाकड्यांना ठेचा’, ‘पाकिस्तानमध्ये रणगाडे घालून काश्मीर प्रश्न सोडवा’ वगैरे उच्च दर्जाचे अपूर्व सल्ले कित्येक वेळा दिले जायचे. तितपतच बौद्धिक क्षमता या एकांड्या हिंदुत्ववादी वक्ते, लेखक आणि कार्यकर्त्यांची आहे. तरीही त्यांची जनमानसात आपापल्या पद्धतीने जागरूकता निर्माण करण्याची क्षमता अफाट आहे आणि त्याकामात ते अतोनात कष्ट घेताना दिसतात. पण, मुस्लीम प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणाले किंवा कसे वागले हे सांगताना आता नेमकं कसं वागलं पाहिजे, याची रूपरेषा त्यांच्याकडे नाही म्हणून ‘संघ चुकतोय’ हे सांगून ते तिथेच थांबतात.सोशल मीडियावर काही उग्र हिंदुत्ववादी भूमिका घेणारे असेही नमुने आहेत, जे पुण्यातल्या पुण्यात शांततेच्या काळातही मुस्लीमबहुल वस्तीतून जाताना वळसा घालून दुसर्या मार्गाने जातात, पण फेसबुकवर शिवकाळात वावरतात.
गोवा-कारवारचे किरिस्तांव समाजातले अनेक लोक अजूनही वर्षातून एकदा तरी किंवा प्रत्येक कौटुंबिक मंगलप्रसंगात आपापल्या हिंदू कुलदैवताला जातात आणि कौल मागतात. कोकणातले भंडारी मुस्लीम, चित्पावन मुस्लीम, वाणी मुस्लीम, मराठा मुस्लीम, कर्हाडे ब्राह्मण मुस्लीम दरवर्षी हस्ते परहस्ते शिमग्याच्या आपल्या ग्रामदेवतेच्या पालखीला ओटी पाठवतात.उत्तर प्रदेशात घरंदाज, जमीनदार ठाकूर मुस्लिमांच्या घरात वडील गेले की, तेराव्याला वडिलांच्या जागी घरातल्या सर्वात मोठ्या भावाला पगडी/फेटा बांधून घराण्याचा प्रमुख नेमण्याचा विधी होतो. त्याला ’रस्म-ए-पगडी’ म्हणतात आणि अख्खा परिवार मुस्लीम असला, तरीही ‘रस्म-ए-पगडी’चा विधी वैदिक मंत्रांच्या उद्घोषात ब्राह्मण पंडितांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतो. याला मौलाना विरोध करतात आणि याची बातमी ‘नवभारत टाईम्स’ने ‘पूर्व काँग्रेस सांसद रशीद मसूद के घर ’रसम पगड़ी’ के आयोजन पर मुस्लीम कट्टरपंथियों ने कड़ा ऐतराज जताया है। पूर्व सांसद कोविड-१९ महामारी की चपेट में आ गए थे और उनका ५ अक्टूबर को रुड़की में निधन हो गया था। रसम पगड़ी समारोह उनके सहारनपुर जिले के बिलासपुर गांव में बीते रविवार को हुआ। इस दौरान पंडितों ने वैदिक मंत्रों का उच्चारण किया। समारोह में मौजूद कई मौलाना वैदिक मंत्रों का उच्चारण शुरू होते ही तिलमिला उठे और वहां से चले गए।’ अशी दि. १५ ऑक्टोबर २०२० ला छापली होती.
उत्तर महाराष्ट्रात तडवी भिल्ल आहेत, ज्यांचे बरेचसे रीतिरिवाज हिंदू आहेत, पण नावं मुस्लीम आहेत आणि यांना कट्टर मुस्लीम करण्यासाठी तबलिगी जमातवाले आटोकाट प्रयत्न करतात. महाराणा प्रतापाच्या मुस्लीम वंशजांची अशीच कथा आहे.भारतात असे शेकडो समुदाय कानाकोपर्यात राहतात, ज्यांना आपण एकेकाळी हिंदू होतो, याची जाणीव आहे आणि बरेच सांस्कृतिक अवशेष त्यांच्या दैनंदिन व्यवहारात शिल्लक आहेत आणि अशा सगळ्यांसोबत ‘समान डीएनए’च्या मुद्द्यावर सांस्कृतिक सामाजिक संबंध प्रस्थापित आणि वृद्धिंगत करून पुढे जात राहणं, हे संघाचं काम आहे, याचे भविष्यात हिंदूंसाठी सामाजिक उपयोग आहेत. पण, एकांड्या हिंदुत्ववादी लोकांना आणि समुदायांना हे कळण्याची आवश्यकता वाटत नाही आणि तसं वाटण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे सोशल मीडियावर संघाची टर उडवून आपली कॉलर ताठ करणं, यासाठी ते समान ’डीएनए’चा मुद्दा वापरत राहतील.
कुर्द मुस्लीम झोराष्ट्रीयन चळवळ आणि मिझोराम- मणिपूरचे बेने मेनाशे ज्यू
२०१५ ला उत्तर इराकच्या कुर्दिस्तान स्वायत्त प्रदेशात काही कुर्दांनी नवीन झोराष्ट्रीयन चळवळ सुरु केली आणि नव्या झोराष्ट्रीयन अग्यारीचा (मंदिराचा) ईरबील शहरात पायाभरणी समारंभ झाला, हे मंदिर २०१६च्या सप्टेंबरला सुरु झालं. आता ही चळवळ २०१५च्या नव्या कायद्याच्या आधारे आता वेगाने पसरू लागली आहे आणि झोराष्ट्रीयन धर्माचा संस्थापक झरतुष्ट हा कुर्द वंशाचा होता, हे भावनिक अपील त्याच्या मागे आहे. समान ‘डीएनए’चं तत्त्व कुर्दांनी मानल्यामुळे ही घटना घडून चळवळ सुरु झाली आणि आता ती वर्धिष्णू आहे.
ज्यूंच्या दहा ‘लॉस्ट ट्राईब’ आहेत, अशी त्यांची मान्यता आहे. त्यापैकी एक ‘ट्राईब’ भारताच्या मिझोराम आणि मणिपूरमध्ये आहे, असा इस्रायलला शोध लागला. त्यानंतर त्यांच्या विविध चाचण्या करून २०२० मध्ये ‘बेने मेनाशे’ म्हणजे ’Children of Manasseh’ जातीचे १०० मिझो इस्रायलसाठी रवाना झाले. (टाईम्स ऑफ इंडिया १६ डिसेंबर २०२०- Over 100 from Mizoram migrate to Israel after converting to Judaism) जगभरात सध्या ख्रिस्तपूर्व आणि इस्लामपूर्व आपला इतिहास काय होता, याची उत्सुकता आहे. युरोपमध्ये ‘पॅगन’ चळवळी मूळ धरत आहे आणि कुर्दांच्या झोराष्ट्रीयन चळवळीच्या उदाहरणावरून आणि पाकिस्तानी पश्तुन नेता अब्दुल वली खान पाकिस्तान संसदेत म्हणाला होता की, “आम्ही मागच्या २५ वर्षांपासून पाकिस्तानी, १६०० वर्षांपासून मुस्लीम आणि पाच हजार वर्षांपासून पश्तुन आहोत.” या आणि अशा अनेक उदाहरणांतून आपल्या जातीचा पूर्वेतिहास काय होता, हे जाणण्याची आणि व्यक्त होण्याची कळकळ दिसून येते.या आणि अशा अन्य उदाहरणांतून आपल्या लक्षात येते की,वांशिक आणि सांस्कृतिक इतिहास माणसाच्या अंतरात्म्याला सतत खुणावत असतो. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीचं अपील कितीही प्रबळ असलं, तरी आज ना उद्या शेकडो पिढ्या सनातन भारतीय परंपरांचे संस्कार आज ना उद्या उसळून बाहेर येणारच! त्यासाठी आपल्याला एक मजबूत आवाहन त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल.
बदलता अरबस्तान, ‘सर तन से जुदा’ आणि ‘समान डीएनए’ची चर्चा
पेट्रो डॉलर्सचा ओघ घटत असताना अति मूलतत्त्ववादी वहाबी इस्लामची जन्मभूमी सौदी अरेबिया आता वेगाने सर्वसमावेशक होत आहे. ‘गुस्ताख-ए-रसूल कि एक हि सजा; सर तन से जुदा-सर तन से जुदा’सारखे नारे वहाबी इस्लामची मानव जातीला दिलेली सर्वात विषारी देणगी आहे. हाच वहाबी इस्लाम खुद्द शिया मुस्लिमांनाही मुस्लीम मानायला तयार नव्हता. यहुदी त्यांचे सगळ्यात मोठे शत्रू. पण, आता नवा सौदी, इस्रायलच्या गळ्यात गळे घालत आहे. सौदीचा ‘ग्रॅण्ड मुफ्ती’ (सर्वोच्च धर्मगुरू) म्हणतो, “कुराणात यहुदी विरोधाचा उल्लेखच नाही!” अरबस्तानात तौहिद म्हणजे एकेश्वरवाद जरासा बाजूला सारून भव्य हिंदू मंदिरे उभी राहत आहेत.
या पार्श्वभूमीवर ‘तू मैं एक रक्त’चा विचार ठामपणे भारतीय मुस्लिमांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा लागेल. आक्रमक वहाबी इस्लाम अरबस्तानातून संदर्भहीन होत असताना आपण ‘समान डीएनए’ ची सत्यता आधी हिंदूंना आणि मग भारतीय मुस्लिमांना समजावून सांगावी लागेल. ‘इस्लामिक ब्रदरहूड’चे प्रयोग पार फसले आहेत आणि राष्ट्रवादी राजकीय विचारांचा देशावर एकछत्री प्रभाव निर्माण होत असताना हे काम सोपं होत आहे. २००-३०० फारतर ५०० वर्षांपूर्वी सनातन भारतीय संस्कृती, पूजा पद्धती मानणारे आपलेच लोक आज ‘सर तन से जुदा’ म्हणतात. कारण, त्यांना त्यांच्यात अरबी रक्त असल्याचा भास होतो, तो भास निर्माण आणि दृढ व्हावा, ही व्यवस्था आपल्याच राज्यकर्त्यांनी केलेली होती.
ज्या दिवशी त्यांना इथले हिंदू आणि आपण म्हणजे मुस्लीम यांच्यात ‘समान डीएनए’ आहे, याची जाणीव होईल, त्या दिवशी कटुता संपलेली असेल. हे सोपं काम नाही, पण चारही दिशांनी कट्टर सुन्नी इस्लामच्या घेर्यात वाढलेले कुर्द मुस्लीम १६०० वर्षांनंतर जर स्वतःला ‘झोराष्ट्रीयन’ म्हणवू लागले असतील, तर सनातन भारतीय संस्कृतीच्या सहवासात राहत असलेल्या भारतीय मुस्लिमांना ‘तू मैं एक रक्त’ची जाणीव करून देणं कठीण असलं तरी अशक्य नाही!पूर्वअट एकच आहे- ‘समान डीएनए’ आणि ‘तू मैं एक रक्त’चा विचार हा फक्त संघाचा अजेंडा नसून तो संपूर्ण हिंदू समाजाचा अजेंडा व्हायला हवा!
-विनय जोशी