नवी दिल्ली : राहुल गांधी यांना राफेल प्रकरणातही माफी मागावी लागली होती. त्याचप्रमाणे आताही राहुल गांधी यांच्याकडून आम्ही माफीनामा घेणारच, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबीत पात्रा यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत लगाविला आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्याविषयी त्यांच्या माफीनाम्यावर भाजप ठाम आहे. भाजपतर्फे दररोज पत्रकारपरिषदेतून त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे.
त्याविषयी मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबीत पात्रा म्हणाले, माफी न मागताच यातून सुटका होईल असा राहुल गांधी यांचा समज असेल. मात्र, त्यांनी माफी मागावीच लागेल आणि आम्ही ती मागण्यास भाग पाडू. राफेल प्रकरणातही त्यांना माफी मागाली लागली होती आणि यावेळीही त्यांनी संसदेत येऊन देशाची माफी मागावीच लागणार आहे.
यावेळी राहुल गांधी यांची तुलना पात्रा यांनी मीर जाफरशी केली. ते म्हणाले, मीर जाफर याने नवाब बनण्यासाठी इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीशी हातमिळवणी केली होती. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेला प्रकार म्हणजेही ईस्ट इंडिया कंपनीसोबत हातमिळवणीच आहे. आता शाहजाद्यास नवाब बनायचे आहे, मात्र आजच्या मीर जाफरला माफी मागावीच लागेल असे डॉ. पात्रा यांनी म्हटले आहे.
संसदेत गदारोळ कायम
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लंडनमधील वक्तव्य आणि अदानी समूहाच्या मुद्द्यावरून मंगळवारीदेखील लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज विस्कळीत झाले. जोरदार घोषणाबाजीने सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आता दोन्ही सभागृहांचे कामकाज २३ मार्च रोजी सुरू होणार आहे. यावेळी जम्मू-काश्मीरच्या अनुदान मागण्या विरोधकांच्या घोषणाबाजीत मंजूर करण्यात आल्या.